दिंडी हा शब्द तसेच प्रकार पूर्वीपार प्रचलित नसला तरी हा शब्द सर्वप्रथम पंढरपूरच्या विठ्ठलासंदर्भातच वापरला गेला व जनमानसात रूळला देखील. 'दिंडी' या शब्दाचा खरा अर्थ 'लहान दरवाजा' किंवा 'पताका' असा घेतला जातो. त्याचप्रमाणे वीणेसारख्या एका वाद्यालाही 'दिंडी' असे संबोधले जाते. 'दिण्डु' या कानडी शब्दापासून 'दिंडी' हा शब्द आला असावा. 'दिण्डू' या शब्दाचा अर्थ स्वाभिमानी, श्रेष्ठ अशा लोकांची मिरवणूक आसा सांगता येईल.
वारक-यांचे जथेच्या जेथे पंढरीकडे निघतात. त्यात टाळकरी, पखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा समावेश होतो व त्यांचेच पुढे दिंडींमध्ये रूपांतर होते. दिंडीची स्वत:ची अशी एक शिस्त असते. दिंड्यांचे काही अलिखित नियम असतात. वीणाधारी वारकरी या दिंडीचा मुख्य असतो. दिंड्यांची जागा व क्रम आखून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निश्चित असतो. पराकोटीची शिस्त हीया दिंड्यांची वैशिष्टे आहेत. यात्रा संपल्यावर पंढरपूरात आपापल्या मठात, राहुटीत मुक्काम केलेले हे वारकरी नगर प्रदक्षिणा, काला यशासांग पार पडून आपापल्या गावी जातात. ही शिस्तबद्ध यंत्रणा गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे. हे नियम ज्ञानदेवादी संतमहंतांच्या सर्वश्रेष्ठ मांदियाळीने अधिक दृढ केले. त्याच्यावरुन मार्गक्रमणा करणारे वारकरी खरोखरच 'धन्य' आहेत.
-- महाराष्ट्र माझा, १६ जुलै 2010
Sunday, July 18, 2010
श्रीक्षेत्र पंढरपूर
श्रीक्षेत्र पंढरपूर
अर्धचंद्राकृती आकाराने वाहणा-या चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे सर्वात श्रेष्ठ असे तीर्थस्थान आहे. वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण असे हे स्थान अतिशय पुरातन आहे. 'जेव्हा नव्हते चराचर| तेव्हा होते पंढऱपूर|' असे संत नामदेव सांगून गेले आहेत. त्या पंढरपूर क्षेत्राच्या प्राचिनत्वविषयी थोडेसे....
पंढऱपूर हे क्षेत्र पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपुर, फागनीपुर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे आणि पांडुरंगपल्ली अशा विविध नावांनी त्या त्या कालखंडात परिचित होते. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारतकालाच्याही आधीपासून अस्तित्वात होते कारण भागा नदी ( चंद्रभागा) चा उल्लेख श्रीमद्भागवत व महाभारत या ग्रंथातही केलेला आढळतो. पंढरपूर पूर्वी दिंडिरवन या नावानेही ओळखले जात असे. येथील जंगलात दिंडीख या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केला. पुढे शालिवाहन राजवटीमध्ये या जंगलाची साफसफाई करण्यात आली आणि तीन योजन अंतरामध्ये एक विस्तीर्ण वस्ती बसविण्यात आली. राजाने लाखभर रुपये खर्च करुन मल्लिकार्जुनाचे देऊळ तसेच पांडुरंगाचे देऊळ बांधले आणि पंढरीनाथाची वास्तू उभी करुन या नगरीला 'पांडुरंग नगरी' असे नाव दिले. (संदर्भ : मालूतार ग्रंथ)
इ.स. ५१६ मधील एक शिलालेखामध्ये पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा केलेला आढळतो. केरळ येथील कालंटी परिसरात इ.स. ७३२ ते ७८८ चा कालावधीत होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्रीपांडुरंगाष्टकम् या अष्टश्लोकी काव्यामध्ये भीमानदीच्या तीरावर उभ्या असलेल्या पांडुरंगाची मी उपासना करतो असे म्हटले आहे.
सोळखांबी शिलालेखात इ.स. १२२६ मध्ये भीमरथी नदीचे काठी पंडरंगे नावाचे महाग्राम वसले आहे असा उल्लेख आहे. तसेच १२७० साली झालेल्या एका यज्ञाचा तपशील देणा-या शिलालेखात पंढऱपूरचा उल्लेख पांडुरंगपूर असा केला आहे. १२६० ते १३०९ या यादवकाळातील हेमाद्री (हेमाडपंत) या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढऱपूर व पांडुरंगाचे वर्णन केले आहे. तर १३०३ सालच्या चौंडरस या कवीच्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातच पंढरी व विठ्ठलराय असा उल्लेख केला गेला आहे. १३०५ साली लिहिल्या गेलेल्या कृष्णकर्णामृतम् या ग्रंथात भीमेच्या काठी असलेल्या या सावळ्या देवाने आपले हात कमरेवर ठेवले असल्याचा उल्लेख आहे.
१४९० ते १५०८ या काळात निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद ग्रंथातील तीर्थसार भागातील कथेनुसार सांगायचे तर यात पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे. येथे पुंडरीक नावाचा माणूस पुष्करिणीच्या तीरावर आश्रम बांधून राहात होता. तो आपल्या आईवडिलांची करीत असलेली सेवा पाहून भगवान कृष्ण प्रसन्न झाले व पुंडरीकास 'वर मागावा' असे त्यांनी सांगितले. तेव्हा पुंडरीकाने हे क्षेत्र माझ्या नावाने 'पुडरीक क्षेत्र' म्हणून प्रसिद्ध व्हावे असा वर मागितला. त्याच विनंती मान्य करुन भगवंताने त्याला मी येथे गुप्त रुपाने वास करीन असे आश्वासन दिले.
अशा त-हेने पुरातन कालापासून आपल्या अस्तित्वाची साक्ष देणारे पंढरपूरक्षेत्र विविध नावाने परिचित असले तरी सरकार दरबारी आज ते पंढरपूर या नावानेच ओळखले जाते.
- महाराष्ट्र माझा, १६ जुलै 2010
Subscribe to:
Posts (Atom)