Saturday, June 9, 2007

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..

No comments: