Tuesday, May 29, 2007

विठोबाचे पंढरपूरातील प्रकटन

पंढरपूरात विठोबा कसा प्रकटला ह्याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक ह्या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वर्कुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला. 'आईवडिलांची सेवा करतो आहे: ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब' असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे. पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा सांगण्यात आल्या आहेत.: (१) डिंडीरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने माल्लिकार्जुन शिवाचे रुप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. (२) कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रुक्मिणी रुसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली; तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करुन रुक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपूरजवळ असलेल्या गोपाळपुराला वारक-यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे वाडीवजा गाव आहे. तिथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर वारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनधड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तिरुप आहे. कृष्णावर रुसून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. (३) पद्मा नावाच्या एका सुंदर तरुण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरु केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रुप धारण करुन तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रुपाला तिला मोह पडला, तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने 'मुक्तकेशी' नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला 'नग्ना' आणि 'मुक्तकेशी' अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावंती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजा-यांकडेच आहे. ह्या कथापैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रुक्मिणीची कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कांद आणि पाद्म अशा दोन्ही पांडुरंगमाहात्म्यांत आलेली आहे. ही पांडुरंगमाहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.
विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूर येते कधी सुरु झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवा विट्टिदेव किंवा विट्टिग (बारावे शतक) ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग.ह.खरे ह्यांचा तर्क आहे. स्वत:च्या नावापासून तयार झालेले 'विठ्ठल' हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग.ह.खरे ह्यांना वाटते.

No comments: