Tuesday, July 1, 2008
पांडूरंग: क्षेत्रनाम
लेखसंशोधनातील सुप्रसिध्द लेखक रा.चि.ढेरे यांनी त्यांच्या '' श्री विठ्ठल:एक महासमन्वय'' ह्या पुस्तकात पांडुरंग या नावाचे महत्व विविध लेखमीमांसाच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सांगतात की, स्कांद ' पांडुरंगमाहात्म्या' तही ' पांडुरंग' हे विठ्ठलाचे पर्यायनाम म्हणून आलेले असले, तरी मुळात ते क्षेत्राचे नाव होते. " पांडुरंग विठ्ठल" हे " काशी विश्वनाथ " यासारखे नाव होते. काशी विश्वनाथ म्हणजे काशीक्षेत्राचा विश्वनाथ असा होतो. हैदराबादमधील तिरूमलै पर्वतावर वेंकेटेशचे मंदिर उभारलेले आहे.मात्र तेथील भक्तांनी तिरूमलै वेंकेटेश असे नामकरण केले. याचा अर्थ असा होतो कि, पुढे-पुढे ही प्रथाचं रूजली गेली. त्या- त्या तीर्थस्थानावरून तेथील देवांचे पर्यायनाम ठरू लागले.पंढरपुर या क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंढरगे. विठ्ठलमंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर असलेल्या, होयसळ नृपती सोमेश्र्वराच्या लेखात (1159) या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या "पंडरगे"या 'पंडरगे' पासूनच 'पांडुरंग' हे देवनाम, पांडुरंग, पंढरपुर-पंढरी हे क्षेत्रनाम व पुंडरीक हे कृत्रिम संस्कृतीकरण करून साधले आहे आणि विठ्ठल या नामाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहील्याचे सांगितले आहे.लोकप्रिय प्रचलित सामग्रीतूनचं माहात्म्यकथा रचली जात असते. असा दैवतशास्त्रज्ञांना वांरवांर सप्रमाण प्रत्यय येत आलेला आहे. विठ्ठलाची विकसनप्रक्रिया याच पध्दतीने घडत राहिली.या प्रक्रियेच्या पुढच्या-पुढच्या अवस्था आपल्याला मांडता येतात; पंरतू विठ्ठलाचे आदिरूप मात्र अजूनही आपल्या दृष्टीक्षेपात येऊ शकलेले नाही. त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी 'विठ्ठल' या नामाची निशं:क व्युत्पत्ती सापडयाला हवी. 'विठ्ठल-वीरप्पा' या नावाने नांदणारी धनगरांची विठ्ठलोपसना धांडोळायला हवी.विठ्ठल हा गवळी- धनगरांचा देव आहे.पदूबाई नावाच्या गवळणबाईचा हा पती आहे. ही वस्तूस्थिती ध्यानी घ्यायला हवीय. 'नग्ना' आणि 'मुक्तकेशी' होऊन विठ्ठलावर भाळलेली एक 'पद्मा' पांडुरंगमाहत्म्यात आलेली आहे. तिची विठ्ठलचरित्रातील उपस्थिती लक्षणीय आहे की नाही, ते तपासायला हवे.विठ्ठल आणि वेंकेटेश हे दोघेही विष्णूरूप आहेत. 'बालाजी' (बालकृष्ण) मानले आहे.या सर्व साम्यांचाही त्यांच्या मूलरूपाच्या शोधासाठी वापर करायला हवा. कृष्णरूप मानला गेलेला,कटीवर कर ठेवून उभा असलेला पश्र्चिम बिहारमधील अहिरांचा देव 'वीर कुवर' (वीर कुमार) याचा विठ्ठलाशी साम्यबंध लक्षणीय ठरेल काय़? हे गांभीर्याने ध्यानी घ्यायला हवे. विठ्ठल शोधाच्या या सर्व संभाव्य दिशा साक्षेपाने चोखळ्यानंतरच आपल्याला विठ्ठलाच्या मुलस्वरूपाविषयी काही सांगता येणे शक्य आहे.अजूनही 'विठ्ठल' या नावाची व्युत्पत्ती समाधानकारक रीत्या देता आलेली नाही. 'पांडुरंग' हे त्याचे दुसरे संतप्रिय नावं दृश्यत: शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूर-गौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक असल्यामुळे त्याची सावळ्या विठ्ठलाशी विसंवादी सांगड का घातली गेली,या प्रश्नाचे उत्तर देता आले ऩाही. 'विदा (ज्ञानेन),ठानू (अज्ञजनान्), लाति (गृहणाति), म्हणजे अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो.तो विठ्ठल होय. अशी 'विठ्ठल' या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करून देणारी एक व्युत्पत्ती पंरपरेत स्वीकारली गेली आहे.अथवा 'विदी' (ज्ञाने) स्थल:(स्थिर:) म्हणजे 'जो ज्ञानाच्या ठायी आहे तो विठ्ठल होय' ही अगदी कालपरवा पर्यंत सारस्वतव्याकरणाचा हवाला देऊन श्री.वि.कृ.श्रोत्रिय यांनी एक नवी व्युत्त्पती सादर केली आहे. इतिहासचार्य राजवाडे, डॉ.म.अ.मेहदळे,इत्यादी अनेक जुन्या-नव्या अभ्यासकांनी 'विठ्ठल' -नामाच्या व्युत्त्पतीचा प्रयत्न केला आहे.विष्टू-विठ्ठल अशा प्रक्रियेतून विष्णूपासून विठ्ठल हे नाम बनले, हे मत अनेक अभ्यासकांनी स्वीकारले आहे आणि त्याला विठ्ठलभक्तीच्या वैष्णव स्वरूपाची पुष्टीही लाभत राहीलेली आहे.महाराष्ट्रात विठ्ठलाप्रमाणेचं विठलाई या नावाच्या देवीची अनेक ठाणी आहेत.आजही त्या देवीचीं उपासना आदीम पातळीवर आहे.तिला उदात्त आणि उन्नत भक्तिविचारांचा स्पर्शही घडलेला नाही.विठ्ठल हे नाम जर विष्णूपासून व्युत्पादयाचे असेल, तर विठलाई या नावाचा उलगडा कसा करणार? तेव्हा हे उघड आहे की, विठ्ठल विष्णूरूप बनला आहे--विष्णूचा विठ्ठल झालेला नाही.वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, 'विठ्ठल' हे (विठू)चे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते 'विष्णू' हे विठ्ठल चे (विठू)चे उद्भ्रष्ट रूप आहे.कृत्रिम संस्कृतिकरण आहे.'विठ्ठल' या नावाचा स्पष्ट उलगडा अजूनही व्हायचा आहे.कदाचित या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलस्वरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे.असे ईतिहास संशोधक रा.चि. ढेरे ठामपणे सांगतात.ईतिहास संशोधक रा.चि.ढेरे यांच्या मते,श्रीविठ्ठलाच्या स्वरूपाचाच नव्हे, तर त्याच्या विलक्षण विकसनप्रक्रियेचा वेध घ्यायचा असेल तर विठ्ठलजिज्ञासूंनी शोधायच्या सा-या दिशा साक्षेपाने धांडोळायला हव्यात.विठ्ठलाचा सर्वांगीण शोध घ्यायला प्रवृत्त होताना जिज्ञासूंनी आपली ज्ञानाची शिदोरी समृध्द असल्याची खात्री करून घ्यायला हवी.विविध स्थळ-काळानुसार तसेच नानाविध संस्कृत ग्रंथातुन,संतकाव्यातुन विठ्ठलाची अनेक रूपे सामोरी येतात पंदेवातांचा शोध आणि देवाविषयक मानवी धारणांचा शोध ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबीं आहेत.ह्या दोन्ही बाबींची लक्ष्ये आणि साधनेही वेगळी आहेत.उपरोल्लिखित शोधवाटांचा विचार करता असे कळते की, एक वाट श्रध्देची तर दुसरी चिकित्सेची आहे.तसेच एका शोधाची वाट भावप्रधान तर दुसरी वाट बुध्दीप्रमाण आहे. उदाहरणार्थ म्हसोबा आणि विठोबा या दोन्ही देवांची भक्तांनी केलेली मनोभावना पहा.म्हसोबा देवाला कोंबड्या-बक-याचा नैवैद्य चालतो तर विठोबारायांचे भक्त किड्या-मुंग्यानाही जपतात.त्यामुळे देवसंकल्पना जपणा-या मानवी मुल्यांचा मागोवा घ्यायलाच हवा तरचं भावप्रधानता आणि बुध्दिप्राम्यणता यांतील खरे अंतर कळेल असेही संशोधक रा.चि.ढेरे म्हणतात.
इतिहास संशोधक रा.चि.ढेरे यांचे मनोगत....
गेली आठ शतके मराठी लोकमानसांवर अखंड अधिराज्य गाजवणारे हे सावळे ब्रम्ह उन्मनीच्या अनेक प्रभूंना सकळ स्थिरचरात प्रतीत होत राहीले.हे खरे आहे. त्यांच्या प्रतीतीच्या प्रभेने माय मराठीचे अक्षरन् अक्षर नक्षत्रांची झळाली लेऊन राहीले आहे. त्यांच्या विश्वात्म भावाने मराठी संस्कृतीचे सत्वपोषण घडले आहे.पण या उन्मनीच्या प्रभूंशी जवळीक साधण्याचा, त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचा मला मुळीच अधिकार नाही, याची मला पुर्ण जाणीव आहे.मनाच्या संकल्प -विकल्पांनीच ज्याचे जीवन व्यापलेले आहे.त्याला उन्मनस्क साधुंच्या वाटांवर पाऊल ठेवण्याचा अधिकार नाही याचेही मला भान आहे. त्यामुळे माझे विठ्ठलप्रेम उत्तरोत्तर उत्कट होत गेले आणि यातूनचं ''विठ्ठल: एक महासमन्वय'' या ग्रथांद्वारे मी विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.खरे पहाता,अशा अनेक लेखकांनी त्यांच्या संशोधनपर लेखनातून विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्वत्वे यांत प्र.कृ.उपाख्य आबासाहेब भाटे(बरवे बरवे पंढरपूर),श्रीपादशास्त्री किंजवडेकर(स्मरण चातुर्मास),नागनाथ बा. जाधव (वारकरी स्वाध्याय), राजा मंगळवेढेकर (पंढरीस वाजे घंटा), डॉ.गोपाल बेन्द्रे (THE CITY OF Saints PANDHRPUR) अशा अनेक ज्ञानपिपासू संशोधकांनी विठ्ठलाचा शोध घेण्याचा मार्ग शोधलेले आहेत.विशेषत: काहींना वेगवेगळ्या संर्दभातून विठ्ठल दिसला. त्याचाही येथे मागोवा घेणे जरूरीचे आहे.बुद्धरूपातील विठ्ठलसंशोधक रा.चि.ढेरे यांच्या मते,संतानी एक रहस्यमय उदाहरण दिलेले आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या बुद्धरूपाचे होय. या रहस्यात संतांनी मौनस्थ अन् बौद्ध याचा त्यांनी वांरवांर उल्लेख केलेला आहे.नाही बोलाचाली मौन धरियलेकैसे चाळविलें पुंडलिकेंऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीमौन्य बाक्पुटी धरूनि गे मायहे एकनाथ महराजांनी विठ्ठलाच्या मौनाविषयी अनेकवार सांगितलेले आहे.मात्र हे वाचल्यानंतर आपणास आश्र्चर्य वाटते. कारण जो विठ्ठल भक्तांशी जिव्हाळ्याचे नाते जोडतो तो जनमेळ्यात रमणारा आहे. त्याच्यांशी भावसंवाद करताना स्वत:ला विसरणारा आहे, त्या विठ्ठलाने अठ्ठावीस युगे मौन धारण केलेले आहे.असे नाथांसारख्या अनुभवसंपन्न विठ्ठलभक्ताने वांरवांर म्हणावे,यातूनच असे प्रेरित होते की,संताचास हा मौनस्थ विठ्ठल जेव्हां संतमुखाने स्वत:ला बुद्धही म्हणवून घेतो.तेव्हा असे निश्चित असे वाटते की, तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एका महान युगांतराचा साक्षी आहे.त्यामुळेच विठ्ठलाचे हे क्रांतिकार्य आपण समजून घ्यायला हवे.विठ्ठल रंगात रंगलेली नामदेवांची शिष्या जनाबाई हीने दशावतारांचे वर्णन करताना कृष्णावतारानंतर बुद्धाचे नाम उच्चारले आहे.होऊनिया कृष्ण कैस वधियेलाआतां बुद्ध झाला सखा माझाहा जनाबाईने केलेला बुद्धावताराचा उल्लेख लक्षणीय आहे. 'आता' म्हणजे या वर्तमानयुगात माझा सखा म्हणजे विठ्ठल बुद्ध होऊन अवतरला आहे.ही जनाबाईची श्रद्धा बुद्ध आणि विठ्ठल यांत एकच अनुभवणारी आहे. नाथांनीही आपल्या एका अभंगात विष्णूचा नववा अवतार जो बुद्ध त्याचे वर्णन अगदी स्पष्टपणे विठ्ठ्लरूपात केले आहे. नाथ म्हणतात,नववा वैसे स्थिररूप तया नाम रूप बौद्धरूपसंत तया द्वारी तिष्ठताति निंरतरीपुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठलशोभाकिंवा एका 'गोधंळा' त एकनाथ महाराज म्हणतात,बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवूनपुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडिलाबया दार लाव बौद्धाई बया दार लावविटेवर समचरण ठेवून पुंडलिकाच्या दारी उभा राहीलेला विठ्ठल हा बौद्ध अवतार आहे.अशी स्पष्ट धारणा नाथांनी इथे व्यक्त केलेली आहे.इतकेच नव्हे तर मराठी संत बुद्धाला विष्णूचाच अवतार मानून, त्याचा दशवतारात समावेश करतात अन् त्यालाही विठ्ठलाप्रमाणेच मौनस्थ अन् दिंगबर ही विशेषणे लावतात.बुद्ध आणि विठ्ठल याच्यांतील समन्वयता म्हणजे कोणतेही गुढ नसून अप्रत्यक्षपणे भगवान बुद्धांना स्विकारून त्यांच्या विचारांना सोयीस्करपणे तिलांजली देण्याचा प्रयत्न आहे असेही संशोधक रा.चि.ढेरे ठामपणे सांगतात.मराठी संतांनी वैदिक परंपरेशी आत्मीयतेचे नाते राखलेले असुनही त्यांनी अवैदिक बुद्धाशी विठ्ठाचे नाते का जोडले? विठ्ठल आणि बुद्ध यांना एकरूप मानण्याइतके असे कोणते समर्धित्व त्यांच्या ठायी होते? बुद्धाचे पौराणिक अवतारविशेष माहीत असूनही संतानी आपले परमाराध्य बुध्दरूपात का अनुभवले? विठ्ठलाचे नाते जोडताना त्याच्या धर्माच्या -हासकालीन रूपाविषयी संतानी कोणती भूमिका स्वीकारली? आपल्याला या प्रश्नांची उत्तरे काहीं अंशी या भूमीच्या प्रकृतीतून मिळतात, तर काही अंशी संताच्या समन्वयशील द्दृष्टीतून मिळतात.आपल्या पंरपरेत सहसा काही नष्ट होत नाही. केवळ भिन्न नामरूपाने परिवर्तन पावते.हे आपण विसरता कामा नये.ज्ञानदेव-नामदेवांच्या काळाला निकटपुर्वी सतत हजार-दीड हजार वर्ष सारा महाराष्ट्र भगवान बुद्धाच्या अनुयांयानी व्यापलेला होता. महाराष्ट्रातील अशी एकही पर्वतराजी नाही,की जिथे बौद्धांनी आपल्या गुंफा खोदल्या नाहीत. सह्यगिरीच्या कुशीतील या शेकडो गुंफातून बौद्ध भिक्षू ' बुद्धं सरणं गच्छामि' हा घोष अखंड घुमवित होते.अहिंसेच्या अन् करूणेच्या महामंत्राचे पडसाद मराठी भूमीच्या अणुरेणूतून उमटत होते. राजपुरूषांपासून कृषक- कारागिरांपर्यत सारा या वीतराग-भिक्षूंच्या सेवेसाठी त्याग करायला सिद्ध असल्याचे पुरावे अभिलेखांत आजही उपलब्ध आहेत. भिक्षू हा आदराचा विषय बनलेला होता.त्या आदराची निदर्शक म्हणून भिकोबा अन् भिकूबाई ही स्त्री-पुरषांची नावे खेडोपाडी प्रचलीत होती.हा दहा-पंधरा शतकांचा जनमानसावरील प्रचंड प्रभाव एखाद्या वैदिक धर्माभिमानी प्रज्ञावंताच्या प्रभावाने पूर्णत:पुसला गेला, असे मानणे इतिहाक्रमाशी संवादी नाही.किंबहुना, अशा प्रज्ञावंताला 'प्रच्छन्न बौद्ध' ही शिवी खावी लागली. एवढा तो प्रभाव अमिट असला पाहीजे हे उघड आहे. आचार्यांच्या रचनेत बुद्धस्तुतीचा समावेश पाहताना पांरपारीककुरकुर केल्याचे आपल्याला ज्ञात नाही. सांगावयाचे तात्पर्य असे की, असा हा प्रभावशाली बौद्धधर्म केवळ भिक्षूंच्या स्खलनामुळे अथवा नव्या प्रभावी धर्मसंप्रदयाच्या उदयामुळे मराठी जनमानसातून पूर्णत:पुसला गेला, असे म्हणणे योग्य होणार नाही.या प्रभावाचे पाझर उत्तरकालीन प्रभावी संप्रदयात कुठेतरी वेगळ्या नामरूपांनी झरत असले पाहीजेत, यात संशय नाही. या परीवर्तित अवशेषांचा शोध घेणे हे एक इतिहासकारांना आव्हान आहे. ज्ञानोबा-तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करूणेचा महापूर महाराष्ट्राभर पसरविला, त्या इंद्रायणीचा उगम तथागतांच्या करूणामय जीवीतातून स्फुर्ती घेणा-या असंख्य भिक्षूंच्या निवासभूमीत झालेला आहे, हे सत्य सहजा-सहजी डावलता येण्यासारखे नाही. अर्थातचं ज्ञानदेवपूर्व बौद्ध समाज 'बौद्ध' या नावाने जरी नाहीसा झाल्याचे दिसत असले तरी तो अन्य लोकप्रिय संप्रदयात लय पावला असला पाहीजे,असे मानावे लागते.आणि मग स्वाभाविकपणेच असे मनात येते की, ज्ञानदेव- नामदेवांचा भगवान बुद्धांच्या असीम करूणेचा कुठेतरी अतूट संबंध असला पाहीजे.'जीवातळी जीव अंथरणारे' अन् 'कारूण्यमाजी पाऊलें लपवीत चालणारे' ज्ञानदेव हे कोणत्या आचार्यांना वाट पुसत चालले होते, याचा शोध चालू असतो; पण त्यांच्या कारूण्यगंगेचा प्रवाह कोणत्या गंगोत्रीतून झरत आला आहे. याचा शोध मात्र आपण घेतला नाही.ज्ञानाच्या पातळीवरून भूंती भगवंत पाहणारे अद्वैत जरी या भुमीला नवे नसले, तरी त्या म्हणूनचं ढेरे निसंकोचपणे सांगतात की, महाराष्ट्रात हजार-दिड हजार वर्षापुर्वी बुद्धाने आपल्या ह्दयातील करूणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात इथे उपडा केला.अन् मग त्याची धारा द्दष्ट-पृष्ट होऊन वाहती रहाण्यासाठी संतानी आपल्या भावभक्तीचे अनेक प्रवाह तिच्यात मिळविले.त्यामुळे कालक्रमाने आलेले तांत्रिक विकृतीप्रमाणे आपल्यातले सारे हीन दूर दवडून बौद्ध धर्म भागवत धर्माच्यारूपाने पुन्हा अवतरला.
असाही विठ्ठल
विठ्ठलाचे रूप ज्याला जसे भावले, तसे त्याने रेखीटले.या उक्तीप्रमाणे रा.चि.ढेरे म्हणतात,श्रीविठ्ठलाच्या प्रमुख क्षेत्राशी दिंडीरवनाचा म्हणजे चिंचेच्या वनाचा हा जो संबध आहे. तो केवळ योगायोगाने आलेला आहे, की श्रीविठ्ठलोपासनेच्या मूलधारेशी चिंचेच्या झाडाचे काही विशिष्ट पवित्र नाते आहे.याचाही शोध घ्यायला हवा.असा शोध घ्यावेसे जेंव्हा वाटले तेव्हा ढेरे म्हणतात की, प्रथम त्यांना तिरूपती बालाजी वेंकेटेश ध्यानी आले. कारण श्रीविठ्ठल आणि श्रीवेंकेटेश बालाजी यां दोघांत समधर्मित्व खूपचं आहे.दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिध्द रूपाशी अथवा अवताराशी संबध नसणारे आणि तरीही विष्णूरूप पावलेले आहेत.विशेष म्हणजे सा-या दक्षिण भारतात पुरातन विष्णूरूपांच्याहून अधिक लोकप्रियता ह्यां दोघांनाही लाभलेली आहे. महाराष्ट्रात विठ्ठलास ''बाळकृष्ण'' तर वेंकेटेशला दक्षिणेत ''बालाजी'' या नावाने संबोधले जाते. तसेच विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रूसून बसलेली, तर वेंकेटेशची पत्नी भृगुने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरूचानूरमध्ये रूसून बसलेली होती.तिरूमलैपासून तीन किलोमीटर दूर त्याची पत्नी दूर राहीलेली आहे.तिचे नाव पद्मावती तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे नाव पद्मा.गवळी-धनगरांच्या पंरपरेतील विठ्ठल-वीरप्पाच्या पत्नीचे नाव पदूबाई आहे.आणि तीही पतीवर रूसलेली आहे. किंबहुना तीच पंढरपुरात रूक्मिणी होऊन प्रगटली आहे अशी यादवांची म्हणजेच गवळी-धनगारांची धारणा आहे विठ्ठल आणि वेंकेटेश यांचे साम्य एवढ्यावर संपणारे नाही. या साम्याचा आपण जो- जो वेध घेत राहू, तो-तो आपण अशा निष्कर्षाप्रत येऊ की, हे दोन देव आज वेगळ्या नामांनी ,रूपांनी आणि चरित्रांनी दोन वेगळ्या स्थानी नांदत असले तरी ते मुलत: एकाच लोकदेवाचे भिन्नस्थानीय विकासक्रमांत भिन्न बनत गेलेले उन्नत अविष्कार आहेत. वेंकेटेश हा विठ्ठलप्रमाणेच शस्त्रहीन आहे. मौन आहे आणि डावा हात कटीवर ठेवून उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत राहीला आहे.श्रीविठ्ठलाच्याही दोन चतुर्भुज मुर्ती आढळल्या असून उजवा हात वरमुद्रेत आणि डावा हात कंबरेवर ठेवलेला- अशा ध्यानाच्या त्याच्या मुर्ती दक्षिणेत ज्ञात झालेला आहेत.वेंकेटेशाची अथवा वेंकेटेश ज्या ठिकाणी नांदतो आहे.त्या तिरूमलै या क्षेत्राची जी अनेक संस्कृत माहात्मे रचली गेली आहेत आणि '' पांडुरंगमाहात्म्या'' प्रमाणेच जी पूर्वप्रतिष्ठीत पुराणांशी नाते सांगताहेत.श्रीवेकेंटेश आणि चिंचेचे झाडवेंकेटेशाच्या पावित्रसंभारात चिंचेच्या झाडाचे असाधारण महत्व आढळून येते.हे सांगण्याच्या निमित्ताने विठ्ठल आणि वेंकेटेश यांच्यातील समधर्मीत्वाचे हे दर्शन हेतुत्वाने घडविले असे संशोधक रा.चि.ढेरे म्हणतात.कारण दोन्ही देवांच्या निवासस्थानात चिंचेच्या झाडाचे महत्व तर आढळतेच शिवाय चिंचेचे महत्व देखिल त्यांच्या स्तुतिसुमनांतून आपणास आढळतात.पुराणात असे म्हटले आहे की, वेंकेटेशाचे प्रकटीकरण चिंचेच्या झाडाखालील वारूळातून झाल्याचे सांगितले आहे. चिंदबरम् व तिरूवारूर या तामिळनाडमधील दोन क्षेत्रांच्या परीसरांत असलेल्या दिंडीवनम् \ तिंडीवनम् या स्थानाच्या नावाचे पंढरपूरच्या दिंडीरवनाशी असलेले साम्य आणि चिंदबरम् तिरूवारूर व पंढरपूर या तिन्ही स्थानांचे पुंडरीकपूर हे समान पर्याय नाम असल्याची वस्तुस्थिती याकडे प्रा.माणिकराव धनपलराव यांनी लक्ष वेधल्यामुळे ह्या दोन्ही देवांच्या साम्याबाबत खोलवर जावे अशी स्थिती निर्माण होते हे दुर्लक्षून चालणार नाही.
Subscribe to:
Posts (Atom)