Friday, June 1, 2007

गोपाळपूर...

विष्णुपदाच्या पश्चिमेस सुमारे अर्धा कि. मी. अंतरावर पुष्पावती नदीच्या काठी एका टेकडीवर श्रीगोपालकृष्ण मंदिर आहे, मंदिर भव्य व विशाल आहे. मंदिरातील गोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, सुबक व प्रसन्न आहे. मूर्तीचा चेहरा हुबेहुब श्रीविठ्ठलाच्या चेह-यासारखा आहे. नामदेवरायांनी अभंगात वर्णन केल्याप्रमाणे "देहुडाचरणी वाजवितो वेणू। गोपिका रमणु स्वामी माझा।।" मंदिरात देहुडाचरणी उभे राहून वेणु वाजवीत असलेली भगवान गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. मागे गायी आहेत. या मंदिराच्या आवारातच भगवान श्रीकृष्णाचे सासरे भीमकराजाचे मंदिर आहे. या मंदिरात जनाबाईची गुहा आहे. जनाबाईचा संसार आहे. जनीचे जाते आहे. जात्यावर बसून श्रीविठ्ठलाने जनीसंगे दळण दळले होते अशी आख्यायिका आहे. यशोदेच्या दधिमंथनाची जागा आहे. लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे.
मंदिराचे आवार मोठे, प्रशस्त असून भोवती दगडी तटबंदी आहे. सभोवार ओव-या आहेत. येथील पाषाण 500 वर्षापूर्वीचे असावेत असा मूर्तिशास्त्र संशोधकांचा, तज्ञांचा अंदाज आहे. येथील व्यवस्था गुरव समाजाचे लोक पाहतात. इथे सर्व प्रकारचे नित्योपचार केले जातात. इथे गोकुळ अष्टमीस महापूजा केली जाते. अलंकार घातले जातात. आषाढी व कार्तिकी यात्रेला पौर्णिमेस इथे गोपाळकाल्याचा उत्सव होतो. आषाढी पौर्णिमेस सर्व संतांच्या पालख्या इथे जमा होतात. कीर्तने होतात, दहीहंडी फोडली जाते. येथील काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय यात्रेची सांगता होत नाही, वारी पूर्ण होत नाही असे भाविक लोक मानतात.
या मंदिराला तीन दरवाजे आहेत. मंदिरात ४२ खोल्या आहेत. मुख्य दरवाजा उंच, भव्य आकर्षक आहे. काही संशोधकांच्या मते अफझलखानाची बेगमपूर (ब्रह्मपुरी) इथे छावणी असताना त्याने या मंदिरावर हल्ला केला. गुरव मंडळींनी त्या वेळी मूर्तीचे रक्षण केले व पुनस्थापना केली. मंदिरातील शिलालेखाचे आधारे इ. च्या १७४४ साली हे कृष्ण मंदिर तळेगावचे अनंत श्यामजी दाभाडे यांनी बांधले, तर महादेवाचे मंदिर सातारा येथील परशुराम अनगळ यांनी बांधले.

विष्णुपद तीर्थ...

चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाने बांधलेले ३१ फूट परिघाचे व १२ फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिराची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन. 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले, गाई सोडल्या व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलांची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पूल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात 'नारदा'चे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी बांधव पाहतात-.

पंढरपूरची भक्तीगीते...

पाऊले चालती पंढरीची वाट....
( गायक : प्रल्हाद शिंदे, सुरेश वाडकर, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, विजय सरतापे, शरद जांभेकर, रविंद्र बिजूर, नरेंद्र कोथंबीकर, माधुरी विल्सन, मृदुला दाडे, सौ. अंजनाताई जगताप)
१) पाऊले चालती पंढरीची वाट २) चल ग सखे पंढरीला ३) दर्श देरे देरे भगवंता
४) नाम तुझे घेता देवा ५) जैसे ज्याचे कर्म तैसे 6) चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी
७) मागतो मी पांडुरंगा ८) जणु देह ही पंढरी ९) विठ्ठलाच्या पायी विट
10) देवा श्री गजानना किती 11) विघ्नहर्ता सुखकर्ता १२) मंगलवेडे भुमी संतांची
१३) बाप्पा मोरया रे १४) आता तरी देवा मला १५) करुया उदो उदो अंबाबाईचा
16) नाचु गाऊ विठु नावे १७) धरीला पंढरीचा चोर १८) विठू माऊली तु.
१९) खेळ मांडीयेला २०) विठ्ठला तु वेडा कुंभार २१) ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर
२२) कानडा राजा पंढरीचा 23) विठ्ठल तो आला आला. 2४) विठू माझा लेकुरवाळा
25) धागा धागा अखंड विणूया २६) अवघे गरजे पंढरपुर 27) कानडाऊ विठ्ठल
२८) दिंडी निघाली पंढरीला 29) जाऊ चला विठुरायाच्या पंढरीला
30) नाम सदा विठ्ठलाचे गारे ३१) पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला.
३२) कृष्ण सावळा कान्हा सावळा ३३) पंढरीचा राणा येतो जनाई घरी
34) चंद्रभागेच्या तीरावंरी आहे. ३५) विठ्ठल नामाचा गजर ३६) विठ्ठला रे विठ्ठला
३७) चला पंढरीसी जावू 38) ज्ञानदेव म्हणता माया 39) सावळा देखीला नंदाचा
४०) पंढरीचा पाटील देव माझा ४१) मी पाहीला पांडुरंग
४२) पुंडलीका भेटी आला पांडुरंग ४३) विठु दार उघड आता दार
44) विठु माझा धावला ग ४५ ) विठ्ठलाची आरती

Wednesday, May 30, 2007

विठोबा...

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकांतील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्माचा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारक-यांचे ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशा नाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश 'पंडरगे' असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ गाव असून ते कानडी आहे. ह्या नावावरुनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांढरीपूर पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात. पण 'पांडुरंग' हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते. असे दिसते. 'पांडुरंग' ह्या शब्दाचा अर्थ 'शुभ्र रंग' असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे. असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते; तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी 'पांडुरंग' म्हटले आहे. श्रीज्ञानदेवापासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे.; त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या दिंगबर आणि तमालनील अशा विठोबाचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबाची स्तुती केली आहे.
विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठ ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द 'विष्ठल' ( दूर, रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असणारा देव ठरतो. डाँ, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते 'विष्णू' ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रुप'बिटी' असे होते आणि 'बिट्टी' वरुनच 'विठ्ठल' रुप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णूचे 'विट्टु' असे रुप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रुपालाच प्रेमाने 'ल' हा प्रत्यय लावला, की 'विठ्ठल' असे रुप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेश), ठान् (अज्ञज्ञनान्), लति (गृहणाति) म्हणजे 'अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्यती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील 'विठ्ठल' ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करुन देण्यात आलेला आहे. 'विदि (ज्ञाने) स्थल; (स्थिर:) म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती वि.कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, हटुवा, इठुवा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतली नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलांचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी 'इटु' असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ 'कमरेवर हात ठेवलेला' असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. 'विटेवर जो उभा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.
विठ्ठल हा 'युगे अठ्ठावीस' पंढरपूरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठाविसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असा घेता येईल.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला 'कानडा' आणि 'कर्नाटकु' अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी 'तीर्थ कानडे देव कानडे। क्षेत्र कानडे पंढरिये।' असे म्हटले आहे, तर नामदेवांनी 'कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी' असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।).'कानडा म्हणजे अगम्य' अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. 'कर्नाटकु' ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाची संबंध नसून 'कर्नाटकु' म्हणजे 'करनाटकु' वा 'लीलालाघव दाखविणारा', असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे; परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव 'पंडरगे' हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरही कर्नाटकातले आहेत. ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

विठोबा...

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकांतील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्माचा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारक-यांचे ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशा नाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश 'पंडरगे' असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ गाव असून ते कानडी आहे. ह्या नावावरुनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांढरीपूर पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात. पण 'पांडुरंग' हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते. असे दिसते. 'पांडुरंग' ह्या शब्दाचा अर्थ 'शुभ्र रंग' असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे. असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते; तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी 'पांडुरंग' म्हटले आहे. श्रीज्ञानदेवापासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे.; त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या दिंगबर आणि तमालनील अशा विठोबाचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबाची स्तुती केली आहे.
विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठ ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द 'विष्ठल' ( दूर, रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असणारा देव ठरतो. डाँ, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते 'विष्णू' ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रुप'बिटी' असे होते आणि 'बिट्टी' वरुनच 'विठ्ठल' रुप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णूचे 'विट्टु' असे रुप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रुपालाच प्रेमाने 'ल' हा प्रत्यय लावला, की 'विठ्ठल' असे रुप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेश), ठान् (अज्ञज्ञनान्), लति (गृहणाति) म्हणजे 'अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्यती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील 'विठ्ठल' ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करुन देण्यात आलेला आहे. 'विदि (ज्ञाने) स्थल; (स्थिर:) म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती वि.कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, हटुवा, इठुवा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतली नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलांचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी 'इटु' असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ 'कमरेवर हात ठेवलेला' असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. 'विटेवर जो उभा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.
विठ्ठल हा 'युगे अठ्ठावीस' पंढरपूरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठाविसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असा घेता येईल.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला 'कानडा' आणि 'कर्नाटकु' अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी 'तीर्थ कानडे देव कानडे। क्षेत्र कानडे पंढरिये।' असे म्हटले आहे, तर नामदेवांनी 'कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी' असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।).'कानडा म्हणजे अगम्य' अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. 'कर्नाटकु' ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाची संबंध नसून 'कर्नाटकु' म्हणजे 'करनाटकु' वा 'लीलालाघव दाखविणारा', असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे; परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव 'पंडरगे' हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरही कर्नाटकातले आहेत. ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

विठोबाची मूर्ती...

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरेक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानात मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत, मूर्तीच्या दंडांवर आणि मनगटांवर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याच्या टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांडीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास 'काठी' असे म्हणतात कमरेस वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा 'दिगंबर' म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोंगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच 'वीट' म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. ख-यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.
उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे ह्यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, तो ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते. 1659 साली झालेल्या अफझलखानाच्या स्वारीसारखे संकटप्रसंग जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरजवळच्या गावात हलविण्यात येई, असे दिसते. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे ह्या गावात नेऊन ठेविली होती आणि अफझलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. विजयनगरचा राजा कृष्णराव वा कृष्णदेवराम (कार. 1509-1529) ह्यास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांची विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूरची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती. आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही; परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे 'विजयविठ्ठल' असे नाव आहे. ही मूर्ती विजयनगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठमूर्तीसारखीच दिसते; परंतु ती आकाराने लहान वाटते. भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हातरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.
ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी ह्या आद्य विठ्ठलमूर्तीची विश्वासाई वर्णने कोठे मिळत असल्यास पाहिली पाहिजेत आणि तशी ती मिळतात, असे ह्या विषयाचा अलीकडच्या काळात विशेष आणि सखोल अभ्यास केलेले संशोधक डाँ.रा.चिं.ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे : विठोबाचे पंढरपूरचे माहात्म सांगणारे तीन संस्कृत ग्रंथ (पांडुरंगमहात्म्ये) आज उपलब्ध आहेत. त्यांतील स्कांद पांडुरंगमाहात्म्य आणि पाद्म पांडुरंगमाहातम्य अनक्रमे स्कंद व पद्म पुराणांतर्गत असल्याचा दावा करणारी आहेत. ह्या दोन पांडुरंगमाहात्म्यांचा निर्देश वर आलेलाच आहे. (तिसरे पांडुरंगमाहात्म्य हे विष्णुपुराणातर्गत असल्याचा दावा करणारे असून त्याची एकुलती एक उपलब्ध प्रत डाँ.ढेरे ह्यांच्या संग्रही आहे). ह्या सर्व पांडुरंगमाहात्म्यांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे सर्वात प्राचीन -म्हणजे निवृत्ती ज्ञानदेवांच्याही पूर्वीचे आणि अगदी काटेकोरपणे सांगावयाचे झाल्यास रामदेवराव यादवाचा करणाधिप हेमाद्री ( तेरावे शतक, उत्तरार्ध ) ह्याच्याही पूर्वीचे आहे. ह्या स्कांद पांडुरंग-माहात्म्यास पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पाद्म पांडुरंमाहात्म्याची रचना सोळाव्या शतकात आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणा-या उपर्युक्त पांडुरंगमहात्म्याचीही रचना त्याच सुमारास झाली असावी.
उपर्युक्त स्फांद पांडुरंगमाहात्म्यात पंढरपूरच्या विठ्ठमंदिरातील मूर्तीची जी अनन्यसाधारण लक्षणे सांगितली आहेत. त्यांतले एक म्हणजे त्या विठ्ठलमूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे आहेत. श्रीविठ्ठलांनाच मंत्र तेथे कोरलेला आहे. तेथे विठोबाला 'महामंत्रयुत:' हे विशेषण लावलेले आहे. त्याचप्रमाणे 'देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहवयास मिळतात' अशा आशयाचे स्पष्ट विधानही तेथे आहे. (मंत्राक्षराणि.. दृश्यन्ते तस्य वक्षसि). पाद्म पांडुरंगमाहात्म्यातही 'श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडक्षराम्' । असा षडक्षर मंत्राचा निर्देश आहे. विठ्ठलसहस्त्रनामस्तोत्रात विठोबाला 'षडक्षरमय' म्हटले आहे. विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्तात्रोत 'मंत्राक्षरावलीहत्स्थ:' असे त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी श्रीधर ( 1658-1729) ह्यांनी पंढरीमाहात्म्य ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या एका मराठी पांडुरंगमाहात्म्यात ( एकूण अध्याय दहा) विठ्ठलाच्या हृद्यावरील षडक्षर मंत्राचा कितीतरी वेळी निर्देश केलेला आढळतो. श्रीधर हे पंढरपूरजवळच्याच नाझरे गावचे. पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातली होती. ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी ह्या षडक्षर मंत्राचा निर्देश केला असणे शक्य वाटते. संत सांवता माळी ह्यांनी विठ्ठमूर्तीचे वर्णन करताना आपल्या एका अभंगात 'विठ्ठलाचे रुप अतकर्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्ध ।। असे शब्द वापरले आहेत. अशी मंत्रसिद्ध मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठलमंदिरात नाही; ती माहादाजी निंबाळकर ह्यांनी माढे येथे बांधलेल्या विठ्ठलमंदिरात आहे. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढे येथे नेऊन ठेवली होती व ते संकट टळल्यावर ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली. त्या संकटाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माढे येथे जे विठ्ठमंदिर बांधण्यात आले असे राजवाडे म्हणतात, तेच हे मंदिर, ह्या मंदिरात पंढरपूर येथील आद्य मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे, असे डाँ. ढेरे ह्यांना वाटते. पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या नित्य सहवासात असलेले काशीनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये ह्यांनी रचिलेल्या विठ्ठलध्यानमानसपूजा ह्या स्तोत्रात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे. त्यात मूर्तीच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबा पाध्ये हे 1805 मध्ये निधन पावले हे पाहता पंढरपूरची आद्य विठ्ठलमूर्ती पंढरपूर येथे 1805 पर्यंत तरी होती, असे ढेरे ह्यांना वाटते.
माढे येथील ही मूर्ती पूर्ण दिगंबर आहे. तिच्या मस्तकावर कंगोरा असलेली, गवळ्याच्या टोपीसारकी टोपी आहे. कानांत शंखाकार कुडले आहेत. ती मूर्तीच्या खांद्यांवर टेकलेली आहेत. मूर्तीने धारण केलेल्या दोन माळांपैकी एक गळपासी आणि दुसरी हृदयावर लोंबणारी आहे. ह्या माळेत कौस्तुभमणी आहे. ह्या दोन्ही माळांनी साधलेल्या त्रिकोणात तो मंत्र आहे. मंत्राच्या अखेरीस 'श्रीवास' असा शब्द आहे. कमरेला क्षुद्रघंटिका असलेला पट्टा आहे. डाव्या हातात शंख असून उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकलेला आहे. ह्या हाताच्या बोटात कमळळकी आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दंडांत भुजबंध व मनगटावर कडी आहेत. ह्या मूर्तीच्या माळावर तिसरा नेत्र आहे. हे खास वैशिष्टय, मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोर्या कपाळावरुन मागे, दोन्ही बाजूंना गेल्या आहेत. डाव्या बाजूची दोरी मात्र खाली आलेली दिसत नाही. पंढरपूरप्रमाणेच माढे येथील मंदिरातही विठ्ठल हा एकटा आहे., त्याच्या समवेत रखुमाई नाही.
भाळावर तिसरा नेत्र आणि दिगंबरत्व अशी मूळ मूर्तीची अन्य दोन अनन्यसाधारण लक्षणे स्कांद पांडुरंगमाहात्म्यात सांगितलेली असून ती माढे येथील मूर्तीत स्पष्टपणे दिसून येतात. स्कांद पांडुरंग-माहात्म्यातील वर्णन हे पुंडलिकासाठी पंढरपुरात आलेल्या श्रीकृष्णाच्या रुपान वर्णन करण्यासाठी आलेले आहे व ते माढे येथील मूर्ती दृष्टीसमोर ठेवून केल्यासारखे वाटावे, इतके साम्य त्या वर्णनात आणि माढे येथील विठ्ठलमूर्तीत आहे, असे डाँ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
पांडुरंगमहात्म्यांनी असे सांगितले आहे, की पंढरपुरात विठोबाची तीन रुपे आहेत : एक, प्रत्यक्ष मंदिरातले; दुसरे संपूर्ण पंढरपूराला व्यापून राहिलेले आणि तिसरे, चंद्रभागेच्या प्रवाहाच्या रुपाने अस्तित्वात असलेले. कवी श्रीधरांनी दहा अध्यायांचे पंढरीमाहात्म्य किंवा पांडुरंगमाहात्म्य ( हा छोट्या पांडुरंगमाहात्म्याचाच विस्तार) लिहिले आहे. त्यात विठोबाच्या उपर्युक्त तीन रुपांखेरीज त्याच्या तीन मूर्तीचाही निर्देश आहे : एक, मुख्य स्थानावरील मूर्ती; दुसरी, लक्ष्मीपुढची ( म्हणजेच लखूबाईपुढची) आणि तिसरी, पुंडलिकासमोरची. लखूबाई आणि पुंडलिक ह्यांच्या समोर आज विठ्ठमूर्ती दिसत नाही. मुख्य मूर्तीबद्दल श्रीधरांनी लिहिले आहे ; 'मुख्य जे पांडुरंगस्थान। तेथे न करावे आरोहण।' ' आरोहण' ह्या शब्दातून उंच ठिकाणावर चढून जाण्याची कल्पना सूचित होते. तेथे आरोहण केल्यास दारुण परिणाम होतील, असाही धाक श्रीधरांच्या ओवीतून दाखविलेला आहे. त्यामुळे अगदी आरंभी ही मूर्ती नुसतीच एखाद्या उंचवट्यावर, मंदिर नसलेल्या अवस्थेत होती किंवा काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.
ग.ह.खरे ह्यांच्या मते पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती प्राचीन किंवा मध्ययुगीनही म्हणता येणार नाही, परंतु आधुनिक म्हणजे शेसवाशे वर्षातील ती आहे असेही म्हणवत नाही.

Tuesday, May 29, 2007

विठोबाचे पंढरपूरातील प्रकटन

पंढरपूरात विठोबा कसा प्रकटला ह्याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक ह्या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वर्कुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला. 'आईवडिलांची सेवा करतो आहे: ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब' असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे. पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा सांगण्यात आल्या आहेत.: (१) डिंडीरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने माल्लिकार्जुन शिवाचे रुप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. (२) कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रुक्मिणी रुसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली; तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करुन रुक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपूरजवळ असलेल्या गोपाळपुराला वारक-यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे वाडीवजा गाव आहे. तिथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर वारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनधड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तिरुप आहे. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. (३) पद्मा नावाच्या एका सुंदर तरुण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरु केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रुप धारण करुन तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रुपाला तिला मोह पडला, तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने 'मुक्तकेशी' नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला 'नग्ना' आणि 'मुक्तकेशी' अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावंती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजा-यांकडेच आहे. ह्या कथापैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रुक्मिणीची कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कांद आणि पाद्म अशा दोन्ही पांडुरंगमाहात्म्यांत आलेली आहे. ही पांडुरंगमाहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.
विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूर येते कधी सुरु झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवा विट्टिदेव किंवा विट्टिग (बारावे शतक) ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे. स्वत:च्या नावापासून तयार झालेले 'विठ्ठल' हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग.ह.खरे ह्यांना वाटते.

Monday, May 28, 2007

पंढरपूर...

पंढरपूर : मराठी संस्कृती घडविणा-या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारुपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. सोलापूर जिल्हयातील याच नावाच्या तालुक्याचे ते मुख्य ठिकाण असून सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी.वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, स.स.पासून ४५० मी. उंचीवर बसलेले आहे. हे मिरज-कुर्डुवाडी अरुंदमापी लोहमार्गवरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. या 'भक्तिसंप्रदायाच्या आद्यपीठा' त आणि 'भीमातटीय महायोगपीठा' त महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि कर्नाटकादी इतर राज्यांतूनही प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशांस हजारो वारकरी आणि यात्रेकरु लोटतात. चैत्रातील व माघातील यात्रा त्या मानाने लहान असतात.
विठ्ठलमंदिर हे गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदिर सु.200 मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमूख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. 107 मी. दक्षिणोत्तर रुंदी सु. 52 मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पाररीला पाया न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुत्किमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाघ्या आहेत. तसेच येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाना मिठी घालून मग पुढे जाताना. यानंतर चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता: तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेश-मंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेली ओवरीत नारद व कोप-यात रामेश्वर यांच्या मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही खोल्या आहेत. सभामंडपाच्या पाय-या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळ्खांबी मंडपात आले. म्हणजे एका भिंतीत 'शिलालेख' असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फे-यातून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. देवालयाच्या उत्पन्नाबाबत व तेथील बडवे, सेवेकरी, उत्पात, डांगे बेणारे इत्यादींच्या हक्कांबाबत पूर्वापार तंटेबखेडे होत आले आहेत: अलीकडे शासनाने नाडकर्णी आयोग नेमून देवालय-व्यवस्थेबाबात निर्णय केला होता: तथापि त्यासंबंधी पुढील न्यायालयीन वाद चालू आहेत.
नदीकाठी अकरा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सु.1.2 कि.मीवर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सु.1.6 कि.मी.वर गोपाळपूर येथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळे आणि तळे) , व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रूक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेव मंदिर, शांकभरी, (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारूती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाळा (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त , बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरूजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
पंढरपूर व तेथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नावांची व्युत्पत्ती यांबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. रा.ज.पुरोहित व डॉ. रा.गो.भांडारकर अनुक्रमे पुंडरीकपूर व पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द व्युत्पादितात. चौ-याऐंशीच्या शिलालेखात (1273) पंढरपूरास फागनिपूर व विठोबास विठठ्ल किंवा विठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. 1258 च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचिरते ग्रंथात पंढरपूर, विठठ्ल मंदिर व तेथील गरूड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रूक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या 1311 च्या मराठी शिलालेखात पंडरीपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.
विठोबाच्या मूर्तीचे अनेकवेळा स्थानांतर झाल्याचे उल्लेख सापडतात. कधी आक्रमकांपासून बचावण्यासाठी ती बडव्यांनी लपवून ठेवली होती, तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे घेऊन परत केली होती. सोळाव्या शतकात विजयानगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली, अशी कथा आहे. विठोबाची मूर्ती भिलसाजवळील उदयगिरी लेण्यातील तिस-या शतकातील मूर्तीसारखी दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दाने दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ.मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात.
त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो.

( विश्वकोश खंड ९ पंढरपूर नोदींतून...)