Friday, June 22, 2007

पंढरपूर क्षेत्र - परिसरातील मंदिरे.... (भाग -1)

1) अंबाबाई मंदिर : लखुबाई मंदिरापासून जवळ नदीच्या काठावर उत्तरेकडे हे मंदिर आहे. 1854 साली या मंदिराचा जीर्णोध्दार लिंबा नावाच्या नर्तकीने केला. असा उल्लेख सापडतो. मूळ हे मंदिर सिदु कोळी यांनी बांधले. पुढे हे मंदिर बडवे समाजाच्या ताब्यात गेले. या मंदिरात महिषासुरमदिंनी देवी अंबामातेची अत्यंत सुंदर, रेखीव, आकर्षक अशी 2॥ ते 3 फूट उंचीची पाषाणमूर्ती आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा व नवरात्रात देवीदर्शनासाठी इथे गर्दी होते. नवरात्रात रोज नवनवीन प्रकाराने पूजा बांधली जाते. आरास केली जाते. अष्टमीस होम केला जातो. मंदिरासमोर दीपमाला व विटेचे अग्निकुंड आहे.
2) व्यास मंदिर : अंबाबाईचे मंदिराशेजारी पटांगणाच्या उत्तरेस रामबागेच्या समोर हे मंदिर आहे. आतील मूर्ती खूपच सुंदर आहे. हे मंदिर ज्योतीपंतदादा महाभागवत यांनी बांधले, असा एका ठिकाणी संदर्भ सापडतो. पूर्वी इथे भागवताची पारायणे होत असत. गुरुपौर्णिमा व पौष मासातील प्रत्येक रविवारी असंख्य लोक इथे दर्शनास येतात.
3) त्र्यंबकेश्वर मंदिर : विठ्ठल मंदिराजवळ रोकडोबा वेस (हरिदास वेस) कडे जाताना हे मंदिर आहे. जवळच कुंडलतीर्थ आहे. पूर्वी या मंदिराजवळ संस्कृत पाळशाळा होती. या मंदिरात सभामंडप व व्यासपीठ (गर्भगार ) असे दोन भाग आहेत. इथे महादेवाची मोठी पिंड आहे. त्यावर पितळी मुखवटा बसवला जातो. रोज दोन वळा 'श्री'ची पूजा केली जाते. महाशिवरात्र व श्रावणातील सोमवारी इथे उत्सव असतो.
4) पंचमुखी मारुती मंदिर : थोरल्या दत्त घाटा - (विप्र घाटा) जवळच हे छोटे मंदिर आहे. मूर्ती 7 फूटांची आहे. मूर्तीस पाच मुखे आहेत. एक हात कामरेवर आहे. दुसरा आशीर्वाद स्वरुपाचा आहे. येथील पूजा-अर्चा बैरागी पाहतात. हनुमान जयंतीस असंख्य बैरागी एकत्र जमून उत्सव साजरा करतात.
5) काळभैरव मंदिर व शाकंबरी मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराजवळ महाद्वारात खाजगी इमारतीमध्ये हे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती सुंदर आहे. मूर्तीचे एक हातात डमरु, गळयात माळ, कानात कुंडले, मस्तकी मुकुट आहे. शेजारी सेवकांची चित्रे आहेत. एक बाजूस जोगेश्वरीची छोटी मूर्ती आहे. मूर्तीशेजारी शिवलिंग आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी या ठिकाणी भैरवतीर्थ होते, तलाव होता. तलावाचे चारी बाजूस काळभैरव, महादेव, गणपती व बनशंकरी (शाकंबरी) देवतांच्या मूर्ती होत्या. स्नानगृहे होती. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात या मंदिरावर हल्ला झाला. इथले दगड निझामाच्या आधिपत्याखाली असलेल्या परांडा गावी नेण्यात आले. इ.स. 1770 साली कोंकणे या सावकाराने काळभैरव मंदिर बांधले. या मंदिराजवळ श्रीबनशंकरी (शाकंबरी) देवीचे सुंदर मंदिर आहे. इथे चैत्रात भैरव अष्टमीला काळभैरव जयंती उत्सव होतो, तर पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीकडील उत्सव होतो. याच भागात आत सराफकट्टा आहे. इथे असलेल्या श्रीगणेशमूर्तीचे रस्तारुंदीकरणाच्या वेळी स्थलांतर झाले. शांकबरी देवीचे मंदिर प्राचीन आहे. या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक मूर्ती शाकंबरीची आहे 2॥ फूट उंचीच्या देवीच्या मूर्तीला 4 हात आहेत. एका हाती डमरु, दुसऱ्या हाती तलवार आहे. एक हात मांडीवर आहे व एक आशीर्वादात्मक आहे. गळयात अलंकार आहेत. 1775 साली अगनळ यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. या दोन्ही मंदिरांची व्यवस्था बडवे समाजाकडे आहे.
6) मल्लिकार्जुन मदिर : श्रीविठ्ठल मंदिराच्या पूर्वभागत महाद्वारात हे प्राचीन व भव्य मंदिर आहे. गर्भागार व सभामंडप असे मंदिराचे दोन भाग आहेत. बांधकाम दगडी आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात एका बाजूस गणपतीची मूर्ती आहे. शेजारी 5 फडयांच्या नागाची दगडी प्रतिकृती आहे. मध्यभागी पितळेच्या नंदी आहे. गर्भागारात श्री मल्लिकार्जुनाची भव्य अशी शाळुंका आहे. मूळ मंदिर छोटे होते. संत नरहरी सोनार याच महादेवाची उपासना करीत असे. त्यानेच या मंदिराचा विकास केला.
7) होळकरांचे राममंदिर : महाद्वार घाटावर, चंद्रभागेच्या तीरावर हे रामंदिर आहे. मंदिर व इमारतीचे बांधकाम अत्यंत भक्कम आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. मंदिराचा सभामंडप 60X28 फूट आहे. गर्भागार थोडे उंचावर आहे. व्यासपीठावर राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी दगडाच्या मूर्ती आहेत. 'शेजारी आहिल्याबाई होळकरांची मूर्ती आहे. समोर हनुमंताची मूर्ती उभी आहे. अहिल्याबाई शिवभक्त होत्या म्हणून मंदिरात शिवलिंगसुध्दा आहे. चैत्र महिन्यात दहा दिवस इथे कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम होतात. रामनवमीस मोठा उत्सव होतो. येथील व्यवस्था होळकर संस्थानचे वतीने बडवे यांचे नातेवाईक पाहतात. या वाडयात लग्न-मुंजीचे व अन्य धार्मिक कार्यक्रमही होतात.

No comments: