Friday, July 27, 2007

आषाढी यात्रेचा अन्वयार्थ...

आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा काल गुरुवारी अतिशय उत्साही,आनंदी आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री.संत ज्ञानेश्वर माऊली ,जगद्गुरु तुकाराम महाराज ,संतशिरोमणी नामदेवराय, प्राणिमात्रात भेदाभेद अमंगळ माननाने पैठणचे एकनाथ महाराज आदी संतांच्या प्रभावळीने साहित्य रुपाने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने भागवद् संप्रदयाची सांस्कृतिक परंपरा वैभवाच्या मेघडंबरीत जणूकाही बसली आहे. असा साक्षात्कार यात्रेला आलेल्या प्रत्येक वारकरी भाविकाला झाल्याशिवाय रहात नसेल. वेदविद्येचा व्यासंग त्यावर असणारे प्रभुत्व आणि संताच्या शिकवणीने लाखो भाविक,श्रोते प्रभावित करण्याची एक कीर्तनकार, प्रवचनकार , अभ्यासक यांची मांदीयाळी त्यांनी दिलेल्या विचारांच्या धनाने दिवसेंदिवस भागवत् सांप्रदायाची संस्कृती फुलत आणि खुलत चालल्याचे चित्र दिसत असून भारतीय घटनेत जे सर्वधर्म समभावाचे मुलभुत तत्वज्ञान सांगितले आहे त्या तत्वज्ञानाचे दर्शन प्रत्यक्ष कृती ,दिंडी सोहळा आणि यात्रेच्या निमित्ताने पहायला मिळते. कोणे एकेकाळी समाज सुशिक्षीत नव्हता धर्ममार्तंडांनी धर्माच्या नावावर समाजावर जणू काही एक प्रकारची ग्लानी निर्माण केली होती. कर्मकांडाचे स्त्रोत माजले गेले होते. अशा कालखंडात संतांच्या विचारांचा उदय झाला. त्यांची भक्तीप्रधान दृष्टी मार्गदर्शनाच्या रुपाने समाजभक्तीमय व्हावा यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन समाजकल्याणात आत्मकल्याण साधण्याचा दिलेला बोध ,समाज मानसावर एवढा बिंबला गेले की त्याचा आज सांप्रदायीक वटवृक्ष उभारलेला दिसेल. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत रोहीदासांपर्यंत अठरा पगड जातीच्या संतांना या भागवत् सांप्रदायाने कवटाळून धरले. इथे ब्राह्मण-मराठा ,शुद्र-वैश्य ही जातीपातीची बंधन या संतांच्या विचारांनी तुडवून टाकली आणि फक्त विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान हा वैश्विक कल्याणाचा मार्ग आहे हे प्रत्यक्ष कृतीत उतरुन दाखविले. आज सातासमुद्रापलिकडे सुध्दा वारकरी सांप्रदयाचे अनुयायी ,अभ्यासक तत्वचिंतक, साधक प्रकर्षाने जाणवण्या एवढया संख्येने वृध्दींगत होत आहेत. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे. आत्मकल्याण, समाजकल्याण आणि शेवटी विश्वकल्याणाचा महामंत्राच्या रुपाने सांप्रदयातील सर्व संतांनी आग्रहाने प्रतिपादन केला. त्याचीच ही प्रचिती मानावी लागेल. पुण्याच्या विश्वशांती (माईर्स) संस्थेचे संस्थापक एक थोर भगवत्भक्त डॉ.विश्वनाथ कराड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे विश्वगीत असा सिध्दांत प्रस्तापित करण्याचा सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी संपुर्ण जगातील धर्मतत्वज्ञानापेक्षा विश्वकल्याणाचे तत्वज्ञान सांगणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी पांडूरंगाला विश्वदेवाची उपमा दिली आणि त्या विश्वदेवाला अखेरचं मागणं मागताना पासायदानात सांगितले , 'जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात ' विश्वाच्या कल्याणाची करुणा परमेश्वराजवळ भाकणारे संत ज्ञानेश्वर आणि ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले' असे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी विश्वकल्याणाचा मार्ग या सांप्रदयाला आणि जनतेला दाखविला. एवढया लहान वयात कोणत्याही प्राणिमात्रात भेदाभेद न करता ज्याला जे पाहिजे त्याला ते दे असे मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे पसायदान विश्ववंद्य आहे. म्हणून ते विश्वगीत झाले पाहिजे. डॉ.कराड यांचे जीवनच संत माऊली आणि संत तुकोबामय झाल्याने त्यांनी पसायदानाला विश्वगीताची दिलेली उपमा ही अत्यंत समर्थनिय अशी आहे. जे आमच्या राज्यकर्त्यांना समजले नाही ते एका माऊली भक्ताला समजले आता त्याची तरी रि ओढून आमच्या राज्यकर्त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे हे पसायदान चवथीपासून ते पदवीपर्यंतच्या सर्व पाठयपुस्तकाच्या प्रारंभी हे पसायदान जर छापण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शैक्षणिक क्षेत्राच्या वातावरणात एक अमुलाग्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. क्रांती आणि परिवर्तन हे सहज उच्चारले जाणारे शब्द असले तरी ते प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तितकाच तोलामोलाचा फुतकार असावा लागतो. हा फुतकार , हा हुंकार पसायदानात आणि संतांच्या मार्गदर्शनात ,विचारात आहे.म्हणून 700 वर्षाहून अधिक काळ वारकरी सांप्रदयाची चालत आलेली परंपरा फुललेली आणि बहरलेली दिसते. त्याचे मुळ पसायदानासारख्या संतांच्या मार्गदर्शक साहित्यात आहे. जात-पात -धर्म-लिंग-श्रीमंती-गरीबी या सगळया वेदांना छेद देवून फक्त विठेवरील विठ्ठल हाच खरा विश्वदेव आहे कारण भागवत् सांप्रदायाचा आत्मा हाच विठ्ठल आहे. आषाढी यात्रेच्या अपूर्व सोहळयाचा यापेक्षा दुसरा अन्वयार्थ कोणता असणार.
- अनिरुध्द बडवे, (दैनिक पंढरी, पंढरपूर)

No comments: