Friday, June 1, 2007

गोपाळपूर...

विष्णुपदाच्या पश्चिमेस सुमारे अर्धा कि. मी. अंतरावर पुष्पावती नदीच्या काठी एका टेकडीवर श्रीगोपालकृष्ण मंदिर आहे, मंदिर भव्य व विशाल आहे. मंदिरातील गोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, सुबक व प्रसन्न आहे. मूर्तीचा चेहरा हुबेहुब श्रीविठ्ठलाच्या चेह-यासारखा आहे. नामदेवरायांनी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे "देहुडाचरणी वाजवितो वेणू। गोपिका रमणु स्वामी माझा।।" मंदिरात देहुडाचरणी उभे राहून वेणु वाजवीत असलेली भगवान गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. मागे गायी आहेत. या मंदिराच्या आवारातच भगवान श्रीकृष्णाचे सासरे भीमकराजाचे मंदिर आहे. या मंदिरात जनाबाईची गुहा आहे. जनाबाईचा संसार आहे. जनीचे जाते आहे. जात्यावर बसून श्रीविठ्ठलाने जनीसंगे दळण दळले होते अशी आख्यायिका आहे. यशोदेच्या दधिमंथनाची जागा आहे. लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.
मंदिराचे आवार मोठे, प्रशस्त असून भोवती दगडी तटबंदी आहे. सभोवार ओव-या आहेत. येथील पाषाण 500 वर्षापूर्वीचे असावेत असा मूर्तिशास्त्र संशोधकांचा, तज्ञांचा अंदाज आहे. येथील व्यवस्था गुरव समाजाचे लोक पाहतात. इथे सर्व प्रकारचे नित्योपचार केले जातात. इथे गोकुळ अष्टमीस महापूजा केली जाते. अलंकार घातले जातात. आषाढी व कार्तिकी यात्रेला पौर्णिमेस इथे गोपाळकाल्याचा उत्सव होतो. आषाढी पौर्णिमेस सर्व संतांच्या पालख्या इथे जमा होतात. कीर्तने होतात, दहीहंडी फोडली जाते. येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय यात्रेची सांगता होत नाही, वारी पूर्ण होत नाही असे भाविक लोक मानतात.
या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिरात ४२ खोल्या आहेत. मुख्य दरवाजा उंच, भव्य आकर्षक आहे. काही संशोधकांच्या मते अफझलखानाची बेगमपूर (ब्रह्मपुरी) इथे छावणी असताना त्याने या मंदिरावर हल्ला केला. गुरव मंडळींनी त्या वेळी मूर्तीचे रक्षण केले व पुनस्थापना केली. मंदिरातील शिलालेखाचे आधारे इ. च्या १७४४ साली हे कृष्ण मंदिर तळेगावचे अनंत श्यामजी दाभाडे यांनी बांधले, तर महादेवाचे मंदिर सातारा येथील परशुराम अनगळ यांनी बांधले.

No comments: