वारकरी संप्रदाय आणि वारकरी पंथ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. वारकरी लोक ज्या आचरणप्रणालीचे पालन करतात, ज्यामध्ये श्रीविठ्ठलभक्ती प्रमुख आहे त्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. या भागवत धर्माचा पाया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी घातला आणि श्री संत तुकाराम महाराजांनी या धर्ममंदिरावर कळस चढवला म्हणूनच वारकरी पंथाचा नित्यस्मरणी महामंत्र आहे - 'ज्ञानोबा तुकाराम'.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद्भगवद्नीतेवर सर्वजनसुलभ असे प्राकृत भाषेत भाष्य लिहिले. ही ज्ञानेश्वरी हे मराठी वाड्मयातील अनुपम लेणे आहे. भागवतधर्माचा प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. भारतातील भीष्मपर्वात असलेली गीता संस्कृतमध्ये आहे. कुरुक्षेत्रावर महाभारतीय युद्धाच्या प्रारंभी मोहग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचा सदुपदेश केला. त्याच गीतेतील 18 अध्यायांवर ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतून भाष्य लिहिले. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ज्ञानेश्वरीनंतर भागवत धर्मांचे विवेचन करणारे अनेक ग्रंथ संतसत्पुरुषांनी रचले. त्यापैकी नाथ भागवत, रामायण, नामदेवगाथा, तुकाराम गाथा इ. प्रमुख आहेत.
श्री ज्ञानेश्वर व नामदेव महाराजांच्या पूर्वकाळातही विठ्ठल संप्रदाय अस्तित्वात होता यास काही विद्वानांनी शैव संप्रदाय मानले आहे. ज्ञानेश्वर माऊलीनी भागवत धर्म किंवा विठ्ठल संप्रदायाला साधेसोपे स्वरुप देण्याचे महान कार्य केले. त्यांनी समाजातील सर्व वर्णांच्या लोकांना भक्तीची द्वारे खुली केली, सर्व जातीच्या, भाषेच्या, वर्णांच्या लोकांना 'भागवत धर्म' सहजसुलभ केला आहे. या संप्रदायाची आचारसंहिता बनविली. म्हणूनच " ज्ञानदेवे रचला पाया। उभारिले देवालया" असे म्हणतात.
संत तुकाराम महाराजांनी अभंग-संकीर्तनातून संसारातील कर्मे करीत विठ्ठलाचे नाम घेण्याचा उपदेश केला. संत जनाबाईने कर्मपूजा करता करता ईश भजावा हे सूत्र कष्टकरी जनतेला सांगितले. कोणतेही तीर्थव्रत न करता पंढरीची वारी करावी, हा संतानी जनतेला संदेश दिला आणि भक्तभाविकांनी तो आत्मसात केला. भागवत धर्मांचे बहुसंख्य अनुयायी ग्रामीण भागात राहतात. त्यांची श्रीविठ्ठल ही एकमेव देवता आहे. वारकरी पंथ, विठ्ठल पंथ, वैष्णवधर्म किंवा भागवत धर्म या सर्वांच्या शब्दांच्या मागे ही एकच कल्पना साकार आहे. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे गुरु व बंधु श्री निवृतिनाथ महाराज यांच्यापासून हा संप्रदाय सुरु झाला. तुकाराम एकनाथ, नामदेव, जनाबाई इ. अनेकानेक संतांनी या संप्रदायाचा प्रसार केला. या परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय मानले जातात.
महाराष्ट्रातील सर्व संत स्वत:ला विष्णुभक्त किंवा वैष्णव म्हणवितात. शिव आणि विष्णु एकच प्रतिमा आहे असा अनुभव संत नरहरि सोनारांना आला. तोच अनुभव निळोबारायांनाही 'ऐक्यरुपे हरिहर । उभा कटीवर विटेवरी' या शब्दातून व्यक्त केला. समर्थ रामदासांना सावळ्या विठ्ठलाच्या ठिकाणी भगवान शंकर आणि प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले. श्रीविठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे, म्हणून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे लोक श्रीविठ्ठलोपासना करतात. निवृत्तिनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर इ. संत नाथपंथातील अनुग्रहित शैव होते. श्री. ज्ञानदेवांच्या पूर्वजांनीही नाथपंथाचा अनुग्रह घेतला होता. काही इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे शैवक्षेत्र होते. जेव्हा ज्ञानदेवादि चार भावंडे पंढरीस आली तेव्हा वारकरी संप्रदायाची लोकप्रियता पाहून त्यांनी या पंथाचा स्वीकार केला असेही मानले जाते. अशा प्रकारे पंढरपूर क्षेत्र समन्वयाचे तीर्थक्षेत्र आहे, तर भागवत धर्म हे वैदिक धर्मांचे सार आहे. वेद, उपनिदे, गीता, भागवत यांची थोरवी सकल संतांनी अभंगातून गायिली आहे.
वारकरी संप्रदाय हा ज्ञानोत्तर भक्तीचा संप्रदाय आहे, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी श्रवण करणे, विठ्ठलाचे अखंड चिंतन करणे हे या संप्रदायाचे मुख्य कर्तव्यकर्म, आचरण, पण हे सर्व संत वेदांती अथवा निष्कि्य नव्हते तर त्यांनी समाजाला सकि्य भक्तीचा मार्ग दाखविला. महाराष्ट्राचा हा भागवत धर्म विश्वव्यापी आहे. महाराष्ट्रातील नामदेवाही संतांनी तीर्थयात्रा करीत असताना भारतातील अन्य प्रदेशातून विठ्ठभक्तीचा प्रचार व प्रसार केला. गुरुग्रंथसाहेबमध्ये नामदेवांच्या प्राप्त होणा-या रचना याची साक्ष देतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
sunder sankshipt dhawata adhava
Post a Comment