8) श्री. द्वारिकाधीश मंदिर (श्रीमंत शिंदे सरकार वाडा ) : महाद्वार घाटावरच भव्य, दगडी तटबंदी असलेले श्री द्वारिकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते. मंदिराला चार भव्य दरवाजे आहेत. देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील श्रीद्वारिकाधीशा (मुरलीधर)ची शाळीग्रामची मूर्ती अतिशय देखणी आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. मस्तकी चांदीचा मुकुट आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वालियरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत. या मंदिर व वाडयाच्या बांधकामाच्या भक्कमपणाची परीक्षा पाहण्यासाठी वाडयावरुन हत्ती फिरवले गेल्याची कथा सांगितली जाते.
9) ताकपिठे विठोबा मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराचे पिछाडीस पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर हे प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे. यात्रा काळात गर्दीमुळे मुख्य मंदिरातील श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर भाविक वैष्णवभक्त इथे येऊन दर्शन घेतात. येथील व्यवस्था महाजन बडवे यांच्याकडे आहे.
9) गोपालकृष्ण मंदिर : एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस उत्सव होतो व दहीहंडीचा कार्यक्रम होतो. या मंदिराच्या मागील बाजूस श्रीविठ्ठल मंदिराकडे मुख करुन बसवलेली श्रीगजाननाची पितळी मूर्ती आहे. भाद्रपद महिन्यात या ठिकाणी दहा दिवस धार्मिक कार्यक्रम होतात.
9) काळा मारुती मंदिर : प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका गरीब ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
10) नामदेव मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे. मंदिरात संत नामदेवांची पुण्यतिथी हा मंदिरातील मुख्य उत्सव आहे
11) श्रीधर स्वामी समाधी मंदिर : कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली. आजही या ग्रंथांचे घराघरांत वाचन, पारायण केले जाते. माघ महिन्यातील वद्य पंधरवडयात तृतीयेस श्रीधरस्वामींची पुण्यतिथी उत्सव, धार्मिक कार्यक्रम करुन साजरा करतात.
12) श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो.
याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.
सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. याचे व्यवस्थापन मारवाडी समाजाकडे आहे.
Monday, June 25, 2007
Subscribe to:
Posts (Atom)