Friday, July 27, 2007

पुंडलिकाचे व्दारी, उभा विटेवरी ...!

पुंडलिकाचे व्दारी, उभा विटेवरी ...!
'धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये॥'

संत तुकारामाच्या या अभंगामध्ये भक्त पुंडलिकाचे महात्म्य सांगितलेले आहे. 'निधान' म्हणजेच प्रत्यक्ष पांडुरंग पंढरीत आला तोच मुळी आपल्या लाडक्या भक्तास-पुंडलिकास भेटण्यासाठी. 'युगे अठ्ठावीस विटेवर उभा' असं जरी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत म्हणत असलो तरी तो भाग श्रध्देचा आहे. कारण पांडुरंगाला अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले . त्या पुंडलिकालाही तितकेच प्राचीन मानायचे का ? मुळीच नाही. पांडुरंगाला पंढरपूरात पुंडलिकाने आणले याबाबत दुमत नाही. त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती तिच्या उपासनेचा काळ तोच पुंडलिकाचा काळ ठरतो. इसवीसन बाराव्या शतकाच्या सुरवातीस महाराष्ट्रातील पंढरपूरास तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त होवून पांडुरंगाचे भक्त पंढरीची वारी करु लागले आणि याच दरम्यान पुंडलिकाचेही महात्म्य विशेष वाढले होते.
वारकरी पंथातील भक्तांची अशी श्रध्दा आहे की प्रल्हादा साठी जसा नरसिंहाचा अवतार झाला तसा भक्त पुंडलिकाकरिता पांडुरंगाचा अवतार झाला. याचाच अर्थ इ.स.बाराव्या शतकाच्या सुरुवातीचा महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या उपासनेचा जो काळ तोच पुंडलिकाच्याही मानावा लागतो. अठ्ठावीस युगे ही फक्त 'श्रध्दा' आहे 'इतिहास' नव्हे !
पुंडलिकाचे पूर्वायुष्य -
लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विव्दान ब्राह्मण रहात होता. अत्यंत सज्जन व सदाचारी. ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक.
'शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।'
असं जरी संतवचन असलं तरी हा पुंडलिक त्याला अपवाद होता. अक्षरशः हि-याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा दिवटा कुलदीपक ! आईवडिलांना दुरुत्तरे करणे , थोरामोठयांना उपमर्द करणे , मन मानेल तसं वागणे, वाईट मुलांच्या संगतीत रमणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. अशा वायात मुलाला वठणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी त्याचे लग्न करुन दिले. बायकोमुळे तो सुधारेल ,व्यवस्थित वागेल. अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. पण झाले उलटेच.
'आधीच मर्कट,त्यातही मद्य प्याला'....
अशी त्याची अवस्था झाली. पुंडलिक चक्क स्त्रीलंपट बनला! हा करंटा काय आपल्या वार्धक्याची काठी बनणार? स्वतःचे जन्मदाते मातापिताच त्याला अडचीणचे वाटू लागले. पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच अन् कशाचीच पर्वा वाटत नव्हती. 'आगीतून उठले अन् फुफाटयात पडले' त्याचे आईवडिल पुंडलिकाला वाटत असे. मरत का नाहीत बरे हे लवकर एकदाचे ? आपल्या मागची ब्याद तरी टळेल !
पुंडलिकाचे ह्रदय परिवर्तन -
एकदा आपल्या अंधःकारमय जीवनाचा विचार करत असतानाच जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड -गोंधळ चाललेला ऐकू आला. उत्सुकतावश पतीपत्नी बाहेर जावून पहातात तो काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्तांचा मुक्काम लोहदंड गावी पडलेला. त्यात म्हातारे होते अन्तरुणही होते. तरुण पोरे आपापल्या वृध्द मातापित्याची सेवा करत होते. ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना त्या वृध्दांचा केवढा हेवा वाटला असेल नाही ? आपल्या भाग्यात असे सुख कुठले ? पण का कोण जाणे पुंडलिकही त्या समुदायात सामील झाला आणि त्यालाही काशीला जावेसे वाटू लागले. मग तसे घरात बोलून दाखविताच त्याची बायकोही तयार झाली. त्याचे आईवडिलही त्याच्यामागे लागले. तेंव्हा धुर्त अन लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरविले. सर्वजण काशीला निघाले. त्याकाही प्रवासाच्या अन्य सुविधा गरिबां साठी नव्हत्या. पायीच प्रवास करावा लागे. वृध्द मातापिता चालू तरी किती शकणार ? त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेंव्हा पुंडलिकाने काय करावे ? आपल्या तरुण बायकोला घेतले स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळयात बांधल्या दो-या अन् लागला त्यांना ओढत न्यायला ! सकल तीर्थे ज्यांच्या पायासी येवून मिळतात त्या आईवडिलांच्या गळयात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला 'पुण्य' मिळविण्यासाठी.
पुंडलिकाची वाट चुकली -
पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांनी अन् त्याची चुकामुक झाली. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. पोहोचला कुठला ? नियतीनेच त्याला तेथे खेचून आणले ! कुक्कुर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटते. पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतलेले अन् वृध्द मातापित्यांच्या गळयात दोर बांधलेले स्वामींनी पाहीले होते. ते पुंढलिकाला म्हणाले, '' मी माझ्या आई-वडिलांमध्येच शिव-पार्वती पाहतो. आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र ! '' पुंडलिकाच्या वर्मी द्याव बसल्या सारखे झाले. तो खजिल झाला. अंतर्मुख झाला. बायकोला खांद्यावरुन खाली उतरवलं. थंड पाणी प्यायला दिलं. रात्री पुंडलिकाने शुध्द अंतःकरणाने आपल्या आईवडीलांची क्षमा मागितली. मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. तिघांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले ! 'अश्रू' कसले. त्या तर होत्या पवित्रमच गंगा-यमुना ! बदलला, पुंडलिक पूर्णतः बदलला. अंतबार्ह्य बदलला 1 अखेर त्याच्यातील 'देवत्वा'ने राक्षसत्वावर मात केली ! स्त्रीलंपट पुंडलिक, भोगललोलूप पंडलिक निस्सीम निमित्त मातृपितृ भक्त बनला ! वाल्याचा जणू वाल्मिकी बनला !!
भगवंत प्रसन्न झाला-
पुढे पुंडलिकाने आपल्या वृध्द मातापित्यांना काशी तर घडवलीच पण पंढरपूरासही आणले.
'अन्य क्षेत्रं कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति ' या उक्तीनुसार पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली. वाल्याचा जसा वाल्मिकी बनला होता तसा भोगी पुंडलिक आता योगी बनला होता !
एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृभक्तीही श्रीकृष्णाला पहायची होती. आजमायची होती. भगवंत पंढरीत आले. पंडुलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पहातात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करणउयात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता.
'देव भावाचा भुकेला । सोडूनी आला वैकुंठाला ॥''
आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हाललाही नाही. आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा ? त्याने बसल्या जागेवरुनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले. सेवेचं व्रतही मोडता येईना अन् भगवंताच्या स्वागताचा गृहस्थधर्म ही पाळता येईना. पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळचं पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईतोपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं रहायला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठूराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवर उभा राहिला. ख-या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात ! कबिराचे शेले विणू लागतात ! दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ ! पुंडलिकाची असीम मातृपितृभक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला 'वर' माग म्हणाले. तर त्याने काय मागावे ? पैसा ,धनदौलत ? शेती वाडी ? भक्त पुंडलिकाने विचार केला. लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असं काही तरी मागावं तो म्हणाला,' देवा ! मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको ! मला फक्त तू हवा आहेस ! आत्ता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथचं सतत उभा रहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे !'' देव म्हणाले 'तथास्तु' ! आणि तेव्हापासून हे विटेवरलं परब्रह्म कमरेवर हात ठेवून 'अठ्ठावीस युगे' म्हणा की सातशे वर्षे म्हणा- भक्तांचं कोड पुरवित आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे ! त्याचे पाय 'समचरण' आहेत. सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पहातो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्वदृष्टी प्राप्त करुन घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती!
-दै. पंढरी, पंढरपूर

श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण: आध्यात्मिक दीपस्तंभ !

ईश्वर निष्ठांची मांदियाळी असलेल्या भागवत् सांप्रदायातील संत महंतांनी आचार, विचार, उच्चार,भक्ती, श्रध्दा, प्रेमभाव, नम्रता, शांती, समभाव, च्यारित्र्य सुचिर्रभुतता या संस्कृतिप्रीय मुलतत्वावर आधारलेले साहित्य साधकासाठी, भक्तासाठी, अभ्यासकासाठी, चिंतनकासाठी निर्माण केले. वेदापासून अगदी काल परवा पर्यंत आध्यात्म शास्त्रावर आधारीत साहित्य निर्मितीने एक वैचारिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. हे परिवर्तन समाज सुजाण वैचारिक संपन्न व गुणसमुच्चयानी नटलेला ,थाटलेला इतकेच नव्हे तर चिंतनशील झालेले दिसते. भगवद्गीतेसारखा तत्वज्ञानाच्या हिमशिखरावर बसलेल्या ग्रंथाचे विवरण करणारे साहित्य विपूल प्रमाणात निर्माण झाले. पण अधिष्ठीत देवता असलेल्या श्री भगवंताला आनन्य भावाने शरण जावून जे विष्णुसहस्त्रनाम तत्वज्ञानाच्या रुपाने सांगितले गेले ते सश्रध्द भाविकापर्यंत पोहोचविण्याची साहित्य निर्मिती क्वचित आढळून येते. गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात श्री विष्णुसहस्रनामावर अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आणि अगम्य असे विवरण करण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो नाशिकचे काव्यतीर्थ, आचार्य वेदान्तवाचस्पती श्री ह.भ.प. जगंन्नाथ महाराज पवार यांनी.
11 नोव्हेंबर 2006 रोजी श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ग्रंथाचे पहिले पाच खंड माझ्या हाती पडले. हा ग्रंथ वाचत असताना श्री पवार महाराजांनी केलेला हा प्रयत्न भागवत् सांप्रदायाच्या अभ्यासकासाठी एक पर्वणीच नव्हे तर उपकारकारक ग्रंथ ठरावा असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. हा ग्रंथ वाचत असताना सगळयात महत्वाचे काय असेल तर शरानी शीर्ण जखमी झालेल्या भीष्माचार्यांच्या तोंडून श्री भगवंताच्या आदेशावरुन श्री विष्णुसहस्त्रनामाचे प्रगटीकरण धर्मराजाच्या समोर झाले नव्हे तर धर्मराजाकरीता झाले त्यावेळचे ते भावविश्व त्यावेळचे ते दृश्य हा ग्रंथ वाचत असताना वाचकाच्या समोर जसेच्या तसे उभा राहते. हे या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे. जी साहित्य निर्मिती वाचकाच्या भावविश्वाला भावनीक नाते जोडायला लावते ती साहित्य निर्मिती अजरामर तर होतेच शिवाय त्या साहित्य निर्मितीने सामाजिक जागरणाची प्रक्रियाही घडते. या जातीतलेच श्री पवार महाराजांची ही साहित्यकृती आहे असा माझा विश्वास झाल्यानंतर दै.'पंढरी संचार' च्या माध्यमातून ती वाचकाच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तर उचित ठरले. या भावनेनी गेल्या वर्षभरापासून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण ग्रंथातील क्रमशः थोडासा उतारा प्रसिध्द होत आहे. याला वाचकानी जी दाद दिली ती मोठी विलक्षण वाटली. विष्णुसहस्त्रनामाच्या पहिल्याच नमन प्रकरणात ह.भ.प.पवार महाराज म्हणतात,' विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र हे कलियुगातील जीवासाठी आवश्यक असे साधन आहे. कारण कृत, त्रेत आणि व्दापार या तीन्ही युगात अनुक्रमे भगवंताचे ध्यान यज्ञ आणि पूजा या साधनांनी सफलता लाभत असे. दोष संपन्न अशा कलियुगात मात्र कामक्रोधादि विकाराने कलुषित असलेल्या जीवांना चित्ताची एकाग्रता व अन्य सामग्री यांच्या आभावामुळे वरील उपयांचे अनुष्ठान अशक्य प्राय आहे. सर्व साधनांचे सार सर्व दुःखनिवारक, साधे, सोपे , सरळ नी सुलभ असे भगवंत नामसंकिर्तनच त्यांना एैहिक पारलौकिक व निरतिशय अशा मोक्ष सुखाची प्राप्ती करुन देणारे आहे.'
ह.भ.प.पवार महाराजांनी आपल्या या प्रास्ताविकात व्यक्त केलेल्या विचारावरुन या ग्रंथाचे महात्म्य किती पराकोटीचे, उंचिचे आणि परमभाग्यनिर्मितीचे आहे याचे भान वाचकाला आल्याशिवाय रहात नाही.
बाणशय्येवर भगवंताचे नामस्मरण करीत असलेल्या भीष्माने धर्मराजासह भेटायला गेलेल्या श्रीकृष्ण भगवंतास नम्रपणे सांगितले, 'देवा माझे मन,बुध्दी इत्यादी सर्व तुला वाहिले आहे.शरीर हे शरांनी शीर्ण जखमी झाले आहे असंख्य वेदनांनी मला सदैव मर्ुच्छापन्न केले आहे आता केवळ तुझे स्मरण करीत मी उत्तरायणाची वाट पहात जीवंत आहे. या भीष्माच्या विनंतीवर आपण धर्मराजास सर्व धर्माचा उपदेश करा, आपले क्लेश ,कष्ट, वेदना, मोहादी सर्व नष्ट होतील. यावर धर्मराजाने भीष्मास धर्मविषयक काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे दिल्यानंतर सर्व धर्मश्रेष्ठ असा धर्म कोणता ? हे विचारल्यानंतर त्यास उत्तर म्हणून भीष्माने जे दिले तेच हे विष्णुसहस्त्रनाम होय. विष्णुसहस्त्रनामाचे बीज नेमके कुठे आहे याची उकलसुध्दा अत्यंत सुचक शब्दात ह.भ.प.पवार महाराजांनी केल्याने श्री विष्णुसहस्त्रनामा बाबत जी उकल होते ती नवीन साधकाच्या दृष्टीने महत्वाची वाटते.
ह.भ.प.जगंनाथ महाराज पवार हे वारकरी सांप्रदायातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहेच शिवाय श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संतांच्या विचाराचा धागा पकडून सर्व सामान्य भाविकावर मार्गदर्शनाचा अमृतकुंभ रिता करणारे उत्कृष्ट धार्मिक मार्गदर्शकही वाटतात. आजकाल वारकरी सांप्रदयात संतांनी घालून दिलेल्या शिस्तीचा विचार सांप्रदायाची मुलभुत तत्वे भल्याभल्याकडून बाजूला ठेवली जावू लागली आहेत. दाभिंकपणा ,शिष्टाचार आणि संत विचाराच्या तत्वज्ञानावर पोटार्थी होण्याची भावना संत लावून घेणा-या अनेकांच्या अंगी जी शिरलेली दिसते या विचारधारेला ह.भ.प.श्री.पवार महाराज यंानी पुर्णपणे छेद दिलेला दिसतो. संतांचे तत्वज्ञान हे साधकाचे ,भक्ताचे वारक-यांचे आत्मतत्वज्ञान झाले पाहिजे त्यासाठी समाजाला जे मार्गदर्शन केले पाहिजे ते मार्गदर्शन करणाराही तीतकाच तत्वज्ञानाचा परमभक्त असला पाहिजे.हे गृहीत सत्य आजकालचे सांप्रदयातील दंभाचारी विसरुन जावू लागलेले आहेत. हे सांप्रदायाचेच दुर्दैव म्हणावे लागेल. रस्त्याला कडेला लागलेले बोर्ड कीर्तन-प्रवचनासाठी उभारलेले पेंडॉल ,मिळत असलेला मान मरातब समाजाने प्रतिष्ठेची घातलेली झूल या सगळया प्रलोभनात आमचा सांप्रदायीक अभ्यासक आणि मार्गदर्शक हरवलेला दिसत आहे. अशा या यावातावरणात संतांच्या तत्वज्ञानावर पोट भरण्यापेक्षा समाजाची आध्यात्मिक भूक भागविण्याचा आपल्यापरिने प्रयत्न करणारे जे सुचिर्भुत संत-महंत आणि अभ्यासक आहेत. त्यात ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांचा समावेश आहे असे विश्वासाने वाटते आणि हाच धागा पकडून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ही पाच खंडामध्ये त्यांनी प्रसिध्द केली. ग्रंथातल्या प्रत्येक पानावर आधात्मिक अनुभूती आणि ईश्वराविषयी असलेली श्रध्दा वृध्दींगत करणारी भावना वेगळी प्रचिती देवून जाते. हे या पाचही खंडाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे.
श्री.ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विष्णुसहस्त्रनाम् मातृ-पितृसेवा मंदिर बांधण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. वीटेवर उभा असलेला श्री पांडुरंग भक्तीच्या तालावर खुळखूळू वाहणारी चंद्रभागा, अजूनही 28 युगं दर्शनासाठी आतूर झालेला पुंडलिकराय हे जसे या पंढरीचे वैभव आहे असेच एक वैभव चंद्रभागेच्या तीरावर मातृ-पितृ सेवा मंदीराच्या प्रकल्पाच्याव्दारे साकार होत आहे. सत्य संकल्पाचा दाता हा साक्षात नारायण असतो श्री पवार महाराजांनी अत्यंत कष्टातून असंख्य व्यावधानातून लोकांच्यापुढे दया याचना करुन उदार आश्रय दात्यांच्या आधारावर हा प्रकल्प राबविण्याचा जो प्रयास चालू केला आहे हे काम त्यांच्या बौध्दिक कतृत्वापेक्षा त्यांची अध्यात्मिक उंची सिध्द करणारा असा आहे.
श्री विष्णुसहस्त्रनाम ग्रंथाचे दहा खंड प्रसिध्द झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आध्यत्मिक संस्कृतित त्याला एक वैभव निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

- बाळासाहेब बडवे, (दै.पंढरी, पंढरपूर)

आषाढी यात्रेचा अन्वयार्थ...

आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा काल गुरुवारी अतिशय उत्साही,आनंदी आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री.संत ज्ञानेश्वर माऊली ,जगद्गुरु तुकाराम महाराज ,संतशिरोमणी नामदेवराय, प्राणिमात्रात भेदाभेद अमंगळ माननाने पैठणचे एकनाथ महाराज आदी संतांच्या प्रभावळीने साहित्य रुपाने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने भागवद् संप्रदयाची सांस्कृतिक परंपरा वैभवाच्या मेघडंबरीत जणूकाही बसली आहे. असा साक्षात्कार यात्रेला आलेल्या प्रत्येक वारकरी भाविकाला झाल्याशिवाय रहात नसेल. वेदविद्येचा व्यासंग त्यावर असणारे प्रभुत्व आणि संताच्या शिकवणीने लाखो भाविक,श्रोते प्रभावित करण्याची एक कीर्तनकार, प्रवचनकार , अभ्यासक यांची मांदीयाळी त्यांनी दिलेल्या विचारांच्या धनाने दिवसेंदिवस भागवत् सांप्रदायाची संस्कृती फुलत आणि खुलत चालल्याचे चित्र दिसत असून भारतीय घटनेत जे सर्वधर्म समभावाचे मुलभुत तत्वज्ञान सांगितले आहे त्या तत्वज्ञानाचे दर्शन प्रत्यक्ष कृती ,दिंडी सोहळा आणि यात्रेच्या निमित्ताने पहायला मिळते. कोणे एकेकाळी समाज सुशिक्षीत नव्हता धर्ममार्तंडांनी धर्माच्या नावावर समाजावर जणू काही एक प्रकारची ग्लानी निर्माण केली होती. कर्मकांडाचे स्त्रोत माजले गेले होते. अशा कालखंडात संतांच्या विचारांचा उदय झाला. त्यांची भक्तीप्रधान दृष्टी मार्गदर्शनाच्या रुपाने समाजभक्तीमय व्हावा यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन समाजकल्याणात आत्मकल्याण साधण्याचा दिलेला बोध ,समाज मानसावर एवढा बिंबला गेले की त्याचा आज सांप्रदायीक वटवृक्ष उभारलेला दिसेल. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत रोहीदासांपर्यंत अठरा पगड जातीच्या संतांना या भागवत् सांप्रदायाने कवटाळून धरले. इथे ब्राह्मण-मराठा ,शुद्र-वैश्य ही जातीपातीची बंधन या संतांच्या विचारांनी तुडवून टाकली आणि फक्त विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान हा वैश्विक कल्याणाचा मार्ग आहे हे प्रत्यक्ष कृतीत उतरुन दाखविले. आज सातासमुद्रापलिकडे सुध्दा वारकरी सांप्रदयाचे अनुयायी ,अभ्यासक तत्वचिंतक, साधक प्रकर्षाने जाणवण्या एवढया संख्येने वृध्दींगत होत आहेत. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे. आत्मकल्याण, समाजकल्याण आणि शेवटी विश्वकल्याणाचा महामंत्राच्या रुपाने सांप्रदयातील सर्व संतांनी आग्रहाने प्रतिपादन केला. त्याचीच ही प्रचिती मानावी लागेल. पुण्याच्या विश्वशांती (माईर्स) संस्थेचे संस्थापक एक थोर भगवत्भक्त डॉ.विश्वनाथ कराड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे विश्वगीत असा सिध्दांत प्रस्तापित करण्याचा सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी संपुर्ण जगातील धर्मतत्वज्ञानापेक्षा विश्वकल्याणाचे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी पांडूरंगाला विश्वदेवाची उपमा दिली आणि त्या विश्वदेवाला अखेरचं मागणं मागताना पासायदानात सांगितले , 'जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात ' विश्वाच्या कल्याणाची करुणा परमेश्वराजवळ भाकणारे संत ज्ञानेश्वर आणि ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' असे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी विश्वकल्याणाचा मार्ग या सांप्रदयाला आणि जनतेला दाखविला. एवढया लहान वयात कोणत्याही प्राणिमात्रात भेदाभेद न करता ज्याला जे पाहिजे त्याला ते दे असे मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे पसायदान विश्ववंद्य आहे. म्हणून ते विश्वगीत झाले पाहिजे. डॉ.कराड यांचे जीवनच संत माऊली आणि संत तुकोबामय झाल्याने त्यांनी पसायदानाला विश्वगीताची दिलेली उपमा ही अत्यंत समर्थनिय अशी आहे. जे आमच्या राज्यकर्त्यांना समजले नाही ते एका माऊली भक्ताला समजले आता त्याची तरी रि ओढून आमच्या राज्यकर्त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे हे पसायदान चवथीपासून ते पदवीपर्यंतच्या सर्व पाठयपुस्तकाच्या प्रारंभी हे पसायदान जर छापण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शैक्षणिक क्षेत्राच्या वातावरणात एक अमुलाग्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांती आणि परिवर्तन हे सहज उच्चारले जाणारे शब्द असले तरी ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तितकाच तोलामोलाचा फुतकार असावा लागतो. हा फुतकार , हा हुंकार पसायदानात आणि संतांच्या मार्गदर्शनात ,विचारात आहे.म्हणून 700 वर्षाहून अधिक काळ वारकरी सांप्रदयाची चालत आलेली परंपरा फुललेली आणि बहरलेली दिसते. त्याचे मुळ पसायदानासारख्या संतांच्या मार्गदर्शक साहित्यात आहे. जात-पात -धर्म-लिंग-श्रीमंती-गरीबी या सगळया वेदांना छेद देवून फक्त विठेवरील विठ्ठल हाच खरा विश्वदेव आहे कारण भागवत् सांप्रदायाचा आत्मा हाच विठ्ठल आहे. आषाढी यात्रेच्या अपूर्व सोहळयाचा यापेक्षा दुसरा अन्वयार्थ कोणता असणार.
- अनिरुध्द बडवे, (दैनिक पंढरी, पंढरपूर)

Wednesday, July 25, 2007

'लोकमत' व 'महाराष्ट्र टाइम्स' चे आभार

'लोकमत' व 'महाराष्ट्र टाइम्स' चे आभार
आणि अर्चना राणे यांना धन्यवाद...
'लोकमत' ने आपल्या २६ जुलै 2007 च्या 'हॅलो मुंबई' या अंकात पान नं ४ वर अर्चना राणे यांचा 'पंढरपुरवारी आता इंटरनेटवर' हा लेख प्रसिद्ध करुन आपण ह्या ब्लाँगची आवर्जुन दखल घेतली. त्याबद्दल मी लोकमत चे मन:पूर्वक आभार मानतो. लेखाचे कर्तेत्या अर्चना राणे यांनाही धन्यवाद देतो.
'लोकमत' च्या दिनांक २६ जुलै 2007 च्या आँनलाईन आवृत्तीत इंटरनेटवर तुम्ही हा लेख केव्हाही वाचू शकता त्यासाठीच ही घ्या लिंक.
त्याच दिवशी म्हणजे दि. २६ जुलै 2007 रोजी 'महाराष्ट्र टाइम्स' ह्या ब्लाँग संदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे. ही बातमी पान नं ५ वर देण्यात आली आहे. ही बातमी प्रसिद्ध केल्या बद्दल त्यांचे आभार मानतो.
धन्यवाद
विश्वनाथ खांदारे