Saturday, July 3, 2010

मंदिर समितीत वारकरी प्रतिनिधी घेण्यासाठी पालखी प्रस्थानापासून आंदोलन?

सध्याची विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी व त्या समितीत वारकरी प्रतिनिधी घ्यावा या मागणीवर फडकरी, वारकरी ठाम असून या प्रकरणी आषाडी वारीच्या प्रारंभापासून म्हणजे पालख्यांच्या प्रस्थानापासूनच आंदोलन करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन आळंदीतील संत ज्ञानेश्वरांच्या पालकी प्रस्थानापासूनच सुरू झाले तर प्रशासनासमोर मोठी बिकट समस्या उभी ठाकणार आहे.त्यामुळे प्रशासन, शासन यांना हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. जर प्रश्न मार्गीच लागला नाही तर युती शासनाच्या काळात जो प्रसंग मुख्यमंत्री यांच्या काळात घडला तशी वेळ आघाडीच्या मुख्यमंत्र्यांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांना महापूजेस येण्यापूर्वी समितीबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
दरम्यान, २१ जुलै रोजी संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याकरिता संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत सोपानकाका आदी संतांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले असून, आता सर्वानाच पंढरीचे वेध लागले आहेत. आषाढी यात्रा ही सर्वात मोठी अन् अर्थकारणाचा कणा असलेली यात्रा. या यात्रेच्या निमित्ताने सर्वच व्यावसायिक जोमाने तयारीला लागले आहेत. वारी हे उद्योगाचे साधन असून, ही यात्रा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच रोजगार मिळवून देत असते. अशा या आषाढी यात्रेची तयारी जोमाने चालू झाली असून, शेजारच्या जिल्हय़ांतून, परप्रांतातून सामान येण्यास सुरुवात झाली आहे.
पंढरीतील मुख्य प्रसादाचे महत्त्व असलेले डाळे, मुरमुरे, बत्ताशे, साखरफुटाणे अशा मिक्स प्रसादाच्या लहानमोठय़ा पुडय़ा बांधण्याचे, तसेच कुंकू, बुक्का पाकिटे तयार करण्याचे काम चालू झालेले आहे. विविध देवतांचे, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो तयार करण्यात कारागीर मग्न आहेत. दुकानदार दुकानाची डागडुजी, मांडणी करण्याचे तयारीस लागले आहेत.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने लक्षावधी वारकरी, भक्त हे सुमारे दहा ते पंधरा दिवस मुक्कामी पंढरीनगरीत असल्याने येथे येणाऱ्या सर्वाना आरोग्य, पाणी, लाईट, निवारा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असल्याने स्थानिकापासून ते जिल्हास्तरावरचे प्रशासन तयारीला लागले आहे. मागील आठवडय़ापासून अधिकाऱ्यांच्या नियोजनाबाबत बैठका चालू झाल्या आहेत. पंढरपूर नगरपरिषदेने रस्ते दुरुस्ती, नळ दुरुस्ती आदी कामांना सुरुवात केली आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवणे चालू केले आहे. हे जरी चालू केले असले तरी थोडय़ाशा पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी साठते. त्याचा निचरा करण्याचे नियोजन कुठेच दिसून येत नाही. वारीच्या दृष्टीने हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. तो मार्गी लावणे गरजेचे आहे.
आळंदी, देहू येथून संत ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय यांच्यासह इतर पालख्यांचे प्रस्थान या आठवडय़ात होत असून, आळंदी ते पंढरपूर हा िदडय़ांचा सुमारे २१ दिवसांचा प्रवास आहे। त्यामुळे प्रस्थान झाल्यापासून दिंडय़ांची जबाबदारीही पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्य़ांच्या प्रशासनावर असल्याने तीन जिल्ह्य़ांतील सर्व विभागांचे प्रशासन वारीच्या तयारीला लागले आहे. आता वारीचे वेध सर्वानाच लागलेले आहेत. वारीच्या तयारीच्या दृष्टीने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वारीपूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे प्रशासनाचे नियोजन चालू आहे.
- लोकसत्ता दिनांक, २ जुलै 2010

Wednesday, October 28, 2009

कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी चार लाख भाविक दाखल....


कार्तिकी प्रबोधनी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत आज चार लाखाहून अधिक वारकरी दाखल झाले आहे। शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सायंकाळी पंढऱीत दाखल झाले असून गुरुवारी पहाटे महापूजा होणार आहे। शहर आणि परिसर हरिनामाचा गजरात दुमदुमला आहे।
कार्तिकी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आंधप्रदेश, कर्नाटक येथून भाविक दाखल झाले आहेत। सप्टेंबर अखेर आणि आँक्टोबर पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे सुरु आहे। त्यामुळे कोकण, कर्नाटक भागातून येणा-या भाविकांची संख्या कमी आहे। चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची गर्दी झाली आहे। येथे टाकण्यात आलेल्या राहुट्यांमधून किर्तन, भजन, प्रवचनाबरोबरच हरिनामाचा गजर सुरु आहे। श्री। विठ्ठलाच्या पदर्शन रांगेत ३० ते ४० हजार भाविक आहेत। दर्शनासाठी १२ ते १४ तासांचा कालावधी लागत आहे। दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम आणि त्यांचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत। दर्शनरांगेत स्वच्छता ठेवण्यासाठी नगराध्यक्ष सतीश मुळे, मुख्याधिकारी मंगेश चितळे लक्ष देत आहेत।

Thursday, July 2, 2009

वैराग्याचे वैभव- विठ्ठलपंत...

आपेगाव गोविंदपंत कुलकर्ण्यांचे अत्यंत बुद्धिमान पण वैराग्यशील पुत्र विठ्ठपंत बालवयातच तीर्थयात्रेला निघाले होते। बुद्धीच्या तेजाने त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता। लहान वयातच शास्त्रग्रंथांचे वाचन झालेले होते

Sunday, June 14, 2009

'विठ्ठल भेटला भेटला'

येत्या सोमवारी देहूचा आणि मंगळवारी आळंदीचा देऊळवाडा टाळमृदुंगांच्या आवाजाने दुमदुमून जाईल... आषाढी एकादशीला पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली मुक्काम सोडतील.. आणि अवघा महाराष्ट्र तनाने नाही तर किमान मनाने तरी त्यांच्या सोबत चालू लागेल... गेल्या सातशे वर्षाहून अधिक काळ हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी ना कुणाला आमंत्रणाची गरज ना मानपानाची... शेतातल्या पेरण्या आवरून भाबडा वारकरी पंढरीच्या वाटेला लागेल... मग त्याला उन्हाची तमा नसेल की पावसाची भीती... लक्षलक्ष पावले पंढरीची वाट चालू लागतील आणि ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात सारा महाराष्ट्र भारावून जाईल. डोळ्याचे पारणे फिटावे असा हा सोहळा. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला देहूहून तर अष्टमीला आळंदीहून सुरू होणारा... आषाढी एकादशीला वारी पंढरीला पोहचत असली तरी सारा सोहळा आषाढ पौणिर्मेच्या काल्यापर्यंत जवळपास महिनाभर चालतो. हा सोहळा अनुभवावा असे अनेकांना मनापासून वाटत असले तरी प्रत्येकाला जाणे शक्य नसते. अशा अनेकांसाठी पीटीआयचे फोटोग्राफर शिरीष शेटे यांनी हा हृदयस्पर्शी 'अनुभव' आपल्या कॅमेरामध्ये टिपला आहे. वारीतील उत्कट क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या फोटोंचे 'वारी-पाथ टू द डिव्हाईन' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंतचे विविध टप्पे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामधून टिपले आहेत. तसेच पंढरपूरच्या विठ्ठलरखुमाईचे आणि ज्ञानोबा-तुकारामांचे मंदिरातील श्रीमूर्तींचे त्यांनी काढलेले अप्रतिम फोटो या पुस्तकात आहेत. प्रत्येक फोटोची इंग्रजीतून दिलेली माहिती आणि त्याला दिलेल्या अभंगाच्या जोडीमुळे हे पुस्तक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर वाचकांपर्यंत जाण्यास सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक पाहिल्यावर वारीला न गेलेल्याही माणसाची अवस्था 'विठ्ठल भेटला भेटला' अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
- महाराष्ट्र टाइम्स, दिनांक १५ जून २००९

Friday, January 30, 2009

तुकारामांचे अभंग आणि साहित्य आता इतर भाषांमध्येही...

मराठी संत मांदियाळीतील एक प्रमुख संत तुकाराम यांची अभंयगाथा आता संस्कृत, मराठी आणि

Sunday, January 4, 2009

राज्यातील जनतेच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांची श्री विठ्ठल चरणी प्रार्थना....

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी भेट देऊन सपत्नीक श्री विठ्ठलाची तुळशीअर्चन पूजा केली. राज्यातील जनतेला सुख, शांती, समृध्दी लाभो, असे साकडे त्यांनी यावेळी श्री विठ्ठल चरणी घातले. मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, शहरात येणार्‍या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. याकामाला गती देण्यासाठी पंढरपूर शहरासाठी वेगळे प्राधिकरण निर्माण करुन तिर्थक्षेत्र तुळजापूरच्या धर्तीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास केला जाईल.राज्यातील चाळीस लाख शेतकर्‍यांना ६ हजार २०८ कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय आघाडी शासनाने विचारपूर्वक घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री जयवंत आवळे आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रविवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आ. सुधाकरपंत परिचारिक आदी उपस्थित होते.

Wednesday, November 12, 2008

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2008 रोजी 8.00 वाजता स्टार माझा चॅनलवर..

स्टार माझा मराठी ब्लाँग पारितोषिक वितरण सोहळा मध्ये माझ्या ब्लाँगला तुतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले यांची विडिओ क्लीप...