Thursday, June 14, 2007

पंढरीची वारी (आषाढी यात्रा) .....

स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादि कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. या सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत व अन्य मार्गाने सुमारे 5 ते 6 लाख लोक पंढरीत येत असतात. पंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. चंद्रभागा नदी यात्राकाळात दुथडी भरुन वहात असते. आल्हाददायक वातावरण झालेले असते. वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होते. हजारो लोक पालखीला सामोरे जातात. साधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अनिर्वचनीय असतो. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होतात. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
या यात्रेपूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदी, देहू, पैठण, शेगाव इ. संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरास येतात.
आषाढ शु. 9 ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरी येथील संतनगरात मुक्कामास येतात. दशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होते. रिंगण-सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो, संतांचा अश्व वर्तुळाकार नाचत असतो, धावत असतो व त्यामागे वारकरी धावत असतात. रिंगण-सोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखी श्रीज्ञानेश्वर महाराजांची. या पालखीचा प्रथम क्रमांक असतो. दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतो. तिसरा क्रमांक पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालकीचा. चौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांची, पाचवी सोपानदेवाची, सहावी एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखी. या प्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात. संतनगर (वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणा) हून आषाढ शुध्द दशमीला सकाळी 10 च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करु लागते. पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी पालखी असते. श्रीज्ञानेश्वर महाराजांची; ती रात्री 10-11 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येते. अन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातात. आषाढ शुध्द एकादशीला यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंदन व बुवक्याची नाममुद्रा लावतात. गळयात तुळशीची माळ व टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत, क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दर्शन बारीत 8-10 तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतात. वारी पूर्ण करतात. दुपारी 2 च्या दरम्यान श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र-प्रदक्षिणेसाठी निघतो. माहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडा) श्रीविठ्ठल-रुक्मिणी व राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या मूताअना सोन्याचे पाणी दिले ाहे. सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठल-रुक्मिणी-राहीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. ज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही, त्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होते, समाधान मिळते. हा रथ भक्तभाविक ओढत असतात. रथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलत असतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर लोकांची झुंबड उडते. लोक रथावर खारीक, बुक्का, लाह्या, पैसे उधळतात. ठिकठिकाणी रथ थांबवतात. परंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो. आनंद होतो. ही परंपरा (प्रथा) सुरु होऊन सुमारे 190 वर्षे झाली आहेत.
आषाढ शुध्द पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. क्षेत्राच्या दक्षिणेस सुमारे 1 ते 1॥ कि.मी अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून दिंडया, पालख्यांची गर्दी होते. दुपारी 10 ते 12 च्या सुमारास तिथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकांना वाटता जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. एकमेकांच्या मुखात लाह्यांचा दहीकाला घालून नामस्मरणी दंग असलेले वारकरी 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला' असे म्हणत उपाउरी भेट घेतात. ''पंढरीच्या लोक नाही अभिमान । पाया पडती जन एकमेका ॥'' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतात. सान-थोर, उच्च-नीच भेद संपतो. सर्व भाविक, वैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारी' परिपूर्ण झाल्याच्या आनंदात आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात. पंढरीत यात्रेसाठी येताना आणि यात्रा पूर्ण झाल्यावर गावी परत जाताना जागोजागी मुक्काम करुन नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडाचे कार्यक्रम करुन हरिजागर करीत असतात. पालखी सोहळयातील विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, घोडेस्वार इत्यादि बाबतींतली संपूर्ण व्यवस्था संस्थानच्या मार्गदर्शनाखाली पाहिली जाते. या व्यवस्थेत आवश्यकतेनुसार होणारे बदल आळंदी देवस्थान पंचकमिटी, वारकरी महामंडळ व जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार केले जातात. दिंडया व पालखी परती मार्ग, याचे नियम याच पध्दतीने ठरविले जातात. अलीकडे पालखीसमवेत येणा-या यात्रेकरुंच्या दिंडयांच्या संख्येत वाढ होत आहे.
आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दुसरे दिवशी 'महाद्वार काला' होतो. प्राचीन काळी पंढरपुरात कान्ह्या हरिदास नावाचे श्रीविठ्ठलाचे अनन्यभक्त होऊन गेले. रोज पहाटे काकड आरतीला. मंदिरात भजने, पदे, आरत्या म्हणून ते सेवा करीत असत. ( आजही त्यांचे वशंज ही प्रथा पाळून रोज श्रीविठ्ठलांचे पुढे गायनसेवा करीत असतात) श्रीविठ्ठलाचे प्रसन्न होऊन त्यांना स्वत:च्या पादुका दिल्या अशी आख्यायिका आहे. श्रविठ्ठलमंदिराजवळ हरिदास वेशीकडे जाताना श्री. हरिदास यांचा स्वत:च्या मालकीचा वाडा आहे. त्याला ' काल्याचा वाडा' म्हणतात. या वाडयात श्रीविठ्ठलाच्या याच चांदीच्या पादुका आहेत. आषाढ व कार्तिक यात्रेच्या पौर्णिमेच्या दुसरे दिवशी या पादुका वै.कान्ह्या हरिदासाचे वंशजांच्या मस्तकावर बांधल्या जातात. या पादुका त्यांच्या मस्तकी ठेवण्याचा मान संत नामदेवरायांच्या वंशजाकडे आहे. पादुका मस्तकी ठेवताच श्री. हरिदासांची शुध्द हरपते. ते समाधी अवस्थेत जातात. नंतर टाळमृदुंगाच्या नादघोषात व नामघोषात मिरवणुकीने श्री. हरिदासांना खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात जातात. मंदिरातील सभामंडपात काला खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा केल्या जातात. दहीहंडी फोडली जाते. ही मिरवणूक (काला) महाद्वारातून निघतो. जाताना पादुकींवर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू व लाह्यांचा वर्षाव होतो. महाद्वार घाटाने ही मिरवणूक खाली चंद्रभागेच्या भेटीसाठी जाते. पवित्र जल उडवले जाते. तेथून कुंभार घाटाने मिरवणूक माहेश्वरी धर्मशाळेत जाते. तेथून रामायणे गेटवरुन मुक्ताबाईच्या मठावरुन हरिदासवेशीतून पुन्हा वाडयात येते. मार्गात हरिनामाचा गजर व अबीर-गुलालाची उधळण होते. दहीहंडया फोडल्या जातात. भाविक लोक श्रीविठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतात. काला वाडयात आल्यावर महाआरती होते. सर्वांना काला वाटला जातो. महाप्रसाद होतो आणि यात्रेची या सोहळयाने परिपूर्णता-सांगता होते.
आषाढी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळाला 'चातुर्मास' म्हणतात. या चातुर्मासात मठातून, मंदिरांतून फड, वाडयातून श्रीविठ्ठलोपासना ( भजने, प्रवचने, कीर्तने, पारायणे, भारुडे इ. च्या माध्यमातून) केली जाते.
प्रमुख संतांच्या पालख्यांशिवाय अन्य अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरात आषाढी यात्रेसाठी येत असतात.
श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात.


- डाँ. अरुण शं वाडेकर

1 comment:

Rupesh said...

सुन्दर प्रयत्न