श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन सोळखांबीत येऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहरे पडताच अनुक्रमे अंबाबाई (नारदमुनी, परशुराम, आता या मूर्ती मुक्ती मंडपात बसवल्या आहेत. ) उजव्या सोंडेच्या गणपती यांचे दर्शन घडते. पुढे तरटी दरवाजाच्या आत पायऱ्यांजवळ संत कान्होपात्रा समाधिस्थान आहे. कान्होपात्रा नायकीण होती. तिने विठ्ठलभक्ती केली आणि विठ्ठलाने तिला आपलेसे केले, अशी आख्यायिका आहे. समाधीवर तरटीचे झाड आहे. तसेच पढे गेल्यावर भगवान व्यंकटेशाचे छोटे मंदिर आहे. ही अतिशय सुंदर, चतुर्भुज मूर्ती गंडकी शिळेची आहे. ''व्यंकटरमणा गोविंदा'' अशी आरोळी ठोकून भक्तजन व्यंकटेशाच्या चरणी माथा टेकवतात. त्याला उजवे घालून जाताना डाव्या बाजूच्या भिंतीत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. व्यंकटेशाला प्रदक्षिणा घालून खाली उतरताना बाजीराव पडसाळी (ओवरी) लागते. या सभामंडपात विविध कार्यक्रम सदैव होत असतात. तसेच याच मंडपात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे रोज सकाळी मोफत खिचडी, ताक व बुंदीच्या लाडूच्याा प्रसादाचे वाटप केले जाते. त्याला लागूनच श्रीमहालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णेची मूर्ती आहे व एक खांबावर नृसिंहाची मूर्ती आहे.
बाजीरावाच्या ओवरीत रामेश्वर, खंडोबा, गणपती, नागोबा व श्रीकृष्ण यांच्या छोटया सुरेख मूर्ती आहेत. तिथून पुढे जाताना डाव्या हाताला पश्चिमद्वार आहे. पुढे नवग्रहाचे मंदिर आहे. हा भाग श्रीविठ्ठलाच्या गर्भगारामागे येतो. इथेच एक बाजूस श्रीदत्त, सूर्य व चिंतामणी यांच्या मूर्ती आहेत. याच्या पुढे गेल्यावर श्रीरुक्मिणीमातेचे मंदिर लागते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment