Saturday, June 16, 2007

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.

माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

यात्रा...

चैत्री-वारी : भारतीय सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे चैत्र महिना म्हणजे नववर्षारंभीचा महिना. चैत्र शुध्द एकादशीला पंढरपुरात श्रविठ्ठलदर्शनासाठी मोठी यात्रा भरते. चंद्रभागेत स्नान, श्रीविठ्ठल दर्शन, क्षेत्र-प्रदक्षिणा करुन भजनानंदी तल्लीन होऊन वारकरी कृतार्थ होतात. रामनवमी व गुढी पाडवा या सणाला पंढरपुरात भाविकांची गर्दी होते. मंदिरात, मठात, धर्मशाळेतच नव्हे तर घरोघरी गुढया उभ्या करुन नववर्षाचे स्वागत केले जाते. याच महिन्यात शिखर-शिंगणापूरची यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर यात्राही असते. नगर जिल्ह्यात ज्याप्रमाणे श्रीशनि-शिंगणापूर हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र शिखर-शिंगणापूर तीर्थस्थान आहे. इथे डोंगरावर श्रीशंभुमहादेवाचे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. चेत्रवारीस आलेले भाविक श्रीविठ्ठलदर्शन घेऊन, खांद्यावर कावडी घेऊन वाजत-गाजत, नाचत श्रीमहादेवाच्या दर्शनाला जाऊन येतात. 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाबरोबरच 'हरहर महादेव' ही गर्जना आसमंतात घुमते आणि नकळत शैव-वैष्णव संप्रदाय मूलत: एकच आहे 'भेद नाही हरिहरा' ही अद्वैताची भावना भाविकांच्या मनात दृढमूल होते. श्रीक्षेत्र शिंगणापूर हे महादेवाचे तीर्थस्थान पंढरपूर-पुणे महामार्गावर सुमारे 65 ते 70 कि.मी. अंतरावर आहे.

कार्तिकी यात्रा. : कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरत असते. या यात्रेनंतर संतमंडळी व चातुर्मासात भगवद्चिंतनासाठी राहिलेले वारकरी लोक आपापल्या गावी जातात. चातुर्मास संपतो, या यात्रेत नदीच्या वाळवंटात जागोजागी कीर्तनाचे फड असतात. गावातील मठ-मदिरांतून, धर्मशाळेतूनही कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत असतात. एकादशीचे दिवशी श्रीविठ्ठलाचा रथ नगरप्रदक्षिणेला निघत असतो. दिंडया निघतात. पैर्णिमेला गोपाळकाला (गोपाळपूर येथे) व त्याच्या दुसरे दिवशी मंदिरात आषाढी यात्रेप्रमाणे महाद्वार काला होतो. या यात्रेला कर्नाटकातून पालख्या व दिंडया येतात. विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव इ. जिल्ह्यांतून लाखो लोक पंढरपूरला येतात. विजापूर जिल्ह्यात इंचगिरी संप्रदायाची शिष्यमंडळी आहेत. भाऊसाहेब महाराज उमदीकर, रामभाऊ रानडे इ. थोर सत्पुरुषांनी भागवत धर्माच्या प्रसाराचे महान कार्य या भागात केले आहे. या प्रांतातील विविध मंदिरांतून श्रीज्ञानेश्वरीच्या निरुपणाचे कार्य, कीर्तने, प्रवचन-पायारणे इ. कानडी भाषेतून चालते. यात्रेच्या निमित्ताने भागवत धर्माच्या प्रचारा-प्रसारामुळे प्रांतभेद संपून स्नेहसंबंध दृढमूल होत आहेत. ''कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणे मज लावियेला वेधु ॥'' या अभंगातून 'श्रीविठ्ठल' कर्नाटक व महाराष्ट्रातील (भाषा भिन्न असूनही) वारकऱ्यांना भक्तिसूत्राने एकत्रित आणणारा महत्त्वाचा दुवा आहे.
माघी वारी ( माघ यात्रा) : पंढरपुरातील ही चौथी महत्त्वाची यात्रा. माघ शुध्द एकादशीला ही यात्रा भरत असते. कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेशातील भाविकही या यात्रेसाठी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी दिंडयांसह येतात. तमिळी, तेलगू भाविकांमध्येही श्रीविठ्ठलभक्ती, भागवतधर्माविषयी जिव्हाळा दिसून येतो. आंध्रातील भट्टीपोल्लू गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशी यात्रा भरते. या प्रदेशातील गावातून असलेल्या श्रीविठ्ठल मंदिरातून तेलगू भाषेत ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांतूनसुध्दा पंढरीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू भाषेतून प्रवचने होतात. म्हणूनच सांगावेसे वाटते की, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र देशातील विविध प्रांतातील भाषिकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्रित आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र, एवढेच नव्हे तर हिंदुधर्म संस्कृतीचे प्रतीक आहे.

Thursday, June 14, 2007

पंढरीची वारी (आषाढी यात्रा) .....

स्वत: पांडुरंगाने नामदेवरायांच्या जवळ आपले गुपित सांगताना म्हटले आहे, ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्त्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा चार महिन्यांचा काळ 'चातुर्मास' म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिर, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तनादि कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. या सर्वात मोठया यात्रेसाठी दरवर्षी संतांच्या पालख्यांसमवेत व अन्य मार्गाने सुमारे 5 ते 6 लाख लोक पंढरीत येत असतात. पंढरीचा आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. चंद्रभागा नदी यात्राकाळात दुथडी भरुन वहात असते. आल्हाददायक वातावरण झालेले असते. वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसतात. आषाढ शुध्द दशमीला अनेक संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होते. हजारो लोक पालखीला सामोरे जातात. साधु-संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अनिर्वचनीय असतो. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीत दाखल होतात. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
या यात्रेपूर्वी ठरलेल्या मुहूर्तावर आळंदी, देहू, पैठण, शेगाव इ. संत सत्पुरुषांच्या गावाहून त्या त्या संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरास येतात.
आषाढ शु. 9 ला भंडीशेगाव येथे रिंगण होऊन सर्वजण वाखरी येथील संतनगरात मुक्कामास येतात. दशमीच्या दिवशी सकल संतांच्या पालख्यांसमोर दिंडयांचे रिंगण होते. रिंगण-सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो, संतांचा अश्व वर्तुळाकार नाचत असतो, धावत असतो व त्यामागे वारकरी धावत असतात. रिंगण-सोहळा संपल्यावर सर्व पालख्या पंढरपूराकडे निघतात.
वाखरी येथून सर्व पालख्यांच्या शेवटी निघणारी पालखी श्रीज्ञानेश्वर महाराजांची. या पालखीचा प्रथम क्रमांक असतो. दुसरा क्रमांक देहूच्या श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असतो. तिसरा क्रमांक पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालकीचा. चौथी पालखी निवृत्तिनाथ महाराजांची, पाचवी सोपानदेवाची, सहावी एदलाबादहून आलेली संत मुक्ताबाईची पालखी आणि सातवी पालखी पंढरपुराहून संतांच्या पालख्यांना सामोरे जाऊन पंढरीस आणणारी श्रीनामदेवरायांची पालखी. या प्रमुख संतांच्या पालख्यांचे मार्ग ठरलेले असतात. संतनगर (वाखरी येथील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येण्याच्या ठिकाणा) हून आषाढ शुध्द दशमीला सकाळी 10 च्या सुमारास एकेक पालखी हळूहळू पंढरपूरकडे मार्गक्रमणा करु लागते. पंढरपुरात सर्वात शेवटी येणारी पालखी असते. श्रीज्ञानेश्वर महाराजांची; ती रात्री 10-11 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील प्रदक्षिणा रोडवरील श्रीज्ञानेश्वर मंदिरात येते. अन्य संतांच्या पालख्या आपापल्या मंदिरात जातात. आषाढ शुध्द एकादशीला यात्रेकरु चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करुन शुचिर्भूत होतात. कपाळी गोपीचंदन व बुवक्याची नाममुद्रा लावतात. गळयात तुळशीची माळ व टाळ, खांद्यावर पताका घेऊन हे वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत, क्षेत्र-प्रदक्षिणा करतात. श्रीविठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होते. दर्शन बारीत 8-10 तास उभे राहून लोक 'श्री'चे दर्शन घेऊन कुतार्थ होतात. वारी पूर्ण करतात. दुपारी 2 च्या दरम्यान श्रीविठ्ठलाचा रथ क्षेत्र-प्रदक्षिणेसाठी निघतो. माहेश्वरी धर्मशाळेत (पूर्वीचा खाजगीवाले वाडा) श्रीविठ्ठल-रुक्मिणी व राही यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. या मूताअना सोन्याचे पाणी दिले ाहे. सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गावरुन रथारुढ श्रीविठ्ठल-रुक्मिणी-राहीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. ज्या भाविकांना एकादशीचे दिवशी मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नाही, त्या भाविकांना रथारुढ श्रीविठ्ठलाचे दर्शन होते, समाधान मिळते. हा रथ भक्तभाविक ओढत असतात. रथापुढे श्रीगजानन महाराज संस्थानचा हत्ती झुलत असतो. 'श्री'च्या दर्शनासाठी प्रदक्षिणा मार्गावर लोकांची झुंबड उडते. लोक रथावर खारीक, बुक्का, लाह्या, पैसे उधळतात. ठिकठिकाणी रथ थांबवतात. परंपरेनुसार मानकरी लोक 'श्री'ची पूजा करतात रथाची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो. आनंद होतो. ही परंपरा (प्रथा) सुरु होऊन सुमारे 190 वर्षे झाली आहेत.
आषाढ शुध्द पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. क्षेत्राच्या दक्षिणेस सुमारे 1 ते 1॥ कि.मी अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथे गोपाळकाल्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून दिंडया, पालख्यांची गर्दी होते. दुपारी 10 ते 12 च्या सुमारास तिथे कीर्तनानंतर दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकांना वाटता जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. एकमेकांच्या मुखात लाह्यांचा दहीकाला घालून नामस्मरणी दंग असलेले वारकरी 'गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला' असे म्हणत उपाउरी भेट घेतात. ''पंढरीच्या लोक नाही अभिमान । पाया पडती जन एकमेका ॥'' या संतवाणीप्रमाणे एकमेकाला वंदन करतात. सान-थोर, उच्च-नीच भेद संपतो. सर्व भाविक, वैष्णव हा आनंद-सोहळा साजरा करुन, 'पंढरीची वारी' परिपूर्ण झाल्याच्या आनंदात आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतात. पंढरीत यात्रेसाठी येताना आणि यात्रा पूर्ण झाल्यावर गावी परत जाताना जागोजागी मुक्काम करुन नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, भारुडाचे कार्यक्रम करुन हरिजागर करीत असतात. पालखी सोहळयातील विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, घोडेस्वार इत्यादि बाबतींतली संपूर्ण व्यवस्था संस्थानच्या मार्गदर्शनाखाली पाहिली जाते. या व्यवस्थेत आवश्यकतेनुसार होणारे बदल आळंदी देवस्थान पंचकमिटी, वारकरी महामंडळ व जिल्हा न्यायाधीश, पुणे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार केले जातात. दिंडया व पालखी परती मार्ग, याचे नियम याच पध्दतीने ठरविले जातात. अलीकडे पालखीसमवेत येणा-या यात्रेकरुंच्या दिंडयांच्या संख्येत वाढ होत आहे.
आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दुसरे दिवशी 'महाद्वार काला' होतो. प्राचीन काळी पंढरपुरात कान्ह्या हरिदास नावाचे श्रीविठ्ठलाचे अनन्यभक्त होऊन गेले. रोज पहाटे काकड आरतीला. मंदिरात भजने, पदे, आरत्या म्हणून ते सेवा करीत असत. ( आजही त्यांचे वशंज ही प्रथा पाळून रोज श्रीविठ्ठलांचे पुढे गायनसेवा करीत असतात) श्रीविठ्ठलाचे प्रसन्न होऊन त्यांना स्वत:च्या पादुका दिल्या अशी आख्यायिका आहे. श्रविठ्ठलमंदिराजवळ हरिदास वेशीकडे जाताना श्री. हरिदास यांचा स्वत:च्या मालकीचा वाडा आहे. त्याला ' काल्याचा वाडा' म्हणतात. या वाडयात श्रीविठ्ठलाच्या याच चांदीच्या पादुका आहेत. आषाढ व कार्तिक यात्रेच्या पौर्णिमेच्या दुसरे दिवशी या पादुका वै.कान्ह्या हरिदासाचे वंशजांच्या मस्तकावर बांधल्या जातात. या पादुका त्यांच्या मस्तकी ठेवण्याचा मान संत नामदेवरायांच्या वंशजाकडे आहे. पादुका मस्तकी ठेवताच श्री. हरिदासांची शुध्द हरपते. ते समाधी अवस्थेत जातात. नंतर टाळमृदुंगाच्या नादघोषात व नामघोषात मिरवणुकीने श्री. हरिदासांना खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात जातात. मंदिरातील सभामंडपात काला खांद्यावर घेऊन 5 प्रदक्षिणा केल्या जातात. दहीहंडी फोडली जाते. ही मिरवणूक (काला) महाद्वारातून निघतो. जाताना पादुकींवर गुलाल, बुक्का, हळद, कुंकू व लाह्यांचा वर्षाव होतो. महाद्वार घाटाने ही मिरवणूक खाली चंद्रभागेच्या भेटीसाठी जाते. पवित्र जल उडवले जाते. तेथून कुंभार घाटाने मिरवणूक माहेश्वरी धर्मशाळेत जाते. तेथून रामायणे गेटवरुन मुक्ताबाईच्या मठावरुन हरिदासवेशीतून पुन्हा वाडयात येते. मार्गात हरिनामाचा गजर व अबीर-गुलालाची उधळण होते. दहीहंडया फोडल्या जातात. भाविक लोक श्रीविठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतात. काला वाडयात आल्यावर महाआरती होते. सर्वांना काला वाटला जातो. महाप्रसाद होतो आणि यात्रेची या सोहळयाने परिपूर्णता-सांगता होते.
आषाढी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळाला 'चातुर्मास' म्हणतात. या चातुर्मासात मठातून, मंदिरांतून फड, वाडयातून श्रीविठ्ठलोपासना ( भजने, प्रवचने, कीर्तने, पारायणे, भारुडे इ. च्या माध्यमातून) केली जाते.
प्रमुख संतांच्या पालख्यांशिवाय अन्य अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरात आषाढी यात्रेसाठी येत असतात.
श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात.


- डाँ. अरुण शं वाडेकर

Tuesday, June 12, 2007

पंढरपुरात साकारणार भव्य आध्यात्मिक प्रकल्प...

चंद्रभागा नदीच्या पैलतीरापासून नामदेव पायरीपर्यंत सुंदर कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप...या मंडपात दोन्ही बाजूंना उंच ओव-या...नदीच्या दोन्ही तीरावर नऊ-नऊ असे अठरा घाट...त्यांना गीतेतील अठरा अध्यायांची नावे...असा भव्यदिव्य प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी - देहू परिसर विकास समितीचे मुख्य प्रवर्तक वि. दा. कराड, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर प्रयत्नशील आहेत. .........हा प्रकल्प स्थानिक पालिका प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून लवकरच पंढरपुरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरची वाटचाल आता ज्ञान तीर्थक्षेत्राकडे सुरू झाली. विकास समितीच्या संकल्पनेनुसार आळंदी, देहूनंतर पंढरपूरचा असा विकास करण्याचे नियोजन १९८६ मध्ये झाले होते. त्यानुसार आता लवकरच हा प्रकल्प पंढरपुरात साकारण्यासाठी गतिशील प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पानुसार चंद्रभागा नदीच्या पैलतिरापासून नामदेव पायरीपर्यंत कोणाचेही घर, मठ अथवा दुकान न पाडता सुंदर व कायमस्वरूपी ७० ते ८० फूट मंडप उभारण्यात येणार आहे. मंडपात पहाटेपासून रात्रीपर्यंत सुंदर अभंग व नादमधुर संगीत ऐकविण्यात येतील. नदीच्या दोन्ही तीरावर सर्व घाटांना विविध संतांची नावे देण्यात येतील. घाटाच्या दोन्ही बाजूला १२० फूट रुंदीचे रस्ते कुणाचेही घर, मठ न पाडता तयार करण्यात येतील. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना २०-२० फुटांचे फुटपाथ व मधोमध ८० फुटांचा रस्ता असेल. या रस्त्याच्या भूयारात भाविकांसाठी स्वच्छतागृहे आणि मुताऱ्या बांधण्यात येतील. यामुळे पवित्र चंद्रभागा नदी आणि वाळवंटातील घाणीची समस्या थोडीफार कमी होण्यास मदत होईल. तसेच या रस्त्यावर गोमुखाद्वारे चंद्रभागा नदीचे तीर्थ देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाबाबत बोलताना श्री. कराड म्हणाले, ""जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या प्रकल्पासाठी बौद्धिक योगदान दिले आहे. आता स्थानिक केंद्र व राज्य सरकारकडून यासाठी मंजुरीची आवश्‍यकता आहे. हे धार्मिक नव्हे तर सामाजिक काम आहे. यातून अनेकांचे आरोग्य चांगले राहून कल्याण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे.''

- संजय पाठक (सकाळ वृत्तसेवा )

Monday, June 11, 2007

मंदिरातील सेवाधारी...

'श्री'च्या मंदिरात नित्योपचार करणारे सेवेकरी आहेत. अनेक वर्षांपासून हे सर्व सेवाधारी भक्तीयुक्त अंत:करणाने 'श्री'च्या चरणाची सेवा करीत असतात.
1) पुजारी : काकडआरती ते शेजारती व नित्योपचारातील 'श्री'ची पुजा करणारे ते पुजारी.
2) बेणारे : नित्योपचारातील मंत्र सांगणारे ते बेणारे. यांनी सांगितलेल्या मंत्रांप्रमाणे सर्व पुजाविधी केले जातात.
3) परिचारक : पूजेच्या वेळी चांदीच्या घागरीत गरम पाणी आणून देणे, धूप-दीप चांदीच्या घुपटण्यातून पुजाऱ्याकडे देण्याचे काम परिचारक करतात.
4) डिंगरे : 'श्री'ना आरसा दाखविण्याचे काम डिंगरे करतात.
5) डांगे : देवाचे चोपदार आहेत. हातात चांदीची काठी घेऊन पूजेच्या वेळी बंदोबस्ताचे काम डांगे यांच्याकडे असते.
6) हरिदास : 'श्री'च्या पुढे काकडआरती व महापूजेच्या वेळी गायन करणे व 'श्री'च्या रथापुढे पंचपदी म्हणण्याचे काम हरिदास करतात. हे कान्ह्या हरिदासाचे वंशज आहेत.
7) दिवटे : हे 'श्री'ची पूजा सुरु असताना हाती दिवा घेऊन सर्वांना 'श्री'चे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उभे असतात.
8) बडवे : हे विश्वस्त आहेत. परिवार देवतांची पूजा-अर्चा इ. कार्य हेच करीत असतात.
9) उत्पात : श्रीरुक्मिणीमातेची सर्व सेवा उत्पात मंडळीच करीत असतात.

श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात....

श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन सोळखांबीत येऊन दक्षिणेकडील दरवाजाने बाहरे पडताच अनुक्रमे अंबाबाई (नारदमुनी, परशुराम, आता या मूर्ती मुक्ती मंडपात बसवल्या आहेत. ) उजव्या सोंडेच्या गणपती यांचे दर्शन घडते. पुढे तरटी दरवाजाच्या आत पायऱ्यांजवळ संत कान्होपात्रा समाधिस्थान आहे. कान्होपात्रा नायकीण होती. तिने विठ्ठलभक्ती केली आणि विठ्ठलाने तिला आपलेसे केले, अशी आख्यायिका आहे. समाधीवर तरटीचे झाड आहे. तसेच पढे गेल्यावर भगवान व्यंकटेशाचे छोटे मंदिर आहे. ही अतिशय सुंदर, चतुर्भुज मूर्ती गंडकी शिळेची आहे. ''व्यंकटरमणा गोविंदा'' अशी आरोळी ठोकून भक्तजन व्यंकटेशाच्या चरणी माथा टेकवतात. त्याला उजवे घालून जाताना डाव्या बाजूच्या भिंतीत श्रीगणेशाची मूर्ती दिसते. व्यंकटेशाला प्रदक्षिणा घालून खाली उतरताना बाजीराव पडसाळी (ओवरी) लागते. या सभामंडपात विविध कार्यक्रम सदैव होत असतात. तसेच याच मंडपात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे रोज सकाळी मोफत खिचडी, ताक व बुंदीच्या लाडूच्याा प्रसादाचे वाटप केले जाते. त्याला लागूनच श्रीमहालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णेची मूर्ती आहे व एक खांबावर नृसिंहाची मूर्ती आहे.
बाजीरावाच्या ओवरीत रामेश्वर, खंडोबा, गणपती, नागोबा व श्रीकृष्ण यांच्या छोटया सुरेख मूर्ती आहेत. तिथून पुढे जाताना डाव्या हाताला पश्चिमद्वार आहे. पुढे नवग्रहाचे मंदिर आहे. हा भाग श्रीविठ्ठलाच्या गर्भगारामागे येतो. इथेच एक बाजूस श्रीदत्त, सूर्य व चिंतामणी यांच्या मूर्ती आहेत. याच्या पुढे गेल्यावर श्रीरुक्मिणीमातेचे मंदिर लागते.

Saturday, June 9, 2007

श्रीविठ्ठल मंदिरात होणारे वर्षातील उत्सव....

परब्रह्म पांडुरंगाचे बडवे परंपरेने चालत आलेले नित्योपचार, पूजा-अर्चा, उत्सव-महोत्सव, कुलधर्म, कुलाचाराप्रमाणे सेवाभावी वृत्तीने करीत असताना. नित्य पंचक्वान्नाचा महानैवेद्य, खिचडी, दहीभात, लोणी-साखर इ. नित्यप्रती भक्तिभावाने दाखविला जातो. आरती-धूपारतीनंतर 'श्री'ची दृष्ट काढली जाते. या श्रीविठ्ठलाचे वर्षभरात अनेक उत्सव-महोत्सव होत असतात.
1) चैत्र मासात नववर्षारंभी शु. प्रतिपदेला (गुढी पाडव्याचे दिवशी) 'श्री'च्या शिखरावरील सुवर्ण कळसावर ध्वज-उभारणी होते. भागवत धर्माची ध्वजा डौलाने फडकू लागते. 'श्री'स अलंकार घातले जातात. चैत्र शु. प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यत ( अंदाजे 7 जूनपर्यंत) 'श्री'स नित्य चंदनाची सुंगधी उटी लावण्यात येते. शिरा व वाटलेली डाळ असा प्रसाद असतो. चैत्र वारीचा महोत्सव चैत्र शु. प्रतिपदेपासून पौणिमेपर्यंत असतो. चैत्र शु. एकादशीला फराळाबरोबरच पुरणाचा महानैवेद्य असतो. श्रीरामनवमीचा उत्सव मंदिरात होतो. हरिदासी कीर्तन असते. पौर्णिमेस हनुमानजयंती उत्सव असतो.
(2) वैशाख महिन्यात 'श्री'स चंदनाची सुंगधी उटी लावतात. कित्येकदा उटीचेच विविध पोषाख केलेले असतात. रुक्मिणी माता व श्रीव्यंकटेशालादेखील उटी केली जाते. अक्षय तृतीयेस अलंकार घालतात. महानैवेद्यात आमरस असतो. वैशाख शु. 14 स नृसिंह जयंती उत्सव मंदिरात होतो. चैत्रगौरीनिमित्त श्रीलक्ष्मीमाता व रुक्मिणीमातेस अलंकार पूजा केली जाते. हळदीकुंकवाचा व ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो.
(3) ज्येष्ठ मासात मृगनक्षत्र मृगनक्षत्र निघेपर्यंत चंदनाची उची असते. थंड पाणी व फराळाचे पदार्थ 'श्री'स दाखवतात.
(4) आषाढ महिन्यात महायात्रा असते. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून सकलसंतांच्या पालख्या पंढरीस येतात. आषाढ शु. 5 च्या सुमारास दोन्हीकडील पलंग काढले जातात. नित्योपचार बंद होतात. 'श्री'चे दर्शन अहोरात्र चालू असते. आषाढ शु. एकादशीस 'श्री'चा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वार काला होतो. यात्रेनंतर शुभमुहूर्तावर प्रक्षाळपूजा होते. रुद्र व पवयान सूक्ताचा अभिषेक होतो. साखरेने देवास चोळतात. उष्णोदकाने स्नान घालतात. समस्त बडवे व उत्पात पाणी उधळतात. देवास अलंकार व भरजरी पोषाख घालतात. पुन्हा नित्योपचार सुरु होतात. प्रक्षाळपूजेदिवशी शेजारतीनंतर 'श्री'स सुंठ, दालचिनी, पिंपळी, तुळस, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचा काढा शिणवटा घालवण्यासाठी अर्पण करतात. याच महिन्यात चातुर्मास सुरु होतो. मंदिरात व पंढरपुरातील मठ. मंदिर व धर्मशाळेतून परंपरेप्रमाणे भजन, कीर्तन, प्रवचनादि कार्यक्रम अखंडपणे चालू होतात. आषाढ वद्य 13 ला नामदेव पुण्यतिथीचे दिवशी नामदेव समाधी (पायरी) ची महापूजा व सुंदर आरास केली जाते. भजन-कीर्तनादि कार्यक्रम होतात. काल्याने याची सांगता होते.
(5) श्रावण मासात शुध्द पंचमीला रुक्मिणी व पांडुरंगाकडे गौरीची स्थापना होते. गौरीपूजनासाठी नगरी व पंचक्रोशीतील असंख्य स्त्रिया येतात. मदिरात लोकगीते म्हणतात. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. सायंकाळी मिरवणुकीने वाजत-गाजत भीमानंदीमध्ये गौरी विसर्जन केले जाते. हा उत्सव पाहण्यासारखा असतो. श्रावणी पौर्णिमेस विठ्ठल-रुक्मिणी व परिवार देवतांना अलंकार घालतात. वद्यात बाजीराव पडसाळीत गोकुळ अष्टमी ( कृष्णाजन्म सोहळा) उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या वेळी संतांची कीर्तने, भजने व प्रवचने होतात. शेवटी काल्याचा प्रसाद होऊन दिंडी निघते.
6) भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतीचा उत्सव होतो. दोन्हीकडे श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कार्यक्रम होतात व मिरवणुकीने 'श्री'चे विसर्जन केले जाते. याच महिन्यात शुध्द 10 ते 15 पर्यंत मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
7) आश्विन शुध्द प्रतिपदेपासून श्रीरुक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सव सुरु होतो. रात्री 'श्री'चा रथ सीमोल्लंघनाला जातो. तिथून परत आल्यावर 'श्री'ची पालखी निघते. आश्विन शु. पौर्णिमेस या महोत्सवाची सांगता होते. आश्विन वद्य प्रतिपदेला बांधलेबुवांच्या ओवरीत गीता अभ्यास मंडळाचा वर्धापन दिवस उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न होतो.
8) कार्तिक मासात 'श्री'ची मोठी दुसरी यात्रा भरते. लाखो. भक्तगण येतात, पलंग निघतो. एकादशीला रथ निघतो. पालखी निघते. योग्य दिवस पाहून प्रक्षाळ पूजा होते. कार्तिक वद्यात श्रीपांडुरंग आळंदीला ज्ञानोबा माऊलीच्या भेटीसाठी जातात.
9) मार्गशीर्ष मासात भक्तगण हाती दिवटया घेऊन, मुखाने ''येळकोट-येळकोट'' घे, असे म्हणत श्रीखंडोबाच्या मंदिरात येतात. भंडारा उधळतात. दर्शन घेतात. शुध्द एकादशीला गीताजयंती गीता-पारायणाने साजरी केली जाते. पौर्णिमेस दत्तजयंती होते. मार्गशीर्ष महिन्यात श्रीविठ्ठल संपूर्ण महिनाभर चंद्रभागानदीच्या पात्रात, गोपाळपुराजवळ असलेल्या विष्णुपदावर निवास करतात. विष्णुपदावरील दगडी शिळेवर आजही गोपद्म व 'श्री'चे उमटलेले चरण, वाजवलेल्या मुरलीचे दर्शन होते. आळंदीतून आल्यावर भगवंत इथेच एक महिना राहतात. म्हणून भक्तगण विष्णुपदावर 'श्री' च्या दर्शनासाठी येतात. स्नान करतात, सहभोजन करतात. मार्गशीर्ष अमावास्येला इथे रुद्राभिषेक होतो व पुन्हा देव रथात बसून मंदिरात येतात.
10) पौष मासातील अमावास्येला गरुड खांबाचा उत्सव होतो. कर्नाटकातून भक्त पुरंदरदासांचे अनुयायी वैष्णव भक्तजन इथे येतात, गरुड खांबाची महापूजा करतात. गरुड खांबाला पीतांबर नेसवून, सुंदर सुवासिक फुलांनी सजवतात. ''पांडुरंग, पांडुरंग'' असा जयघोष करीत हे वैष्णवजन नामस्मरणी दंग होऊन जातात. मार्गशीर्ष व पौष या दोन महिन्यांत धनुर्मास येतो. या धनुर्मासात 'श्री'ना खिचडीचा नैवेध असतो. संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून असंख्य महिला वाणवसा करण्यासाठी व देवदर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात.
11) माघ महिन्यातील शुध्द पंचमीला वसंतोत्सव सुरु होतो. वसंतपंचमीला मंदिरात तिळगुळाचे भजन होत असते. देवास पांढरा शुभ्र पोषाख केला जातो. पागोटे बांधले जाते व 'श्री'वर गुलालाची उधळण केली जाते. चांदीच्या गुलाबदाणीतून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांवर केशरी सुवासिक रंगाची उधळण केली जाते. वसंतोत्सव सुरु झाला हे दर्शवणारी पणती महाद्वार घाटावर वाजत-गाजत जाऊन लावली जाते. याच महिन्यात माघी यात्रा भरते. माध शु. 13 औसा संस्थानच्या पीठाधिपतींचे मंदिराच्या सभामंडपात चक्रीभजन होते. हा सोहळा पाडण्यासारखा असतो. मंदिर भक्तांनी तुडुंब भरले. महाशिवरात्रीला श्रीमंत होळकर संस्थानच्या वतीने रात्री 'श्री' सं गंगास्नान घालून महापूजा केली जाते. याच महिन्यात श्रीविठ्ठलाचे परमभक्त वै. प्रल्हादबुवा बडवे महाराजांची पुण्यतिथी सभामंडपात समाधिस्थळावर मोठया भक्तिभावाने साजरी केली जाते. भजन, प्रवचन, कीर्तन व संगीताचे व्याख्यानांचे कार्यक्रम बडवे समाजाच्या वतीने केले जातात.
12) फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेस महाद्वार घाटावर व रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळ उत्तरद्वारी होळी केली जाते. याला देवाची होळी म्हणतात, रंगपंचमीच्या दिवशी देवाचा डफ निघतो. रंगांची उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर उधळण होते. 'श्री'स पांढरा शुभ्र पोषाख व पांढरे पागोटे बांधतात. देवावर केशरी सुगंध टाकतात. होळीचा दिवस ते रंगपंचमीपर्यंत 5 दिवस रुक्मिणी मातेचे पुजारी उत्पात मंडळी उत्तरद्वारी छोटया मंडपात भक्तिरसाने ओथंबणाऱ्या व इतर लावण्या गावून श्रोत्यांना मुग्ध करतात. हा कार्यक्रम ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक येतात.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.
असे आहेत श्रीविठ्ठलांच्या मंदिरी प्रतिवर्षी मोठया भक्तिभावाने संपन्न होणारे महोत्सव..