1. लोहदंड तीर्थ : हे तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात, पुंडलिकाच्या मंदिरासमोर 20-25 फुटांवर आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. यी तीर्थामागची कथा अशी आहे. इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थामागची कथा अशी आहे. - गौतम ॠषींची पत्नी सती अहिल्या हिचे इंद्राने गौतम ॠषीचे रुप घेऊन सतित्व हरण केले. गौतम ॠषींनी पत्नीला शिळा होण्याचा व देवेंद्राला सहस्त्र छिद्राने (भगाने) पीडित होण्याचा शाप दिला अहिल्येला उ:शाप मिळून भगवान रामचंद्राच्या पदस्पर्शाने ती पावन झाली. इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. विष्णूंनी त्याच्या हाती एक लोहवंड दिला व तीर्थयात्रा करण्यास सांगितले आणि ''ज्या तीर्थात हा लोहदंड तरेल त्या तीर्थाच्या स्नानाने तुझी भगे (छिद्रे) जातील'' असा वर दिला. अनेक तीथें हिंडत-हिंडत देवेंद्र या तीर्थाजवळ आला. इथे लोहदंड तरला. हर्षिंत इंद्राने या तीर्थात स्नान केले, तो शाषमुक्त झाला. व्याधिमुक्त झाला म्हणून या तीर्थास 'लोहदंड तीर्थ' हे नाव पडले. या तीर्थाच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे, की भगवान शंकर-पार्वती आकाशमार्गाने जात असता सती पार्वतीस तहान लागली. भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने भूमीस छिद्र पाडले. त्यातून भोगावतीचे जल काढले. पार्वतीची तृष्णा भागली. तेच हे लोहदंड तीर्थ.
2. पद्मतीर्थ : मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते. तळयाभोवती भक्कम दगडी भिंत व घाट आहेत. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. कान्ह्या हरिदास या संतकवीने केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे. या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सरदार यशवंत पवार यांनी केले असा उल्लेख सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याची व्यवस्था बडवे पाहतात.
हे मंदिर सावरकर पथावर आहे. जवळच रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँड आहे. मंदिरातील तांदळा भव्य व सुंदर आहे. नामदेवाला घेऊन ज्ञानेश्वराची भावंडे तीर्थयात्रेला निघाली तेव्हा भगवान श्रीविठ्ठल त्यांना सोडण्यासाठी या स्थानापर्यंत आले होते. इथेच पांडुरंगाने नामदेवाचा हात ज्ञानेशअवरांच्या हाती दिला, असा उल्लेख एका अभंगात सांपडतो. इथे सुंदर बागबगीचा केल्यास पंढरपूरच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. इथे नगरपालिकेने बांधलेले पद्मावती शाँपिंग सेंटर आहे.
3. कुंडल तीर्थ : श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस हरिदास वेशीजवळ हे तीर्थस्थळ आहे. याची आख्यायिका अशी - भगवान विष्णूंनी दैत्यांशी युध्द करण्याच्या प्रसंगी आपल्या कानातील कुंडले इथे काढून ठेवली होती म्हणून यास कुंडलतीर्थ म्हणतात. या तीर्थाशेजारी नृसिंहाची मूर्ती आहे. सध्या कुंडलतीर्थाची जागा बुजवली गेली असून नूसिंहाच्या नावाने एक पिंपळ उभा आहे. शेजारीच महादेवाचे मंदिर असून मंदिरात आद्य शंकराचार्यांची सुंदर मूर्ती आहे.
4. संगमतीर्थ : गोपाळपूरजवळ हे संगमतीर्थ आहे. भीमा व पुष्पा नद्यांचा या ठिकाणी संगम होतो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा यमुना दु:खी झाली. भगवंतांनी तिला पुष्पा नदीच्या रुपाने जवळ आणले अशी आख्यायिका आहे.
5. वेणुतीर्थ : संगमतीर्थापासून जवळच वेणुतीर्थ आहे. जिथे राधेने भगवान श्रीकृष्णाची वेणू अर्थात बासरी पकडली, त्या तीर्थाला वेणुतीर्थ असे म्हणतात.
6. गुंजातीर्थ : वेणुतीर्थाजवळ असलेल्या वा स्थानी भगवंताच्या मुकुटांतून काही गुंजा इथे गळून पडल्या म्हणून यास गुंजातीर्थ म्हणतात.
7. वृध्दकालेश्वर तीर्थ : गोपाळपूरपासून सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. स्वत: यमधर्माने हे तीर्थ स्थापन केले म्हणून यास यमतीर्थ असेही म्हणतात.
8. पंचगंगातीर्थ : श्रीविठ्ठल मंदिरापासून सुमारे 8 कि.मी. अंतरावर उत्तरेच्या बाजूला नदीच्या पात्राजवळ हे तीर्थस्थान आहे. इथे तुंगा, सती, सुनी, कीर्ती व भृंगारी व 5 छोटया नद्यांचा संगम आहे. इथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस इथे यात्रा भरते.
9. विष्णुपद तीर्थ : चंद्रभागा नदीच्या पात्रात पुंडलिक मंदिराच्या दक्षिणेस सुमारे 1 कि.मी. अंतरावर हे तीर्थ आहे. नदीच्या पात्रात पाषाणस्तंभावर दगडाचे बांधलेले 31 फूट परिघाचे व 12 फूट उंचीचे हे मंदिर आहे. या सोळखांबी आकाराच्या मंदिरची मूळ बांधणी इ. 1640 मध्ये धामणकरबुवांनी केली. पुढे सन 1875 मध्ये चिंतोपंत नागेश बडवे यांनी या मंदिरास सुंदर रुप दिले. मंदिरात मध्यभागी चौकोनात श्रीगोपालकृष्णाची समचरण व देहुडाचरण अशी दोन प्रकारची पावले आहेत. शेजारी गाईंची पावले (खूर) आहेत. दहिकाल्याच्या वाटीची खूणही आहे. पुंडलिकासाठी भगवान श्रीकृष्ण इथे आले. गाई सोडल्यां व खेळविल्या. गोपगणांसह इथे वनभोजन केले. अशी कथा या तीर्थासंबंधात प्रल्हादमहाराज बडवे यांनी सांगितली आहे. भगवान श्रीविठ्ठलनाथ आळंदीहून परत आल्यावर मार्गशीर्ष महिन्यात इथेच राहतात म्हणून या महिन्यात या स्थानाला यात्रेचे स्वरुप येते. इथे लांबलांबून लोक दर्शनास व सहभोजनास येतात, मार्गशीर्ष अमावास्येला श्रीविठ्ठलाची पावले पालखीत ठेवून समारंभपूर्वक मिरवत आणून देवांना पुन्हा मंदिरात आणले जाते. या ठिकाणी जाण्यास घाट व पुल आहे, तसेच नदीच्या पात्रातून नावेतून जाता येते. येथील व्यवस्था बडवे पाहतात. या तीर्थाजवळच नदीच्या पात्रात नारदाचे सुंदर मंदिर आहे. मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे. याची व्यवस्था कोळी लोक पाहतात. इथे जवळच मुक्तकेशी तीर्थ आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment