श्रीरुक्मिणी मंदिरात जाताना पाय-या चढून वर गेल्यावर राही व सत्यभामा यांची छोटी मंदिरे आहेत. या मूर्ती सुंदर, सुबक आहेत. शेजारीच रुक्मिणी मंदिराचा गाभारा लागतो. या मंदिराचे मुख्य गाभारा, मध्य गृह, मुख्य मंडप व सभामंडप असे चार भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील बाजूस एक खोली आहे. हे रुक्मिणीमातेचे शेजघर आहे. शेजघराचे दरवाजे चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहेत. यात चांदीचा पलंग गाद्या, गिरद्या व मखमली बिछाना आहे.
गाभा-यात उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव श्रीरुक्मिणीमातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हाक कटीवर आहेत. नित्येपचारानंतर देवीला सौभाग्यालंकार घालून, वस्त्रे नेसवून सजवितात, ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्रीरुक्मिणी मातेची काळ्या गुळगुळीत दगडाची मूर्ती पाहताच भाविकभक्त 'आईसाहेब' 'मातोश्री' असे म्हणून भक्तियुक्त अंत:करणाने तिचे दर्शन घेतात. कंठ दाटून येतो. मातोश्रींची कृपा अखंडपणे लाभावी यासाठी भक्तजन तिची करुणा भाकतात व धन्य होतात.
मातोश्रींचे दर्शन घेऊन बाहेर येताच तीर्थप्राशन करुन उजवीकडून मंदिराच्या मागे जाता येते. तिथून लोक कळसाचे दर्शन घेतात आणि गोपुर दरवाजाच्या आत असलेल्या रुक्मिणी मदिराचा सभामंडपात अलीकडेच लाल पत्थरापासून अत्यंत कलात्मक पद्धतीने बनविलेला आहे. या मंडपामध्ये श्री रुक्मिणी स्वयंवरातील प्रमुख प्रसंगांची सुंदर, भव्य चित्रे पहावयास मिळतात. श्रीरुक्मिणी मातेचे सुंदर भव्य चित्र मन आकर्षून घेते. इथे एक दीपमाळ आहे.
या मंडपात नवरात्रौत्सवात 15 दिवस अऩेकानेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. चातुर्मासात श्रीमद् भागवतपुराण, प्रवचने, कीर्तने होत असतात. नवरात्रौत्सव हा श्रीरुक्मिणीमातेचा प्रमुख उत्सव, या काळात रोज मातेला विविध प्रकारजी पूजा बांधली जाते. सुवर्णालंकार घातले जातात. वसंत पंचमीला 'श्री' सह मंडपात सर्वत्र सुगंधी फुलांच्या माळांची आकर्षक अशी सजावट केली जाते.
श्रीरुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन वर येताच एक ओवरी लागते. या ओवरीतील खोल्यांतून अनुक्रमे काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण-सीता, काळभैरव, रामेश्वर लिंग, दत्त व नृसिंह या लहान पण सुंदर मूर्तीचे दर्शन घडते. ओवरी संपताच सोळखांबीत प्रवेश करण्याचा एक दरवाजा आहे. त्यालगतच लक्षचौ-यांशी देवीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीखाली भिंतीत एक प्राचीन शिलालेख आहे. हा शके 1995 मधील शिलालेख असून यात मंदिराच्या जीर्णीद्धारासाठी देणगी देणारांची नावे आहेत. भक्तमंडळी इथे पाठ घासतात. इथे पाठ घासली की चौ-यांशी लक्ष जन्मांचा फेरा चुकतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. खरेतर हा शिलालेख इतिहास-संशोधनाचे एक साधन आहे. पण श्रद्धाळू लोकांशी पाळ घासून घासून शिलालेख पुसट केला आहे. आता त्या शिलालेखावर लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे.
दर्शनार्थी भक्त लोक सर्व देवतांचे दर्शन घेऊन पुनश्च श्रीविठ्ठालाच्या दर्शनासाठी इथे सोळखांबीत येतात. या सोळखांबी मंडपाला पूर्वाभिमूख 3, दक्षिणेकडे 2 व उत्तरेकडील बाजूस 2 असे 6 दरवाजे आहेत. सावळ्या विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन त्याचे राजस सुकुमार रुप मनी-मानसी साठवून ठेवतात. पुन्हा विठ्ठलभेटची आस मनी बाळगून बाहेर निघतात. उजव्या बाजूस आणखी एक महत्त्वाचा शिलालेख पहावयास मिळतो.
श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भक्तजन महाद्वारी येतात. महाद्वारातून नदीकडे जाताना डाव्या बाजूस श्रीकाळभैरवनाथ, श्रीशनैश्वर, श्रीशाकंबरी देवी व पुढे श्रीखंडोबाची छोटी मंदिरे लागतात. या मंदिरासमोरच नव्याने बांधलेले श्रीसंत नरहरी सोनाराचे मंदिर आहे. तेथील व्यवस्था समस्त सोनार समाज पाहतो. या मंदिराच्या मागे फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. जवळच श्रीमल्लिकार्जुनाचे सुंदर हेमाडंपती मंदिर आहे. प्रसिद्ध संत नरहरी सोनार याच शिवलिंगाची पूजा करीत असत. इथे जवळच त्यांचे घर व दुकान होते. नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. पुढे त्यांना श्रीविठ्ठलाच्या कृपेने श्रीविठ्ठलाच्या मूर्तीत भगवान शंकराचे दर्शन झाल. नरहरी अद्वैतावस्थी झाले. शैव व वैष्णव संप्रदाय एक झाले. या भेटीची खूण म्हणूनच श्रीविठ्ठलाचे मस्तकी शिवलिंग आहे असे म्हणतात. या महाद्वाराच पूर्वी फार मोठी वेस होती. रस्तारुंदीकरणात ती पाडली गेली. वेशीशेजारी असलेले अकरा रुद मारुती मंदिर रस्त्यालगत पुनश्च जसेच्या तसे वसवले आहे. मारुतीपुढे नंदी आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment