Wednesday, May 30, 2007

विठोबा...

महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकांतील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्माचा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारक-यांचे ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशीना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशा नाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागात पंढरपूरचा निर्देश 'पंडरगे' असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ गाव असून ते कानडी आहे. ह्या नावावरुनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांढरीपूर पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात. पण 'पांडुरंग' हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते. असे दिसते. 'पांडुरंग' ह्या शब्दाचा अर्थ 'शुभ्र रंग' असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे. असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते; तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी 'पांडुरंग' म्हटले आहे. श्रीज्ञानदेवापासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे.; त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या दिंगबर आणि तमालनील अशा विठोबाचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबाची स्तुती केली आहे.
विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठ ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द 'विष्ठल' ( दूर, रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असणारा देव ठरतो. डाँ, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते 'विष्णू' ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रुप'बिटी' असे होते आणि 'बिट्टी' वरुनच 'विठ्ठल' रुप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णूचे 'विट्टु' असे रुप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रुपालाच प्रेमाने 'ल' हा प्रत्यय लावला, की 'विठ्ठल' असे रुप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेश), ठान् (अज्ञज्ञनान्), लति (गृहणाति) म्हणजे 'अज्ञ जनांना ज्ञानाने स्वीकारणारा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्यती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील 'विठ्ठल' ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करुन देण्यात आलेला आहे. 'विदि (ज्ञाने) स्थल; (स्थिर:) म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती वि.कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, हटुवा, इठुवा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतली नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलांचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी 'इटु' असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ 'कमरेवर हात ठेवलेला' असा असल्याचे प्रतिपादन केले आहे. 'विटेवर जो उभा, तो विठ्ठल' अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.
विठ्ठल हा 'युगे अठ्ठावीस' पंढरपूरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठाविसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असा घेता येईल.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला 'कानडा' आणि 'कर्नाटकु' अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी 'तीर्थ कानडे देव कानडे। क्षेत्र कानडे पंढरिये।' असे म्हटले आहे, तर नामदेवांनी 'कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी' असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।).'कानडा म्हणजे अगम्य' अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. 'कर्नाटकु' ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाची संबंध नसून 'कर्नाटकु' म्हणजे 'करनाटकु' वा 'लीलालाघव दाखविणारा', असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे; परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव 'पंडरगे' हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरही कर्नाटकातले आहेत. ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

No comments: