चंद्रभागा नदीच्या पैलतीरापासून नामदेव पायरीपर्यंत सुंदर कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप...या मंडपात दोन्ही बाजूंना

उंच ओव-या...नदीच्या दोन्ही तीरावर नऊ-नऊ असे अठरा घाट...त्यांना गीतेतील अठरा अध्यायांची नावे...असा भव्यदिव्य प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी - देहू परिसर विकास समितीचे मुख्य प्रवर्तक वि. दा. कराड, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर प्रयत्नशील आहेत. .........हा प्रकल्प स्थानिक पालिका प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून लवकरच पंढरपुरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरची वाटचाल आता ज्ञान तीर्थक्षेत्राकडे सुरू झाली. विकास समितीच्या संकल्पनेनुसार आळंदी, देहूनंतर पंढरपूरचा असा विकास करण्याचे नियोजन १९८६ मध्ये झाले होते. त्यानुसार आता लवकरच हा प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी गतिशील प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पानुसार चंद्रभागा नदीच्या पैलतिरापासून नामदेव पायरीपर्यंत कोणाचेही घर, मठ अथवा दुकान न पाडता सुंदर व कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप उभारण्यात येणार आहे. मंडपात पहाटेपासून रात्रीपर्यंत सुंदर अभंग व नादमधुर संगीत ऐकविण्यात येतील. नदीच्या दोन्ही तीरावर सर्व घाटांना विविध संतांची नावे देण्यात येतील. घाटाच्या दोन्ही बाजूला १२० फूट रुंदीचे रस्ते कुणाचेही घर, मठ न पाडता तयार करण्यात येतील. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना २०-२० फुटांचे फुटपाथ व मधोमध ८० फुटांचा रस्ता असेल. या रस्त्याच्या भूयारात भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि मुताऱ्या बांधण्यात येतील. यामुळे पवित्र चंद्रभागा नदी आणि वाळवंटातील घाणीची समस्या थोडीफार कमी होण्यास मदत होईल. तसेच या रस्त्यावर गोमुखाद्वारे चंद्रभागा नदीचे तीर्थ देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना श्री. कराड म्हणाले, ""जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या प्रकल्पासाठी बौद्धिक योगदान दिले आहे. आता स्थानिक केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी मंजुरीची आवश्यकता आहे. हे धार्मिक नव्हे तर सामाजिक काम आहे. यातून अनेकांचे आरोग्य चांगले राहून कल्याण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे.''
- संजय पाठक (सकाळ वृत्तसेवा )
No comments:
Post a Comment