Tuesday, July 1, 2008
पांडूरंग: क्षेत्रनाम
लेखसंशोधनातील सुप्रसिध्द लेखक रा.चि.ढेरे यांनी त्यांच्या '' श्री विठ्ठल:एक महासमन्वय'' ह्या पुस्तकात पांडुरंग या नावाचे महत्व विविध लेखमीमांसाच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सांगतात की, स्कांद ' पांडुरंगमाहात्म्या' तही ' पांडुरंग' हे विठ्ठलाचे पर्यायनाम म्हणून आलेले असले, तरी मुळात ते क्षेत्राचे नाव होते. " पांडुरंग विठ्ठल" हे " काशी विश्वनाथ " यासारखे नाव होते. काशी विश्वनाथ म्हणजे काशीक्षेत्राचा विश्वनाथ असा होतो. हैदराबादमधील तिरूमलै पर्वतावर वेंकेटेशचे मंदिर उभारलेले आहे.मात्र तेथील भक्तांनी तिरूमलै वेंकेटेश असे नामकरण केले. याचा अर्थ असा होतो कि, पुढे-पुढे ही प्रथाचं रूजली गेली. त्या- त्या तीर्थस्थानावरून तेथील देवांचे पर्यायनाम ठरू लागले.पंढरपुर या क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंढरगे. विठ्ठलमंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर असलेल्या, होयसळ नृपती सोमेश्र्वराच्या लेखात (1159) या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या "पंडरगे"या 'पंडरगे' पासूनच 'पांडुरंग' हे देवनाम, पांडुरंग, पंढरपुर-पंढरी हे क्षेत्रनाम व पुंडरीक हे कृत्रिम संस्कृतीकरण करून साधले आहे आणि विठ्ठल या नामाची स्पष्टीकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहील्याचे सांगितले आहे.लोकप्रिय प्रचलित सामग्रीतूनचं माहात्म्यकथा रचली जात असते. असा दैवतशास्त्रज्ञांना वांरवांर सप्रमाण प्रत्यय येत आलेला आहे. विठ्ठलाची विकसनप्रक्रिया याच पध्दतीने घडत राहिली.या प्रक्रियेच्या पुढच्या-पुढच्या अवस्था आपल्याला मांडता येतात; पंरतू विठ्ठलाचे आदिरूप मात्र अजूनही आपल्या दृष्टीक्षेपात येऊ शकलेले नाही. त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी 'विठ्ठल' या नामाची निशं:क व्युत्पत्ती सापडयाला हवी. 'विठ्ठल-वीरप्पा' या नावाने नांदणारी धनगरांची विठ्ठलोपसना धांडोळायला हवी.विठ्ठल हा गवळी- धनगरांचा देव आहे.पदूबाई नावाच्या गवळणबाईचा हा पती आहे. ही वस्तूस्थिती ध्यानी घ्यायला हवीय. 'नग्ना' आणि 'मुक्तकेशी' होऊन विठ्ठलावर भाळलेली एक 'पद्मा' पांडुरंगमाहत्म्यात आलेली आहे. तिची विठ्ठलचरित्रातील उपस्थिती लक्षणीय आहे की नाही, ते तपासायला हवे.विठ्ठल आणि वेंकेटेश हे दोघेही विष्णूरूप आहेत. 'बालाजी' (बालकृष्ण) मानले आहे.या सर्व साम्यांचाही त्यांच्या मूलरूपाच्या शोधासाठी वापर करायला हवा. कृष्णरूप मानला गेलेला,कटीवर कर ठेवून उभा असलेला पश्र्चिम बिहारमधील अहिरांचा देव 'वीर कुवर' (वीर कुमार) याचा विठ्ठलाशी साम्यबंध लक्षणीय ठरेल काय़? हे गांभीर्याने ध्यानी घ्यायला हवे. विठ्ठल शोधाच्या या सर्व संभाव्य दिशा साक्षेपाने चोखळ्यानंतरच आपल्याला विठ्ठलाच्या मुलस्वरूपाविषयी काही सांगता येणे शक्य आहे.अजूनही 'विठ्ठल' या नावाची व्युत्पत्ती समाधानकारक रीत्या देता आलेली नाही. 'पांडुरंग' हे त्याचे दुसरे संतप्रिय नावं दृश्यत: शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूर-गौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक असल्यामुळे त्याची सावळ्या विठ्ठलाशी विसंवादी सांगड का घातली गेली,या प्रश्नाचे उत्तर देता आले ऩाही. 'विदा (ज्ञानेन),ठानू (अज्ञजनान्), लाति (गृहणाति), म्हणजे अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो.तो विठ्ठल होय. अशी 'विठ्ठल' या नावातील प्रत्येक अक्षराला तात्त्विक अर्थ प्राप्त करून देणारी एक व्युत्पत्ती पंरपरेत स्वीकारली गेली आहे.अथवा 'विदी' (ज्ञाने) स्थल:(स्थिर:) म्हणजे 'जो ज्ञानाच्या ठायी आहे तो विठ्ठल होय' ही अगदी कालपरवा पर्यंत सारस्वतव्याकरणाचा हवाला देऊन श्री.वि.कृ.श्रोत्रिय यांनी एक नवी व्युत्त्पती सादर केली आहे. इतिहासचार्य राजवाडे, डॉ.म.अ.मेहदळे,इत्यादी अनेक जुन्या-नव्या अभ्यासकांनी 'विठ्ठल' -नामाच्या व्युत्त्पतीचा प्रयत्न केला आहे.विष्टू-विठ्ठल अशा प्रक्रियेतून विष्णूपासून विठ्ठल हे नाम बनले, हे मत अनेक अभ्यासकांनी स्वीकारले आहे आणि त्याला विठ्ठलभक्तीच्या वैष्णव स्वरूपाची पुष्टीही लाभत राहीलेली आहे.महाराष्ट्रात विठ्ठलाप्रमाणेचं विठलाई या नावाच्या देवीची अनेक ठाणी आहेत.आजही त्या देवीचीं उपासना आदीम पातळीवर आहे.तिला उदात्त आणि उन्नत भक्तिविचारांचा स्पर्शही घडलेला नाही.विठ्ठल हे नाम जर विष्णूपासून व्युत्पादयाचे असेल, तर विठलाई या नावाचा उलगडा कसा करणार? तेव्हा हे उघड आहे की, विठ्ठल विष्णूरूप बनला आहे--विष्णूचा विठ्ठल झालेला नाही.वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, 'विठ्ठल' हे (विठू)चे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते 'विष्णू' हे विठ्ठल चे (विठू)चे उद्भ्रष्ट रूप आहे.कृत्रिम संस्कृतिकरण आहे.'विठ्ठल' या नावाचा स्पष्ट उलगडा अजूनही व्हायचा आहे.कदाचित या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलस्वरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे.असे ईतिहास संशोधक रा.चि. ढेरे ठामपणे सांगतात.ईतिहास संशोधक रा.चि.ढेरे यांच्या मते,श्रीविठ्ठलाच्या स्वरूपाचाच नव्हे, तर त्याच्या विलक्षण विकसनप्रक्रियेचा वेध घ्यायचा असेल तर विठ्ठलजिज्ञासूंनी शोधायच्या सा-या दिशा साक्षेपाने धांडोळायला हव्यात.विठ्ठलाचा सर्वांगीण शोध घ्यायला प्रवृत्त होताना जिज्ञासूंनी आपली ज्ञानाची शिदोरी समृध्द असल्याची खात्री करून घ्यायला हवी.विविध स्थळ-काळानुसार तसेच नानाविध संस्कृत ग्रंथातुन,संतकाव्यातुन विठ्ठलाची अनेक रूपे सामोरी येतात पंदेवातांचा शोध आणि देवाविषयक मानवी धारणांचा शोध ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाबीं आहेत.ह्या दोन्ही बाबींची लक्ष्ये आणि साधनेही वेगळी आहेत.उपरोल्लिखित शोधवाटांचा विचार करता असे कळते की, एक वाट श्रध्देची तर दुसरी चिकित्सेची आहे.तसेच एका शोधाची वाट भावप्रधान तर दुसरी वाट बुध्दीप्रमाण आहे. उदाहरणार्थ म्हसोबा आणि विठोबा या दोन्ही देवांची भक्तांनी केलेली मनोभावना पहा.म्हसोबा देवाला कोंबड्या-बक-याचा नैवैद्य चालतो तर विठोबारायांचे भक्त किड्या-मुंग्यानाही जपतात.त्यामुळे देवसंकल्पना जपणा-या मानवी मुल्यांचा मागोवा घ्यायलाच हवा तरचं भावप्रधानता आणि बुध्दिप्राम्यणता यांतील खरे अंतर कळेल असेही संशोधक रा.चि.ढेरे म्हणतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment