Thursday, July 5, 2007

पूररेषेच्या तडाख्यात विठ्ठल मंदिरे

पूररेषेतील नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पंढरपूरवासीय धास्तावले असून, नव्याने आखण्यात आलेल्या 'रेड लाईन' पुररेषेत पंढरपूर शहराचा 90 टक्के परिसर पाण्याखाली येत असल्याचे दर्शविले आहे. भविष्यात शासन पुनर्वसनाच्या मुद्यावर अडून बसले तर श्री विठ्ठल मंदिरासह सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी एक नवे पंढरपूर शासनाला विकसित करावे लागणार आहे.
भीमेला सातत्याने येणारा पूर अन् या पुरामुळे पंढरीतील नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार केला आहे. पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय मांडून पूररेषेतील लोकांचे कायम पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
पंढरपूर शहर हे समुद्रसपाटीपासून साधारण 460 मीटरच्या उंचीवर आहे. यापूर्वी 452 मीटरपर्यंत पुराच्या पाण्याने पातळी गाठली होती. ही परिस्थिती लक्षात घेता नव्याने दाखवितात आलेली 'रेड लाईन' रेषा ही 458 मीटरपर्यंत दाखविण्यात आली आहे. म्हणजे या रेषेत शहर व उपनगरातील 90 टक्के परिसर येतो. ही गोष्ट धक्कादायक असून, यात पंढरपूर कॉलेज, शासकीय वसाहत, तालुका पोलीस ठाणे, परदेशी नगर, गुरुकृपा सोसायटीचा काही भाग, यमाई तलाव या खालचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली जाईल.
'ब्लू लाईन'साठी तीन लाख क्युसेक्सपर्यंत पाणी भीमेत सोडावे लागते, तर 'रेड लाईन'चा परिसर पाण्याखाली येण्यासाठी सुमारे दहा लाख क्युसेक्स पाणायाची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी थोपविण्यासाठी असलेली अपुरी साधने लक्षात घेता शासनाच्या पूर नियंत्रण विभागाने ही 'रेड लाइन' तयार केली आहे. या 'रेड लाइन'वरुन जर शासनाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला, तर पंढरपूर शहरातील सुमारे 25 हजार कुटुंबाचे स्थलांतर करावे लागेल.
- सुनील उंबरे ( दै सामना)

No comments: