Sunday, January 4, 2009

राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्‍यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.