सध्याची विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी व त्या समितीत वारकरी प्रतिनिधी घ्यावा या मागणीवर फडकरी, वारकरी ठाम असून या प्रकरणी आषाडी वारीच्या प्रारंभापासून म्हणजे पालख्यांच्या प्रस्थानापासूनच आंदोलन करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन आळंदीतील संत ज्ञानेश्वरांच्या पालकी प्रस्थानापासूनच सुरू झाले तर प्रशासनासमोर मोठी बिकट समस्या उभी ठाकणार आहे.त्यामुळे प्रशासन, शासन यांना हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. जर प्रश्न मार्गीच लागला नाही तर युती शासनाच्या काळात जो प्रसंग मुख्यमंत्री यांच्या काळात घडला तशी वेळ आघाडीच्या मुख्यमंत्र्यांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांना महापूजेस येण्यापूर्वी समितीबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
दरम्यान, २१ जुलै रोजी संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरिता संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत सोपानकाका आदी संतांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले असून, आता सर्वानाच पंढरीचे वेध लागले आहेत. आषाढी यात्रा ही सर्वात मोठी अन् अर्थकारणाचा कणा असलेली यात्रा. या यात्रेच्या निमित्ताने सर्वच व्यावसायिक जोमाने तयारीला लागले आहेत. वारी हे उद्योगाचे साधन असून, ही यात्रा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच रोजगार मिळवून देत असते. अशा या आषाढी यात्रेची तयारी जोमाने चालू झाली असून, शेजारच्या जिल्हय़ांतून, परप्रांतातून सामान येण्यास सुरुवात झाली आहे.
पंढरीतील मुख्य प्रसादाचे महत्त्व असलेले डाळे, मुरमुरे, बत्ताशे, साखरफुटाणे अशा मिक्स प्रसादाच्या लहानमोठय़ा पुडय़ा बांधण्याचे, तसेच कुंकू, बुक्का पाकिटे तयार करण्याचे काम चालू झालेले आहे. विविध देवतांचे, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो तयार करण्यात कारागीर मग्न आहेत. दुकानदार दुकानाची डागडुजी, मांडणी करण्याचे तयारीस लागले आहेत.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने लक्षावधी वारकरी, भक्त हे सुमारे दहा ते पंधरा दिवस मुक्कामी पंढरीनगरीत असल्याने येथे येणाऱ्या सर्वाना आरोग्य, पाणी, लाईट, निवारा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असल्याने स्थानिकापासून ते जिल्हास्तरावरचे प्रशासन तयारीला लागले आहे. मागील आठवडय़ापासून अधिकाऱ्यांच्या नियोजनाबाबत बैठका चालू झाल्या आहेत. पंढरपूर नगरपरिषदेने रस्ते दुरुस्ती, नळ दुरुस्ती आदी कामांना सुरुवात केली आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवणे चालू केले आहे. हे जरी चालू केले असले तरी थोडय़ाशा पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साठते. त्याचा निचरा करण्याचे नियोजन कुठेच दिसून येत नाही. वारीच्या दृष्टीने हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. तो मार्गी लावणे गरजेचे आहे.
आळंदी, देहू येथून संत ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय यांच्यासह इतर पालख्यांचे प्रस्थान या आठवडय़ात होत असून, आळंदी ते पंढरपूर हा िदडय़ांचा सुमारे २१ दिवसांचा प्रवास आहे। त्यामुळे प्रस्थान झाल्यापासून दिंडय़ांची जबाबदारीही पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्य़ांच्या प्रशासनावर असल्याने तीन जिल्ह्य़ांतील सर्व विभागांचे प्रशासन वारीच्या तयारीला लागले आहे. आता वारीचे वेध सर्वानाच लागलेले आहेत. वारीच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वारीपूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे प्रशासनाचे नियोजन चालू आहे.
- लोकसत्ता दिनांक, २ जुलै 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment