पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरेक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानात मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत, मूर्तीच्या दंडांवर आणि मनगटांवर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याच्या टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांडीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास 'काठी' असे म्हणतात कमरेस वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा 'दिगंबर' म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोंगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच 'वीट' म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. ख-यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.
उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे ह्यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, तो ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते. 1659 साली झालेल्या अफझलखानाच्या स्वारीसारखे संकटप्रसंग जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरजवळच्या गावात हलविण्यात येई, असे दिसते. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे ह्या गावात नेऊन ठेविली होती आणि अफझलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. विजयनगरचा राजा कृष्णराव वा कृष्णदेवराम (कार. 1509-1529) ह्यास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांची विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूरची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती. आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही; परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे 'विजयविठ्ठल' असे नाव आहे. ही मूर्ती विजयनगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठमूर्तीसारखीच दिसते; परंतु ती आकाराने लहान वाटते. भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हातरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.
ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी ह्या आद्य विठ्ठलमूर्तीची विश्वासाई वर्णने कोठे मिळत असल्यास पाहिली पाहिजेत आणि तशी ती मिळतात, असे ह्या विषयाचा अलीकडच्या काळात विशेष आणि सखोल अभ्यास केलेले संशोधक डाँ.रा.चिं.ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे : विठोबाचे पंढरपूरचे माहात्म सांगणारे तीन संस्कृत ग्रंथ (पांडुरंगमहात्म्ये) आज उपलब्ध आहेत. त्यांतील स्कांद पांडुरंगमाहात्म्य आणि पाद्म पांडुरंगमाहातम्य अनक्रमे स्कंद व पद्म पुराणांतर्गत असल्याचा दावा करणारी आहेत. ह्या दोन पांडुरंगमाहात्म्यांचा निर्देश वर आलेलाच आहे. (तिसरे पांडुरंगमाहात्म्य हे विष्णुपुराणातर्गत असल्याचा दावा करणारे असून त्याची एकुलती एक उपलब्ध प्रत डाँ.ढेरे ह्यांच्या संग्रही आहे). ह्या सर्व पांडुरंगमाहात्म्यांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे सर्वात प्राचीन -म्हणजे निवृत्ती ज्ञानदेवांच्याही पूर्वीचे आणि अगदी काटेकोरपणे सांगावयाचे झाल्यास रामदेवराव यादवाचा करणाधिप हेमाद्री ( तेरावे शतक, उत्तरार्ध ) ह्याच्याही पूर्वीचे आहे. ह्या स्कांद पांडुरंग-माहात्म्यास पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पाद्म पांडुरंमाहात्म्याची रचना सोळाव्या शतकात आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणा-या उपर्युक्त पांडुरंगमहात्म्याचीही रचना त्याच सुमारास झाली असावी.
उपर्युक्त स्फांद पांडुरंगमाहात्म्यात पंढरपूरच्या विठ्ठमंदिरातील मूर्तीची जी अनन्यसाधारण लक्षणे सांगितली आहेत. त्यांतले एक म्हणजे त्या विठ्ठलमूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे आहेत. श्रीविठ्ठलांनाच मंत्र तेथे कोरलेला आहे. तेथे विठोबाला 'महामंत्रयुत:' हे विशेषण लावलेले आहे. त्याचप्रमाणे 'देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहवयास मिळतात' अशा आशयाचे स्पष्ट विधानही तेथे आहे. (मंत्राक्षराणि.. दृश्यन्ते तस्य वक्षसि). पाद्म पांडुरंगमाहात्म्यातही 'श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडक्षराम्' । असा षडक्षर मंत्राचा निर्देश आहे. विठ्ठलसहस्त्रनामस्तोत्रात विठोबाला 'षडक्षरमय' म्हटले आहे. विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्तात्रोत 'मंत्राक्षरावलीहत्स्थ:' असे त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी श्रीधर ( 1658-1729) ह्यांनी पंढरीमाहात्म्य ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या एका मराठी पांडुरंगमाहात्म्यात ( एकूण अध्याय दहा) विठ्ठलाच्या हृद्यावरील षडक्षर मंत्राचा कितीतरी वेळी निर्देश केलेला आढळतो. श्रीधर हे पंढरपूरजवळच्याच नाझरे गावचे. पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातली होती. ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी ह्या षडक्षर मंत्राचा निर्देश केला असणे शक्य वाटते. संत सांवता माळी ह्यांनी विठ्ठमूर्तीचे वर्णन करताना आपल्या एका अभंगात 'विठ्ठलाचे रुप अतकर्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्ध ।। असे शब्द वापरले आहेत. अशी मंत्रसिद्ध मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठलमंदिरात नाही; ती माहादाजी निंबाळकर ह्यांनी माढे येथे बांधलेल्या विठ्ठलमंदिरात आहे. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढे येथे नेऊन ठेवली होती व ते संकट टळल्यावर ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली. त्या संकटाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माढे येथे जे विठ्ठमंदिर बांधण्यात आले असे राजवाडे म्हणतात, तेच हे मंदिर, ह्या मंदिरात पंढरपूर येथील आद्य मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे, असे डाँ. ढेरे ह्यांना वाटते. पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या नित्य सहवासात असलेले काशीनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये ह्यांनी रचिलेल्या विठ्ठलध्यानमानसपूजा ह्या स्तोत्रात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे. त्यात मूर्तीच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबा पाध्ये हे 1805 मध्ये निधन पावले हे पाहता पंढरपूरची आद्य विठ्ठलमूर्ती पंढरपूर येथे 1805 पर्यंत तरी होती, असे ढेरे ह्यांना वाटते.
माढे येथील ही मूर्ती पूर्ण दिगंबर आहे. तिच्या मस्तकावर कंगोरा असलेली, गवळ्याच्या टोपीसारकी टोपी आहे. कानांत शंखाकार कुडले आहेत. ती मूर्तीच्या खांद्यांवर टेकलेली आहेत. मूर्तीने धारण केलेल्या दोन माळांपैकी एक गळपासी आणि दुसरी हृदयावर लोंबणारी आहे. ह्या माळेत कौस्तुभमणी आहे. ह्या दोन्ही माळांनी साधलेल्या त्रिकोणात तो मंत्र आहे. मंत्राच्या अखेरीस 'श्रीवास' असा शब्द आहे. कमरेला क्षुद्रघंटिका असलेला पट्टा आहे. डाव्या हातात शंख असून उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकलेला आहे. ह्या हाताच्या बोटात कमळळकी आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दंडांत भुजबंध व मनगटावर कडी आहेत. ह्या मूर्तीच्या माळावर तिसरा नेत्र आहे. हे खास वैशिष्टय, मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोर्या कपाळावरुन मागे, दोन्ही बाजूंना गेल्या आहेत. डाव्या बाजूची दोरी मात्र खाली आलेली दिसत नाही. पंढरपूरप्रमाणेच माढे येथील मंदिरातही विठ्ठल हा एकटा आहे., त्याच्या समवेत रखुमाई नाही.
भाळावर तिसरा नेत्र आणि दिगंबरत्व अशी मूळ मूर्तीची अन्य दोन अनन्यसाधारण लक्षणे स्कांद पांडुरंगमाहात्म्यात सांगितलेली असून ती माढे येथील मूर्तीत स्पष्टपणे दिसून येतात. स्कांद पांडुरंग-माहात्म्यातील वर्णन हे पुंडलिकासाठी पंढरपुरात आलेल्या श्रीकृष्णाच्या रुपान वर्णन करण्यासाठी आलेले आहे व ते माढे येथील मूर्ती दृष्टीसमोर ठेवून केल्यासारखे वाटावे, इतके साम्य त्या वर्णनात आणि माढे येथील विठ्ठलमूर्तीत आहे, असे डाँ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
पांडुरंगमहात्म्यांनी असे सांगितले आहे, की पंढरपुरात विठोबाची तीन रुपे आहेत : एक, प्रत्यक्ष मंदिरातले; दुसरे संपूर्ण पंढरपूराला व्यापून राहिलेले आणि तिसरे, चंद्रभागेच्या प्रवाहाच्या रुपाने अस्तित्वात असलेले. कवी श्रीधरांनी दहा अध्यायांचे पंढरीमाहात्म्य किंवा पांडुरंगमाहात्म्य ( हा छोट्या पांडुरंगमाहात्म्याचाच विस्तार) लिहिले आहे. त्यात विठोबाच्या उपर्युक्त तीन रुपांखेरीज त्याच्या तीन मूर्तीचाही निर्देश आहे : एक, मुख्य स्थानावरील मूर्ती; दुसरी, लक्ष्मीपुढची ( म्हणजेच लखूबाईपुढची) आणि तिसरी, पुंडलिकासमोरची. लखूबाई आणि पुंडलिक ह्यांच्या समोर आज विठ्ठमूर्ती दिसत नाही. मुख्य मूर्तीबद्दल श्रीधरांनी लिहिले आहे ; 'मुख्य जे पांडुरंगस्थान। तेथे न करावे आरोहण।' ' आरोहण' ह्या शब्दातून उंच ठिकाणावर चढून जाण्याची कल्पना सूचित होते. तेथे आरोहण केल्यास दारुण परिणाम होतील, असाही धाक श्रीधरांच्या ओवीतून दाखविलेला आहे. त्यामुळे अगदी आरंभी ही मूर्ती नुसतीच एखाद्या उंचवट्यावर, मंदिर नसलेल्या अवस्थेत होती किंवा काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.
ग.ह.खरे ह्यांच्या मते पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती प्राचीन किंवा मध्ययुगीनही म्हणता येणार नाही, परंतु आधुनिक म्हणजे शेसवाशे वर्षातील ती आहे असेही म्हणवत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment