Friday, June 1, 2007

विष्णुपद तीर्थ...

चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाने बांधलेले ३१ फूट परिघाचे व १२ फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिराची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन. 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले, गाई सोडल्या व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलांची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पूल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात 'नारदा'चे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी बांधव पाहतात-.

No comments: