श्रीज्ञानेश्वर चरित्र

Friday, July 27, 2007

श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण: आध्यात्मिक दीपस्तंभ !

ईश्वर निष्ठांची मांदियाळी असलेल्या भागवत् सांप्रदायातील संत महंतांनी आचार, विचार, उच्चार,भक्ती, श्रध्दा, प्रेमभाव, नम्रता, शांती, समभाव, च्यारित्र्य सुचिर्रभुतता या संस्कृतिप्रीय मुलतत्वावर आधारलेले साहित्य साधकासाठी, भक्तासाठी, अभ्यासकासाठी, चिंतनकासाठी निर्माण केले. वेदापासून अगदी काल परवा पर्यंत आध्यात्म शास्त्रावर आधारीत साहित्य निर्मितीने एक वैचारिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणली. हे परिवर्तन समाज सुजाण वैचारिक संपन्न व गुणसमुच्चयानी नटलेला ,थाटलेला इतकेच नव्हे तर चिंतनशील झालेले दिसते. भगवद्गीतेसारखा तत्वज्ञानाच्या हिमशिखरावर बसलेल्या ग्रंथाचे विवरण करणारे साहित्य विपूल प्रमाणात निर्माण झाले. पण अधिष्ठीत देवता असलेल्या श्री भगवंताला आनन्य भावाने शरण जावून जे विष्णुसहस्त्रनाम तत्वज्ञानाच्या रुपाने सांगितले गेले ते सश्रध्द भाविकापर्यंत पोहोचविण्याची साहित्य निर्मिती क्वचित आढळून येते. गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासात श्री विष्णुसहस्रनामावर अतिशय सखोल अभ्यासपूर्ण आणि अगम्य असे विवरण करण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो नाशिकचे काव्यतीर्थ, आचार्य वेदान्तवाचस्पती श्री ह.भ.प. जगंन्नाथ महाराज पवार यांनी.
11 नोव्हेंबर 2006 रोजी श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ग्रंथाचे पहिले पाच खंड माझ्या हाती पडले. हा ग्रंथ वाचत असताना श्री पवार महाराजांनी केलेला हा प्रयत्न भागवत् सांप्रदायाच्या अभ्यासकासाठी एक पर्वणीच नव्हे तर उपकारकारक ग्रंथ ठरावा असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. हा ग्रंथ वाचत असताना सगळयात महत्वाचे काय असेल तर शरानी शीर्ण जखमी झालेल्या भीष्माचार्यांच्या तोंडून श्री भगवंताच्या आदेशावरुन श्री विष्णुसहस्त्रनामाचे प्रगटीकरण धर्मराजाच्या समोर झाले नव्हे तर धर्मराजाकरीता झाले त्यावेळचे ते भावविश्व त्यावेळचे ते दृश्य हा ग्रंथ वाचत असताना वाचकाच्या समोर जसेच्या तसे उभा राहते. हे या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे. जी साहित्य निर्मिती वाचकाच्या भावविश्वाला भावनीक नाते जोडायला लावते ती साहित्य निर्मिती अजरामर तर होतेच शिवाय त्या साहित्य निर्मितीने सामाजिक जागरणाची प्रक्रियाही घडते. या जातीतलेच श्री पवार महाराजांची ही साहित्यकृती आहे असा माझा विश्वास झाल्यानंतर दै.'पंढरी संचार' च्या माध्यमातून ती वाचकाच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तर उचित ठरले. या भावनेनी गेल्या वर्षभरापासून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण ग्रंथातील क्रमशः थोडासा उतारा प्रसिध्द होत आहे. याला वाचकानी जी दाद दिली ती मोठी विलक्षण वाटली. विष्णुसहस्त्रनामाच्या पहिल्याच नमन प्रकरणात ह.भ.प.पवार महाराज म्हणतात,' विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र हे कलियुगातील जीवासाठी आवश्यक असे साधन आहे. कारण कृत, त्रेत आणि व्दापार या तीन्ही युगात अनुक्रमे भगवंताचे ध्यान यज्ञ आणि पूजा या साधनांनी सफलता लाभत असे. दोष संपन्न अशा कलियुगात मात्र कामक्रोधादि विकाराने कलुषित असलेल्या जीवांना चित्ताची एकाग्रता व अन्य सामग्री यांच्या आभावामुळे वरील उपयांचे अनुष्ठान अशक्य प्राय आहे. सर्व साधनांचे सार सर्व दुःखनिवारक, साधे, सोपे , सरळ नी सुलभ असे भगवंत नामसंकिर्तनच त्यांना एैहिक पारलौकिक व निरतिशय अशा मोक्ष सुखाची प्राप्ती करुन देणारे आहे.'
ह.भ.प.पवार महाराजांनी आपल्या या प्रास्ताविकात व्यक्त केलेल्या विचारावरुन या ग्रंथाचे महात्म्य किती पराकोटीचे, उंचिचे आणि परमभाग्यनिर्मितीचे आहे याचे भान वाचकाला आल्याशिवाय रहात नाही.
बाणशय्येवर भगवंताचे नामस्मरण करीत असलेल्या भीष्माने धर्मराजासह भेटायला गेलेल्या श्रीकृष्ण भगवंतास नम्रपणे सांगितले, 'देवा माझे मन,बुध्दी इत्यादी सर्व तुला वाहिले आहे.शरीर हे शरांनी शीर्ण जखमी झाले आहे असंख्य वेदनांनी मला सदैव मर्ुच्छापन्न केले आहे आता केवळ तुझे स्मरण करीत मी उत्तरायणाची वाट पहात जीवंत आहे. या भीष्माच्या विनंतीवर आपण धर्मराजास सर्व धर्माचा उपदेश करा, आपले क्लेश ,कष्ट, वेदना, मोहादी सर्व नष्ट होतील. यावर धर्मराजाने भीष्मास धर्मविषयक काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे दिल्यानंतर सर्व धर्मश्रेष्ठ असा धर्म कोणता ? हे विचारल्यानंतर त्यास उत्तर म्हणून भीष्माने जे दिले तेच हे विष्णुसहस्त्रनाम होय. विष्णुसहस्त्रनामाचे बीज नेमके कुठे आहे याची उकलसुध्दा अत्यंत सुचक शब्दात ह.भ.प.पवार महाराजांनी केल्याने श्री विष्णुसहस्त्रनामा बाबत जी उकल होते ती नवीन साधकाच्या दृष्टीने महत्वाची वाटते.
ह.भ.प.जगंनाथ महाराज पवार हे वारकरी सांप्रदायातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहेच शिवाय श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी संतांच्या विचाराचा धागा पकडून सर्व सामान्य भाविकावर मार्गदर्शनाचा अमृतकुंभ रिता करणारे उत्कृष्ट धार्मिक मार्गदर्शकही वाटतात. आजकाल वारकरी सांप्रदयात संतांनी घालून दिलेल्या शिस्तीचा विचार सांप्रदायाची मुलभुत तत्वे भल्याभल्याकडून बाजूला ठेवली जावू लागली आहेत. दाभिंकपणा ,शिष्टाचार आणि संत विचाराच्या तत्वज्ञानावर पोटार्थी होण्याची भावना संत लावून घेणा-या अनेकांच्या अंगी जी शिरलेली दिसते या विचारधारेला ह.भ.प.श्री.पवार महाराज यंानी पुर्णपणे छेद दिलेला दिसतो. संतांचे तत्वज्ञान हे साधकाचे ,भक्ताचे वारक-यांचे आत्मतत्वज्ञान झाले पाहिजे त्यासाठी समाजाला जे मार्गदर्शन केले पाहिजे ते मार्गदर्शन करणाराही तीतकाच तत्वज्ञानाचा परमभक्त असला पाहिजे.हे गृहीत सत्य आजकालचे सांप्रदयातील दंभाचारी विसरुन जावू लागलेले आहेत. हे सांप्रदायाचेच दुर्दैव म्हणावे लागेल. रस्त्याला कडेला लागलेले बोर्ड कीर्तन-प्रवचनासाठी उभारलेले पेंडॉल ,मिळत असलेला मान मरातब समाजाने प्रतिष्ठेची घातलेली झूल या सगळया प्रलोभनात आमचा सांप्रदायीक अभ्यासक आणि मार्गदर्शक हरवलेला दिसत आहे. अशा या यावातावरणात संतांच्या तत्वज्ञानावर पोट भरण्यापेक्षा समाजाची आध्यात्मिक भूक भागविण्याचा आपल्यापरिने प्रयत्न करणारे जे सुचिर्भुत संत-महंत आणि अभ्यासक आहेत. त्यात ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांचा समावेश आहे असे विश्वासाने वाटते आणि हाच धागा पकडून श्री विष्णुसहस्त्रनाम विवरण अर्थात सहस्त्रनाम प्रवचने ही पाच खंडामध्ये त्यांनी प्रसिध्द केली. ग्रंथातल्या प्रत्येक पानावर आधात्मिक अनुभूती आणि ईश्वराविषयी असलेली श्रध्दा वृध्दींगत करणारी भावना वेगळी प्रचिती देवून जाते. हे या पाचही खंडाचे सर्वात मोठे वैशिष्ठय आहे.
श्री.ह.भ.प.जगंन्नाथ महाराज पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विष्णुसहस्त्रनाम् मातृ-पितृसेवा मंदिर बांधण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. वीटेवर उभा असलेला श्री पांडुरंग भक्तीच्या तालावर खुळखूळू वाहणारी चंद्रभागा, अजूनही 28 युगं दर्शनासाठी आतूर झालेला पुंडलिकराय हे जसे या पंढरीचे वैभव आहे असेच एक वैभव चंद्रभागेच्या तीरावर मातृ-पितृ सेवा मंदीराच्या प्रकल्पाच्याव्दारे साकार होत आहे. सत्य संकल्पाचा दाता हा साक्षात नारायण असतो श्री पवार महाराजांनी अत्यंत कष्टातून असंख्य व्यावधानातून लोकांच्यापुढे दया याचना करुन उदार आश्रय दात्यांच्या आधारावर हा प्रकल्प राबविण्याचा जो प्रयास चालू केला आहे हे काम त्यांच्या बौध्दिक कतृत्वापेक्षा त्यांची अध्यात्मिक उंची सिध्द करणारा असा आहे.
श्री विष्णुसहस्त्रनाम ग्रंथाचे दहा खंड प्रसिध्द झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आध्यत्मिक संस्कृतित त्याला एक वैभव निर्माण होईल असा विश्वास वाटतो.

- बाळासाहेब बडवे, (दै.पंढरी, पंढरपूर)

1 comment: