येत्या सोमवारी देहूचा आणि मंगळवारी आळंदीचा देऊळवाडा टाळमृदुंगांच्या आवाजाने दुमदुमून जाईल... आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्काम सोडतील.. आणि अवघा महाराष्ट्र तनाने नाही तर किमान मनाने तरी त्यांच्या सोबत चालू लागेल... गेल्या सातशे वर्षाहून अधिक काळ हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी ना कुणाला आमंत्रणाची गरज ना मानपानाची... शेतातल्या पेरण्या आवरून भाबडा वारकरी पंढरीच्या वाटेला लागेल... मग त्याला उन्हाची तमा नसेल की पावसाची भीती... लक्षलक्ष पावले पंढरीची वाट चालू लागतील आणि ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात सारा महाराष्ट्र भारावून जाईल. डोळ्याचे पारणे फिटावे असा हा सोहळा. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला देहूहून तर अष्टमीला आळंदीहून सुरू होणारा... आषाढी एकादशीला वारी पंढरीला पोहचत असली तरी सारा सोहळा आषाढ पौणिर्मेच्या काल्यापर्यंत जवळपास महिनाभर चालतो. हा सोहळा अनुभवावा असे अनेकांना मनापासून वाटत असले तरी प्रत्येकाला जाणे शक्य नसते. अशा अनेकांसाठी पीटीआयचे फोटोग्राफर शिरीष शेटे यांनी हा हृदयस्पर्शी 'अनुभव' आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे. वारीतील उत्कट क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या फोटोंचे 'वारी-पाथ टू द डिव्हाईन' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतचे विविध टप्पे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामधून टिपले आहेत. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलरखुमाईचे आणि ज्ञानोबा-तुकारामांचे मंदिरातील श्रीमूर्तींचे त्यांनी काढलेले अप्रतिम फोटो या पुस्तकात आहेत. प्रत्येक फोटोची इंग्रजीतून दिलेली माहिती आणि त्याला दिलेल्या अभंगाच्या जोडीमुळे हे पुस्तक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर वाचकांपर्यंत जाण्यास सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक पाहिल्यावर वारीला न गेलेल्याही माणसाची अवस्था 'विठ्ठल भेटला भेटला' अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
- महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १५ जून २००९
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment